पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कर्नाटकातल्या मैसूरु इथे कॉसमॉस- मैसूरु तारांगण या भारतातील पहिल्या एलईडी डोम तारांगणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी कन्नड भाषेतून सर्वांना शुभेच्छा दिल्या. विवेक स्मारकाचे उद्घाटन केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच कॉसमॉस तारांगण राष्ट्राला समर्पित करण्यासाठी पुन्हा मैसूरुला येता आले, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. विवेक स्मारक आत्मचिंतन आणि आध्यात्मिक साधनेसाठी प्रेरणा देते, तर कॉसमॉस तारांगण आपली दृष्टी आकाशाकडे वळवून विशाल विश्वातील रहस्यांचा शोध घेण्यास प्रवृत्त करते, असे त्यांनी सांगितले. या दोन्ही वास्तूंमधून एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक संदेश मिळतो, असेही ते म्हणाले. भारतात अध्यात्म आणि विज्ञानाच्या परंपरा नेहमीच एकत्रितपणे पुढे जात आल्या आहेत, याचे हे उदाहरण आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्राचीन काळातील भारतीय पूर्वजांनी आकाशाचा सूक्ष्म अभ्यास केला, ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचाली समजून घेतल्या, दिनदर्शिका तयार केल्या आणि सूर्यग्रहण व चंद्रग्रहणांची गणिते मांडली, याची आठवण करून देताना पंतप्रधानांनी आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य आणि नीलकंठ सोमयाजी यांसारख्या महान भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्या काळात आजच्यासारखी प्रगत उपकरणे आणि तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. तरीही त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावले आणि अवघड गणिते सोडवली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
म्हैसूरला ज्ञानसंस्था जोपासण्याची समृद्ध परंपरा लाभली आहे, असे सांगताना पंतप्रधानांनी महाराजा नलवडी कृष्णराज वडियार यांच्या काळात म्हैसूर विद्यापीठाची स्थापना झाल्याचा उल्लेख केला. तसेच, बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेचा पाया घालण्यात वडियार राजघराण्याने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचीही त्यांनी आठवण करून दिली. या संस्थांमुळे अनेक पिढ्यांतील विद्वानांना प्रोत्साहन मिळाले. आता हे अत्याधुनिक तारांगण तरुणांना आणि नागरिकांना समर्पित करून म्हैसूर भारताच्या वैज्ञानिक प्रवासात नवा अध्याय जोडत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. एलईडी डोमच्या आत तारांगणाचा कार्यक्रम पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता, असे सांगून त्यांनी या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल देशाचे अभिनंदन केले. भारतीय खगोलभौतिकी संस्थेचे, म्हैसूर विद्यापीठाचे, सरकारच्या विविध विभागांचे आणि या तारांगणाच्या उभारणीत सहभागी झालेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘जय जवान, जय किसान’ या घोषणेपासून अटलबिहारी वाजपेयी यांनी जोडलेल्या ‘जय विज्ञान’पर्यंत आणि 21 व्या शतकातील भारताला नवी दिशा देणाऱ्या ‘जय अनुसंधान’ (जय संशोधन) या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जोडलेल्या राष्ट्रीय घोषणेपर्यंतचा प्रवास उलगडताना, पंतप्रधानांनी भारतीय तरुणांच्या वैज्ञानिक कामगिरीचे कौतुक केले. गेल्या वर्षी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड’मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाचा त्यांनी गौरव केला. तसेच, यंदा व्हिएतनाममध्ये झालेल्या स्पर्धेतील त्यांच्या देदीप्यमान यशाचा उल्लेख केला. भारतातून या स्पर्धेसाठी गेलेल्या 5 विद्यार्थ्यांपैकी 4 जणांनी सुवर्णपदक, तर 1 विद्यार्थ्याने रौप्यपदक पटकावले. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांत सुवर्ण किंवा रौप्यपदक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या विक्रमी यशाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. भारतीय तरुणांना अध्ययनासाठी आवश्यक साधने, तंत्रज्ञान, उपकरणे आणि संस्थात्मक पाठबळ मिळाले, तर ते असामान्य यश संपादन करू शकतात, असे त्यांनी अधोरेखित केले. ‘कॉसमॉस तारांगण’ (COSMOS Planetarium) विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठीही मोठे योगदान देईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असताना कोणत्याही देशाला संथ गतीने प्रगती करणे परवडणारे नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. गेल्या दशकात नवीन दुर्बिणींची उभारणी आणि इस्रोच्या ऐतिहासिक मोहिमांमुळे खगोलशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र आणि अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताने अभूतपूर्व प्रगती केली आहे, असे त्यांनी सांगितले. यामध्ये ‘चांद्रयान-3’ मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरीत्या उतरणारा भारत हा पहिला देश ठरला, तसेच भारताची पहिली अंतराळ सौर वेधशाळा ‘आदित्य-एल1’ प्रक्षेपित करण्यात आली, याचा त्यांनी उल्लेख केला. गेल्याच वर्षी अंतराळात ‘डॉकिंग’ आणि ‘अनडॉकिंग’ (अंतराळात दोन यानांची जोडणी आणि त्यांचे विलगीकरण करण्याचे तंत्रज्ञान) करण्याची क्षमता प्रदर्शित करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
एका भारतीय अंतराळवीराने अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊन तेथे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग केले, याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. या मोहिमेतून मिळालेल्या निष्कर्षांचे धोरणात्मक महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. या मोहिमेतील अनुभव, भारताच्या ‘गगनयान’ या स्वदेशी मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठीही उपयुक्त ठरत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
अंतराळ क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे भारतीय स्टार्टअप्स आणि तरुणांना आपल्या क्षमतेचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. खाजगी रॉकेट प्रक्षेपण, उपग्रहांना कक्षेत स्थापित करणे आणि अंतराळ क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवणे, यांसारख्या कामगिरीतून ‘नव्या भारता’चा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले. येथे नव्या संशोधनाला प्रोत्साहन दिले जात आहे, नवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे आणि तरुणांसाठी नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.
भारताने नेहमीच ‘मानवता प्रथम’ या मंत्राला प्राधान्य दिले असून, आपला अंतराळ कार्यक्रम मानवकल्याणासाठी समर्पित केला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. याचे उदाहरण देताना त्यांनी मच्छीमारांसाठी इस्रोने विकसित केलेल्या उपग्रह संप्रेषण प्रणालीचा उल्लेख केला. या प्रणालीमुळे उपग्रह संदेशवहन यंत्रणा बसवलेल्या मच्छीमारांच्या नौकांना वादळाच्या वेळी, संबंधित अधिकारी वेळेत धोक्याचे इशारे देऊ शकतात. तसेच, या नौका सुरक्षितपणे किनाऱ्यावर परतत आहेत की नाही, यावरही लक्ष ठेवू शकतात, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
भारतीय रेल्वे आणि इस्रो यांनी विकसित केलेल्या रिअल-टाइम ट्रेन ट्रॅकिंग प्रणालीद्वारे रेल्वेगाड्यांचे थेट स्थान जाणून घेणे तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांचे निपटारे करण्यासाठी क्षेत्रीय माहितीच्या जोडीने उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहितीचा वापर करणे, अशा अंतराळ तंत्रज्ञानाच्या दैनंदिन उपयोगांची उदाहरणे देत पंतप्रधानांनी भारताच्या अंतराळ साधनसंपत्तीचे दुहेरी महत्त्व अधोरेखित केले. “आज आपले उपग्रह अंतराळातील उंची गाठत आहेत आणि त्याच वेळी पृथ्वीवरील लोकांचे जीवन अधिक चांगले करण्यासाठीही त्यांचा वापर केला जात आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
‘समाजासाठी विज्ञान’ हे सरकारचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान देशभरात संशोधन आणि नवोन्मेषाला सातत्याने प्रोत्साहन देत असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, देशभरातील 10,000 हून अधिक अटल टिंकरिंग प्रयोगशाळांचा लाभ आतापर्यंत एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. “या प्रयोगशाळांमध्ये मुलांना त्यांच्या कल्पनांवर काम करण्याची, नवे प्रयोग करण्याची आणि नवोन्मेष साधण्याची संधी मिळत आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
संशोधनाला पुढे नेण्यासाठी विद्यार्थी आणि संशोधकांना जगातील सर्वोत्तम वैज्ञानिक साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे सांगत पंतप्रधानांनी देशातील संस्थांना आघाडीच्या जागतिक नियतकालिकांपर्यंत प्रवेश मिळवून देण्यासाठी सुरू केलेल्या ‘एक राष्ट्र, एक वर्गणी’ उपक्रमाचा तसेच अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानच्या स्थापनेचा उल्लेख केला. “याद्वारे अधिकाधिक विद्यापीठांना नवीन संशोधन करण्यासाठी आम्ही मदत करत आहोत,” असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
देशातील संशोधकांना सातत्यपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या एक लाख कोटी रुपयांच्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजनेची आठवण करून देताना पंतप्रधानांनी या उपक्रमाचे व्यावहारिक परिणाम अधोरेखित केले. “यामुळे नवीन तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर आणून त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास मदत होत आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारतातील विस्तारत असलेल्या विज्ञान आणि संशोधन परिसंस्थेत तारांगणे आणि विज्ञान केंद्रे युवकांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. कॉसमॉसशी संबंधित सर्वांनी या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सातत्याने आमंत्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “विश्वाविषयी जाणून घेण्यासाठी येथे येणाऱ्या मुलांपैकी काही जण कदाचित एक दिवस पुन्हा येथे येतील आणि विश्वाविषयी त्यांनी कोणते नवे शोध लावले आहेत, हे आपल्याला सांगतील. कॉसमॉस तारांगणाचे हेच सर्वात मोठे यश असेल,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
The new COSMOS Planetarium in Mysuru brings the wonders of the universe closer to young minds. https://t.co/AhdAkpkSGF
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2026
भारत में आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य और नीलकंठ सोमयाजी जैसे अनेक महान astronomers हुए।
आज जैसे advanced instruments और technology उस समय नहीं थे। इसके बावजूद उन्होंने बड़ी-बड़ी खोजें कीं, मुश्किल calculations किए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 13, 2026
आज जब भारत science के क्षेत्र में एक के बाद एक नई उपलब्धियां हासिल कर रहा है, तब इस अत्याधुनिक COSMOS Planetarium के रूप में मैसूरु भी भारत की scientific journey में एक नया chapter जोड़ रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 13, 2026
हमारी सरकार ने space sector को open किया।
इससे private sector के लिए नई संभावनाएं बनी हैं।
भारत के startups को भी अपनी क्षमता दिखाने का अवसर मिला है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 13, 2026
***
Radhika Aghor / Nikhilesh Chitre / Ashutosh Save / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
The new COSMOS Planetarium in Mysuru brings the wonders of the universe closer to young minds. https://t.co/AhdAkpkSGF
— Narendra Modi (@narendramodi) November 13, 2026
भारत में आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य और नीलकंठ सोमयाजी जैसे अनेक महान astronomers हुए। आज जैसे advanced instruments और technology उस समय नहीं थे। इसके बावजूद उन्होंने बड़ी-बड़ी खोजें कीं, मुश्किल calculations किए: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 13, 2026
आज जब भारत science के क्षेत्र में एक के बाद एक नई उपलब्धियां हासिल कर रहा है, तब इस अत्याधुनिक COSMOS Planetarium के रूप में मैसूरु भी भारत की scientific journey में एक नया chapter जोड़ रहा है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 13, 2026
हमारी सरकार ने space sector को open किया। इससे private sector के लिए नई संभावनाएं बनी हैं। भारत के startups को भी अपनी क्षमता दिखाने का अवसर मिला है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 13, 2026