पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026
‘इंडिया मोबाइल काँग्रेस’च्या पार्श्वभूमीवर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘सेवा तीर्थ’ येथे ‘ग्लोबल सिस्टम फॉर मोबाइल कम्युनिकेशन्स असोसिएशन’च्या (जीएसएमए) बोर्ड (मंडळ) सदस्यांशी संवाद साधला. जीएसएमए ही मोबाइल परिसंस्थेला एकत्र आणणारी एक जागतिक संस्था असून, ती मोबाइल ऑपरेटर तसेच मोबाइल परिसंस्था आणि संबंधित क्षेत्रांमधील विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करते.
तंत्रज्ञान हे समावेशक आणि शाश्वत विकासाचे साधन बनले पाहिजे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. समाजातील कोणताही घटक मागे राहू नये हे सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. विशेषत: ग्लोबल साउथसाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा परवडण्याजोग्या आणि सहज उपलब्ध बनवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि डिजिटल तफावत टाळण्यासाठी तंत्रज्ञान शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या (डीपीआय) क्षमतेवर, विशेषतः विकसनशील देशांसाठी एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून, प्रकाश टाकला. अनेक जागतिक नेत्यांशी ‘डीपीआय’ बाबत झालेल्या चर्चांवरून त्याचे वाढते जागतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे नमूद करत त्यांनी सांगितले की, अशी व्यासपीठे ‘ग्लोबल साउथ’मधील देशांसाठी महत्वाचा आधार म्हणून काम करू शकतात.
डिजिटल आणि सायबर फसवणुकीच्या वाढत्या आव्हानाच्या समस्येवर तंत्रज्ञानावर आधारित उपायांची गरज त्यांनी व्यक्त केली. संभाव्य फसवणुकीच्या कॉल्सबद्दल लोकांना सावध करण्यासाठी वापरकर्त्यांना सतत जागृती संदेश देण्याची त्यांनी सूचना केली.
पंतप्रधानांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी जागतिक मानके आणि सामायिक नियमांच्या गरजेवरही भर दिला. डीपफेक आणि एआय-निर्मित सामग्रीच्या वाढत्या धोक्यावर, वापरकर्त्यांना त्याचा स्रोत तात्काळ ओळखता यावा यासाठी यंत्रणा शोधण्याची त्यांनी सूचना दिली.
डिजिटल आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीमध्ये जागतिक नेतृत्व म्हणून भारताचा उदय जीएसएमएच्या बोर्ड सदस्यांनी अधोरेखित केला. त्यांनी 4जी आणि 5जी चा जलद विस्तार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची व्याप्ती आणि दूरसंचार आणि मोबाइल निर्मिती परिसंस्थेची वाढ या बाबींची नोंद घेतली. त्यांनी भारताच्या गुंतवणुकीला अनुकूल अशा धोरणात्मक चौकटीची प्रशंसा केली, आणि निरंतर डिजिटल विकासाला चालना देण्यासाठी सुरक्षित, लवचिक आणि विश्वासार्ह डिजिटल पायाभूत सुविधांच्या भूमिकेवर भर दिला.
मंडळाच्या सदस्यांनी 5जी, 6जी, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डिजिटल समावेशन आणि उपग्रह कनेक्टिव्हिटी या क्षेत्रांमध्ये भारताबरोबरच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या वाढत्या संधींवरही प्रकाश टाकला.
या बैठकीला दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, दळणवळण राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर, जीएसएमए मंडळाचे सदस्य आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai