नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त आयोजित शबद कीर्तनात सहभागी झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी ‘वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह!’ या अभिवादनाने आपल्या भाषणाची सुरुवात केली. या पवित्र प्रसंगी गुरु नानक देव जी यांना आदरपूर्वक नमन करून शबद कीर्तनात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, सर्व देशवासियांना प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. “प्रकाश पर्वानिमित्त मी सर्व देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
गुरबाणीतील प्रत्येक शबद आणि कीर्तनातील प्रत्येक सूर हा केवळ संगीताचा प्रकार नसून त्यापलीकडे जाणारा आध्यात्मिक अनुभव आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ही एक आध्यात्मिक साधना असून, ज्ञानाच्या अथांग सागरात डुबकी घेण्यासारखी अनुभूती आहे, असे त्यांनी नमूद केले. “म्हणूनच, जेव्हा जेव्हा मला अशा कार्यक्रमाचे निमंत्रण मिळते किंवा सहभागी होण्याची संधी मिळते, त्या-त्यावेळी मी संगत आणि कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
गुरू नानक देव यांनी दिलेला ‘किरत करो, वंड छको, नाम जपो’ हा संदेश बालपणापासूनच आपल्या जीवनाचा स्वाभाविक भाग राहिला असल्याचे स्मरण करत पंतप्रधानांनी गुरुद्वारांमध्ये नतमस्तक होणे, गुरुवाणीत तल्लीन होणे, सेवेचा आनंद अनुभवणे, लंगरचा प्रसाद ग्रहण करणे आणि अनेकदा श्री हरमंदिर साहिब इथे माथा टेकणे या अनुभवांविषयी आत्मीयतेने सांगितले. “जुन्या सहकाऱ्यांना माहीत असेल की, मी पंजाबमध्येही बराच काळ घालवला आहे आणि माझ्या आयुष्यातील त्या काळातील आठवणी अत्यंत विशेष आहेत,” असे मोदी यांनी नमूद केले.
गुरूंच्या कृपेने शीख संतांचा सहवास सातत्याने लाभत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, अनेक संत आणि विद्वानांना पंतप्रधान निवासस्थानी आमंत्रित करण्याचे भाग्य लाभल्याचाही उल्लेख मोदी यांनी केला. या कार्यक्रमात संतांच्या उपस्थितीतून जाणवणारी आध्यात्मिक ऊर्जा त्यांनी अधोरेखित केली आणि सर्व शीख बांधवांचा सन्मान केला. “या प्रसंगी मी सर्व संत आणि विद्वानांना विनम्र अभिवादन करतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यंदाच्या प्रकाश पर्वाचा योग श्री गुरू तेगबहादूर यांच्या 350 व्या शहीद स्मृतिवर्षाशी जुळून आला आहे. देशाची अस्मिता, धर्म, श्रद्धा आणि मूल्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या भूमीवर आपल्या प्राणांची आहुती दिली होती, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. या बलिदानाला 350 वर्षे उलटून गेली असली, तरी त्यातून मिळणारी प्रेरणा आजही देशाच्या मातीमध्ये आणि कानाकोपऱ्यात खोलवर रुजलेली आहे, असे त्यांनी नमूद केले. “यासाठी देशातील प्रत्येक नागरिक त्यांचा सदैव ऋणी राहील,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
संपूर्ण शीख परंपरा ही देश आणि त्याच्या संस्कृतीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याच्या भावनेचे प्रतीक राहिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भाई मतीदास, भाई सतीदास आणि भाई दयालाजी यांचे हौतात्म्य, तसेच स्वातंत्र्यलढ्यादरम्यान कायम राहिलेली त्यागाची भावना ही त्याची उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुद्वारा सुधारणा चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदान आणि सेवेसाठी आयुष्यभर केलेल्या समर्पणाबद्दल पंतप्रधानांनी सरदार तेजा सिंह समुंदरी यांना आदरांजली वाहिली. “यंदा त्यांच्या हौतात्म्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मी त्यांनाही विनम्र अभिवादन करतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताने शतकानुशतके गुलामगिरी सहन केली आणि त्या सर्वात बिकट ऐतिहासिक कालखंडात देखील गुरूंनी देशाच्या संरक्षणाची ज्योत तेवत ठेवली याचे स्मरण करत पंतप्रधानांनी आजच्या काळातले महान राष्ट्रीय निर्धार आणि विकसित भारताचे लक्ष्य या गुरूंच्या प्रेरणा आणि आदर्शांच्या माध्यमातूनच शक्य आहेत यावर अधिक भर दिला. “म्हणून, शीख परंपरा आणि शिख धर्माचा वारसा यांना दीपस्तंभ म्हणून आपल्यासमोर ठेवणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
सरकारने गेल्या 12 वर्षांच्या काळात संपूर्ण विश्वासासह ही जबाबदारी पेलली आहे याचा तपशील देत पंतप्रधानांनी भारतभरात आणि परदेशांमध्ये साजऱ्या झालेल्या गुरु गोविंद सिंहजी यांच्या 350 व्या प्रकाश पर्वाचा तसेच गुरु नानक देव जी यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाचा उल्लेख केला. ते म्हणाले की त्या वेळी विशेष नाणी तसेच टपाल तिकिटे जारी करण्यात आली, विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या आणि गुरु तेग बहादूरजी यांच्या 400 व्या प्रकाश पर्वानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. “याच भावनेतून, आम्ही सध्या गुरु तेग बहादूरजी यांचा 350 वा हुतात्मा दिन पाळत आहोत,” मोदी म्हणाले.
येत्या 26 डिसेंबरचा वीर बाल दिवस लक्षात घेत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की शूर साहिबजाद्यांच्या हौतात्म्याची अमर कहाणी आणि माता गुर्जरीचा निर्धार पुढच्या पिढीला सांगण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर हा दिवस मानला जातो. “जेव्हा आपल्या मुलांना त्या युगाची परिस्थिती समजेल, साहिबजादे आणि गुरूंनी हौतात्म्य कसे पत्करले आणि आपल्या श्रद्धेचे संरक्षण कसे झाले हे कळेल तेव्हा हे ज्ञान आणि प्रेरणा देशाप्रती समर्पित युवक घडवेल,” विश्वास व्यक्त करत मोदी म्हणाले.
गुरूंचे वैभव साजरे करण्यासाठीचे प्रयत्न भारताच्या सीमेपलीकडे देखील विस्तारले आहेत याकडे लक्ष वेधत पंतप्रधानांनी अलीकडेच फिलिपाईन्समधील सर्वात प्राचीन गुरुद्वारा असलेल्या खालसा दिवान गुरुद्वाराला भेट दिल्याची आठवण काढली.या गुरुद्वाराच्या पुनर्विकासासाठी आपले सरकार मदत करत आहे अशी माहिती त्यांनी दिली. “आपल्या गुरूंचा दिव्य प्रकाश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा हे आमचे प्रयत्न आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने भारत नव्या शिखरापर्यंत झेप घेत आहे,” पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
‘नानक नाम चढदी कला, तेरे भाणे सरबत दा भला’ या अरदासचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी गुरुवाणीतून सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची सार्वत्रिक शिकवण मिळत असल्याचे सांगितले. “प्रत्येकाच्या कल्याणाची इच्छा मनात तेव्हाच जागृत होते, जेव्हा आपण सर्वांना आपले मानू लागतो,” असे मोदी यांनी नमूद केले.
जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी, निरपराध नागरिक आणि कुटुंबांना हिंसाचार व अशांततेचा सामना करावा लागत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. प्रत्येकासाठी शांतता, प्रत्येक कुटुंबाची सुरक्षितता आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगता यावे, ही सार्वत्रिक गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “अशा काळात ‘सरबत दा भला’ ही भावना अधिकच महत्त्वाची ठरते,” असे ते म्हणाले.
गुरुसाहेबांनी दिलेल्या जीवनमूल्यांची खरी कसोटी दैनंदिन जीवनातच लागते, असे सांगून पंतप्रधानांनी समाजासमोरील अंमली पदार्थांच्या व्यसनाचे गंभीर आव्हान अधोरेखित केले. “एखादा तरुण व्यसनाच्या आहारी जातो, तेव्हा त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंबाची स्वप्नेही उद्ध्वस्त होतात,” असे त्यांनी नमूद केले.
देशातील प्रत्येक तरुण व्यसनमुक्त असावा, जेणेकरून त्याला मनापासून शिक्षण घेता येईल, आपली स्वप्ने साकार करता येतील आणि कुटुंबासह देशाचाही गौरव वाढवता येईल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.तरुणांना योग्य मार्गावर नेण्यासाठी कुटुंबे, संगत, गुरुद्वारे आणि सामाजिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या संदेशाचा समारोप करताना पंतप्रधानांनी प्रकाश पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आणि पारंपरिक शीख अभिवादन केले. “गुरुसाहेबांच्या कृपेने आणि समाजाच्या सामूहिक प्रयत्नांतून आपण आपल्या नव्या पिढीला सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य देऊ शकू, असा मला विश्वास आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Happy to join the Shabad Kirtan marking the Parkash Purab of Sri Guru Nanak Dev Ji. https://t.co/YMDdLpFvot
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2026
राष्ट्र और उसकी संस्कृति के लिए सब कुछ न्योछावर करने का जज्बा…पूरी सिख परंपरा इसका पर्याय रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 23, 2026
आज दुनिया में कितने ही स्थानों पर संघर्ष चल रहे हैं। कितने ही निर्दोष लोग, कितने परिवार हिंसा और अशांति का सामना कर रहे हैं।
ऐसे में, दुनिया के हर हिस्से में शांति हो, हर परिवार सुरक्षित हो, हर व्यक्ति को सम्मान के साथ जीने का अवसर मिले…इसके लिए ‘सरबत दा भला’ की भावना और भी अहम हो जाती है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 23, 2026
देश का हर युवा नशे से आज़ाद हो। वो अपने सपनों को पूरा करे। खूब पढ़ें, आगे बढ़ें, अपने परिवार और देश का गौरव बढ़ाए। इस प्रयास में परिवारों की भूमिका बहुत बड़ी है।
हमारी संगत, हमारे गुरुद्वारे, हमारी सामाजिक संस्थाएं, सब मिलकर नौजवानों को दिशा दे सकते हैं, उन्हें सही रास्ता चुनने का हौसला दे सकते हैं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 23, 2026
सुवर्णा बेडेकर/निलीमा चितळे/आशुतोष सावे/रेश्मा बेडेकर/संजना चिटणीस/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai