Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकात बेंगळुरू इथे 15,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन,राष्ट्रार्पण, पायाभरणी तसेच काही प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकात बेंगळुरू इथे 15,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन,राष्ट्रार्पण, पायाभरणी  तसेच काही प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकात बेंगळुरूमध्ये 15,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, काही राष्ट्राला समर्पित केले, काही प्रकल्पांची पायाभरणी केली आणि काही प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी कन्नड भाषेत शुभेच्छा दिल्या आणि शहराचे आराध्य दैवत, देवी अन्नम्मा ताई तसेच नादप्रभू केम्पेगौडा यांना वंदन केले. आजचा दिवस बेंगळुरू आणि कर्नाटकच्या विकासप्रवासाला नवी गती देणारा आहे, ज्यामध्ये संपर्कव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. “मेट्रो आणि रेल्वेशी संबंधित प्रकल्पांपासून ते ऊर्जा सुरक्षेच्या कामांपर्यंत, हे सर्व प्रकल्प कर्नाटकच्या पायाभूत सुविधांना नवी ताकद देतील, असे ते यावेळी म्हणाले.

पायाभूत सुविधा आणि सुधारित दळणवळण व्यवस्था यांमुळे प्रगती, रोजगार आणि उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होतात, ज्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतात आणि गरिबी विरुध्दच्या लढ्याला बळकटी देतात; गेल्या काही वर्षांत सुमारे 50 कोटी नागरिक आत्यंतिक गरिबीतून बाहेर पडले आहेत, यावरून हे दिसून येते; यावर भर देत पंतप्रधानांनी, नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पांसाठी कर्नाटकच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.“त्यामुळे ‘विकसनशील कर्नाटकाच्या माध्यमातून ‘विकसनशील भारताच्या उभारणीला नवी गती मिळेल आणि त्याच वेळी ‘टेक सिटी’(Tech City)म्हणून बंगळूरची ओळख अधिक मजबूत होईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.

 थोड्या वेळापूर्वी झालेल्या बंगळूरू मेट्रोच्या नवीन पिंक लाईनच्या लोकार्पण सोहळ्यावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी नमूद केले की, या मार्गिकेमुळे आयआयएम बंगळूरू, असंख्य शैक्षणिक संस्था आणि शहरातील प्रमुख व्यवसाय, तंत्रज्ञान व व्यापारी केंद्रासाठी लागणारी संपर्क व्यवस्था लक्षणीयरीत्या सुधारेल. बंगळूरुतील लाखो लोकांना केवळ प्रवासाचीच सोय लाभेल इतकेच नाही, तर त्यांचा पैसा आणि वेळही वाचेल,”असे मोदी म्हणाले.

या प्रदेशाशी घनिष्ठ संबंध असलेल्या दिवंगत अनंत कुमार यांची काल पुण्यतिथी होती, त्यांचे स्मरण करून पंतप्रधानांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.”आज ही मेट्रो मार्गिका पाहून त्यांचा आत्माही नक्कीच सुखावला असेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“देशाच्या एकूण आयटी निर्यातीपैकी एक तृतीयांशाहून अधिक निर्यात जिथून होते आणि जे नाविन्य (इनोव्हेशन) व आर्थिक वाढीचे एक प्रमुख केंद्र आहे, अशा बेंगळुरूला ‘भारताची सिलिकॉन व्हॅली’ असे पंतप्रधानांनी संबोधले. केंद्र सरकारने बेंगळुरू क्षेत्राच्या जलद विकासाला प्राधान्य दिले आहे, असेही पंतप्रधानांनी पुढे नमूद केले. 2014 मध्ये केवळ 17 किलोमीटर असलेली ‘नम्मा मेट्रो’ आज 100 किलोमीटरहून अधिक लांबीची झाली आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे दिल्ली-एनसीआर आणि मुंबई महानगर प्रदेशानंतर, 100- किलोमीटर मेट्रो मार्गाचा टप्पा ओलांडणारे बेंगळुरू हे भारतातील तिसरे शहर ठरले आहे.“आपले मेट्रो संदर्भातील हे यश म्हणजे ‘जीवन सुलभता’ आणि ‘प्रवास सुलभता’ यांबाबतच्या देशातील नव्या विचारसरणीचा आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे जीवनमान सुधारण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा परिणाम आहे,” असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले.

भारतीय रेल्वे आपली वसाहतवादी मानसिकता सोडून एक नवीन वारसा निर्माण करत आहे, जिथे वंदे भारत गाड्या तसेच अमृत भारत स्थानकांच्या माध्यमातून स्थानके, इंजिने आणि डब्यांच्या रुपात भारताची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपली जाईल. यामध्ये चामराजनगर, चिक्कमंगलूरू, सकलेशपूर आणि सुब्रह्मण्यम् रोड या स्थानकांसह कर्नाटकातील 60 हून अधिक स्थानकांचा समावेश आहे, असे सांगत, ही स्थानके ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजनांसाठी विशेष सुविधा देऊन आधुनिकता आणि संवेदनशीलता यांचा मेळ कसा साधतात यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.“ज्या सुविधा पूर्वी विमानतळांवर उपलब्ध होत्या, त्याच सुविधा आता रेल्वे स्थानकांवर गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

गेल्या 10 ते 12 वर्षांत भारताच्या रेल्वे अर्थसंकल्पात अनेक पटींनी वाढ झाली असून, कर्नाटकसाठीच्या रेल्वे निधीच्या तरतुदीत तब्बल 9 पट वाढ झाली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज राज्याला 4 अमृत स्थानके, तसेच दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे 2 प्रकल्प मिळाले आहेत. याशिवाय, कर्नाटकला पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळाल्यानंतर काही दिवसांतच कर्नाटकला गोव्याशी जोडणारी नवी वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनमुळे मंगळुरूसह कर्नाटकच्या संपूर्ण किनारपट्टीवरील प्रवाशांना अर्ध-अतिजलद रेल्वे प्रवासाचा नवा अनुभव घेता येईल, असे मोदी म्हणाले.

इराण आणि आखाती प्रदेशाच्या आसपास सुरू असलेल्या युद्धामुळे ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दशकभरात उचललेल्या पावलांमुळे भारत या आव्हानात्मक काळाला ठामपणे सामोरा जाऊ शकला. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे उत्पादन वाढवणे, कच्च्या तेलाचा साठा करणे, सौर, जल आणि पवनऊर्जेचा विस्तार करणे, रेल्वे मार्गांचे जवळपास पूर्ण विद्युतीकरण करणे आणि मेट्रोचे जाळे विस्तारण्यासारख्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला.

कर्नाटकातील तीन नव्या प्रकल्पांची माहितीही त्यांनी दिली. मंगळुरू एलपीजी प्रकल्पामुळे 80,000 मेट्रिक टन साठवण क्षमता वाढणार आहे. देवणगुंठी विपणन टर्मिनलमुळे पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाचा पुरवठा अधिक सुरळीत होणार आहे. तर बंगळुरूमधील सीबीजी प्रकल्पातून दररोज 13 टन जैववायूचे उत्पादन होणार आहे. यामुळे कचरा व्यवस्थापनात सुधारणा होईल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर होणारा खर्चही वाचेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

चिप्सपासून जहाजांपर्यंत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा केंद्रांपासून क्वांटम कम्प्यूटिंग पर्यंत विविध नव्या तंत्रज्ञान क्षेत्रांत भारत जागतिक नेतृत्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी विश्वासार्ह वीज निर्मिती अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वच्छ ऊर्जेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देश अणुऊर्जा प्रकल्पांचा विस्तार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. आज भारताची नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमता 300 गिगावॅटच्या पुढे गेली आहे, असे मोदी म्हणाले.

केंद्र सरकारच्या योजना भारतीय नागरिकांना केवळ वीज ग्राहक न ठेवता वीज उत्पादक बनवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजने’अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सुमारे 80,000 रुपयांची केंद्रीय आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेतून देशभरातील 60 लाखांहून अधिक घरांवर छतावरील सौर ऊर्जा तबकड्या बसवण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्नाटकातील 40,000 हून अधिक कुटुंबांचा समावेश आहे. तसेच, विजेचा खर्च कमी करण्याबरोबरच उत्पन्न आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी ‘पीएम कुसुम योजने’अंतर्गत  कर्नाटकातील शेतकऱ्यांना 8 लाखांहून अधिक सौर पंपांच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. “याचा अर्थ, कर्नाटकातील अन्नदाता आता ऊर्जादाताही बनत आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

2014 नंतर ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार राबवलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग आणि करदात्यांच्या पैशाचा योग्य विनियोग यामुळे देशात मध्यमवर्गाचा विस्तार झाला आहे. घरगुती उपकरणे, दुचाकी वाहने, दर्जेदार शिक्षण, पोषण, आरोग्यसेवा आणि पर्यटन, यांचे अधिक चांगले पर्याय तसेच सुविधा मिळण्याची अपेक्षा बाळगणारा एक नवा ‘आकांक्षी वर्ग’  निर्माण झाला आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. या वाढत्या आकांक्षांमुळे वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यटन आणि सेवा क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. हा ‘नव-मध्यमवर्ग’ (निओ मिडल क्लास) भारताच्या आर्थिक विकासाचे एक प्रमुख इंजिन बनला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. “कर्नाटक आणि बंगळुरूमध्येही मोठ्या संख्येने असलेल्या या नव-मध्यमवर्गाच्या हिताला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मध्यमवर्गाची बचत वाढावी आणि त्यांच्या हातात खर्चासाठी अधिक पैसे शिल्लक राहावेत, यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यासाठी वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न प्राप्तिकरमुक्त करणे, ज्येष्ठ नागरिक आणि भाड्याच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी टीडीएस  नियमांमध्ये सुधारणा करणे, तसेच  जीएसटी तील आधुनिक सुधारणांद्वारे दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती कमी करणे, अशा उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. “वैयक्तिक आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील जीएसटी रद्द करून आम्ही विमा अधिक परवडणारा केला आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कर्नाटकातील आजच्या प्रकल्पांमुळे देशाच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. भाषणाचा समारोप करताना त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांना सक्षम करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.“मध्यमवर्गाची बचत वाढावी, त्यांची क्रयशक्ती मजबूत व्हावी आणि आपल्या कुटुंबांची स्वप्ने पूर्ण करण्याबरोबरच त्यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीतही योगदान द्यावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

***

Radhika Aghor / Rajesh Shirbhate / Sampada Patgaonkar / Nikhilesh Chitre / Ashutosh Save / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai