नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी 22 ते 23 नोव्हेंबर 2026 या कालावधीत भारताचा अधिकृत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नवी दिल्लीत दोन्ही पंतप्रधानांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात महत्त्वपूर्ण आणि भविष्यवेधी चर्चा झाली. यावेळी त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा सर्वंकष आढावा घेतला.
भारत आणि नेपाळ यांच्यातील शतकानुशतके जुने नागरी संबंध परस्पर आदर आणि परस्पर लाभाच्या तत्त्वांवरील दृढ विश्वासामुळे अधिक बळकट झाले आहेत. दोन्ही देशांतील जनतेमधील घनिष्ठ संबंधांनी या मैत्रीला अधिक व्यापक स्वरूप दिले असून, त्यातूनच बहुआयामी भागीदारी विकसित झाली आहे, असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.
ऑगस्ट 2026 मध्ये रसुवा-त्रिशूली खोऱ्यासह नेपाळच्या इतर भागांत आलेला पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर भारताने तातडीने मानवतावादी मदत तसेच शोध आणि बचावकार्याच्या माध्यमातून केलेल्या सहकार्याबद्दल नेपाळने भारताचे आभार मानले. नेपाळच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना पुढील काळातही मदत करण्याबाबत परस्पर संपर्क आणि समन्वय कायम ठेवण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय भागीदारीत सध्याच्या राजकीय, आर्थिक आणि तांत्रिक परिस्थितीचे प्रतिबिंब उमटले पाहिजे आणि अद्ययावत आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या कायदेशीर चौकटीवर ती आधारित असणे आवश्यक आहे, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. या चौकटीच्या अनुषंगाने 1950 च्या शांतता आणि मैत्री करारासह विद्यमान द्विपक्षीय करारांचा परस्पर संमतीने आढावा घेता येईल, असेही त्यांनी मान्य केले. जलसंपदा, ऊर्जा, व्यापार व वाणिज्य आणि सीमा यांसह दोन्ही देशांमधील सर्व प्रलंबित प्रश्न परस्पर चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचेही दोन्ही नेत्यांनी ठरवले.
भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांचे रूपांतर दोन्ही देशांतील जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळवून देणाऱ्या आधुनिक आणि परिणामाभिमुख भागीदारीत करण्याच्या उद्देशाने दोन्ही नेत्यांनी ‘संयुक्त दृष्टिकोन दस्तऐवज’ (Joint Vision) स्वीकारला. या दृष्टिकोनातून भारत आणि नेपाळमधील जनतेच्या, विशेषतः तरुणांच्या आकांक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे. द्विपक्षीय भागीदारीला भविष्यात नवी दिशा देण्यासाठी हा दस्तऐवज पुढील दहा प्रमुख स्तंभांवर आधारित कृती आराखडा निश्चित करतो.
I. सर्वंकष आर्थिक आणि विकास भागीदारी
भारताचा ‘विकसित भारत 2047’ हा राष्ट्रीय दृष्टिकोन आणि नेपाळची ‘समुन्नत नेपाळ’ (समृद्ध नेपाळ) ही राष्ट्रीय आकांक्षा यांमध्ये अनेक समान आणि पूरक बाबी आहेत. या समान उद्दिष्टांचा उपयोग दोन्ही देशांमधील व्यापक आर्थिक संबंध अधिक दृढ करण्या साठी करता येऊ शकतो. यासाठी पुढील बाबींवर भर देण्यात येईल:
i. दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला अधिक चालना देऊन सर्वंकष आर्थिक भागीदारी विकसित करण्यासाठी, त्यासंबंधीच्या विद्यमान सक्षम करारांचा आणि चौकटींचा आढावा घेणे.
ii. दोन्ही देशांमधील संपर्क आणि दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच परस्पर पोहोच सुलभ करण्यासाठी नवीन पारगमन मार्ग आणि हवाई मार्ग सुरू करणे.
iii. उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगांच्या पुरवठा साखळ्या अधिक सक्षम करण्यासाठी भारत-नेपाळ सीमेच्या दोन्ही बाजूंना निर्याताभिमुख उत्पादनाला चालना देणारी सीमापार विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ) आणि औद्योगिक केंद्रे स्थापन करण्यासाठी सहकार्य करणे. तसेच माहिती तंत्रज्ञान केंद्रांच्या विकासासाठीही परस्पर सहकार्य करणे.
iv. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवणारे आणि व्यवसाय सुलभ करणाऱ्या व्यवस्थाना अंतिम रूप देऊन नेपाळच्या प्राधान्यक्रमातील क्षेत्रांमध्ये भारतीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.
v. भारत नेपाळला विकासात्मक सहाय्य म्हणून 15,000 हजार कोटी (24,000 कोटी नेपाळी रुपये) देणार असून यामध्ये नेपाळ मध्ये अलीकडेच आलेल्या महाप्रलयानंतर पुनर्रचना आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या पायाभूत सेवासुविधा प्रकल्पांसाठी अनुदान सहाय्य म्हणून 3,500 कोटी रुपये (5,600 कोटी नेपाळी रुपये) यांचा समावेश आहे आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 11,500 कोटी रुपये (18,400 कोटी नेपाळी रुपये) रुपया-आधारित पतपुरवठा योजनेचा देखील समावेश आहे. त्या अनुषंगाने विशिष्ट प्रकल्प तसेच विकास सहाय्य देण्याची कार्यपद्धती परस्पर विचारविनिमयाद्वारे निश्चित केली जाईल.
II. प्रत्यक्ष आणि डिजिटल संपर्कव्यवस्था:
आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि नागरिकांमधील संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने संपर्कव्यवस्था हे अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे. या क्षेत्रात होत असलेली उल्लेखनीय प्रगती लक्षात घेता दोन्ही नेत्यांनी भारतातील अयोध्या ते नेपाळ मधील जनकपूर यांच्यात सुरु झालेल्या थेट रेल्वेसेवेचे आणि धारचुला (भारत) आणि दारचुला (नेपाळ) दरम्यान महाकाली नदीवरील वाहनयोग्य पुलाच्या शुभारंभाचे स्वागत केले. त्यांनी पुढे खालील बाबींवरही सहमती दर्शवली:
i. भैरहवा (नेपाळ) आणि सुनौली (भारत) येथे सुरू असलेल्या एकात्मिक तपासणी नाक्यांच्या बांधकामाला गती देणे तसेच बनबसा (भारत) आणि दोधारा चांदनी (नेपाळ) येथे नवीन एकात्मिक तपासणी नाके स्थापन करणे.
ii.जयनगर–बर्दिबास आणि जोगबनी–बिराटनगर या रेल्वेमार्गांच्या अंतिम टप्प्यांतील कामे तातडीने पूर्ण करणे.
iii. रक्सौल-काठमांडू रेल्वे मार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणाला अंतिम स्वरुप प्राप्त झाल्याचे स्वागत करताना दोन्ही नेत्यांनी भारत आणि नेपाळ यांच्यात आंतरकार्यक्षम रेल्वे नेटवर्क उभारण्याच्या दृष्टीने नेपाळ मध्ये पूर्व पश्चिम रेल्वे मार्गाच्या विकासावर सहकार्य करण्यास सहमती दर्शवली, यामध्ये बर्दिबास-निजगढ विभाग आणि बिरगंज-निजगढ दुव्याला प्राधान्य दिले जाईल.
iv. याव्यतिरिक्त भारत आणि नेपाळ यांच्यात नवीन वाहन योग्य पूल आणि व्यापारी केंद्रांची स्थापना करुन रस्तेमार्गातील संपर्कव्यवस्था आणखी वाढवली जाईल.
v. सिलिगुडी (भारत) आणि झापा (नेपाळ) यांना जोडणाऱ्या नवीन पाइपलाइनच्या बांधकामासह, सीमापार पेट्रोल पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा सुविधांमध्ये वाढ करणे, आणि भारत आणि नेपाळ दरम्यान गॅस पाइपलाइनच्या शक्यतेचा शोध घेणे.
vi. भारताच्या UPI प्रणालीला नेपाळच्या राष्ट्रीय पेमेंट प्रणालीशी जोडण्याच्या आधारे , दोन्ही देशांनी सीमापार किरकोळ व्यवहारांसाठीच्या पेमेंट सुविधांची अंमलबजावणी जलदगतीने करण्यास सहमती दर्शविली.
vii. पीएम गती शक्ती सारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजन आणि संपर्कव्यवस्था विकसित करण्यासाठी या क्षेत्रात परस्पर सहकार्य करणे, नेपाळ आपल्या भौगोलिक आणि विकासविषयक प्राधान्यक्रमांनुसार याच्या स्वीकाराबाबत विचार करू शकेल.
viii. भारत आणि नेपाळ यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा खुली, सुरक्षित आणि योग्यप्रकारे नियंत्रणाखाली ठेवणे आणि सीमापार अपराध आणि अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे.
III. ऊर्जा, जलसंपदा आणि हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता:
ऊर्जा, जलसंपदा आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यात सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या अफाट क्षमता लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी संस्थात्मक सहकार्य मजबूत करायला, परस्परांना लाभदायक भागीदारीला प्रोत्साहन देण्यासह शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी सहयोगी प्रयत्न बळकट करायला सहमती दर्शवली. या दिशेने कार्य करण्यासाठी:
i.भारत-नेपाळ ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या संयुक्त दृष्टिकोन दस्तऐवजाशी सुसंगत राहून, भारत नेपाळमधील जलविद्युत प्रकल्प आणि वीज पारेषण पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल. त्याचवेळी, अशा गुंतवणुकीसाठी पोषक आणि दोन्ही देशांच्या हिताचा ठरेल अशी अनुकूल चौकट विकसित करण्यासह नेपाळ आवश्यक ते सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून देईल. भारत आणि नेपाळ यांच्यातील वीज व्यापाराचा विस्तार करण्याच्या उद्देशाने, परस्पर लाभ आणि बाजारपेठेतील मागणीच्या आधारे वीज व्यापार अधिक वाढविण्याच्या शक्यतांचा संबंधित प्राधिकरणांकडून शोध घेतला जाईल.
2. जलसंपत्तीचा परस्पर हितासाठी विनियोग करण्यासाठी आणि पुरामुळे होणारे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी, पंचेश्वर, सप्तकोशी आणि सुनकोशी बहुउद्देशीय प्रकल्पांसह सुरू असलेल्या आणि प्रस्तावित जलविद्युत आणि बहुउद्देशीय प्रकल्पांच्या अंमलबजावणीला दोन्ही बाजूंकडून गती दिली जाईल.
3. जीवितहानी टाळण्यासाठी तसेच उपजीविका आणि पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी आपत्ती जोखीम निवारण, पूर्वसूचना प्रणाली आणि पुनर्वसन आणि पुनर्बांधणी या क्षेत्रांत सक्रिय भागीदारी करण्याचे उभय देशांनी मान्य केले.
4. जल-हवामानविषयक माहिती, हिमनदी – सरोवरांची देखरेख आणि पूर्वसूचना यांचे थेट आदानप्रदान सुरू करण्यास दोन्ही बाजूंनी संमती दर्शवली. तसेच, एकमेकांना सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव, क्षमता बांधणी, प्रशिक्षण आणि मदतीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या संबंधित यंत्रणांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याचेही त्यांनी मान्य केले.
5. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए), आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची आघाडी (सीडीआरआय ), आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्र (आयसीआयएमओडी) आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी (आयबीसीए) यांसारख्या बहुपक्षीय संघटनांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याचे त्यांनी मान्य केले.
6. नेपाळमधील हरित हायड्रोजनच्या प्रायोगिक प्रकल्पासह, सौर ऊर्जेपासून ते भूगर्भातील ऊर्जा स्रोतांपर्यंतच्या अतिरिक्त ऊर्जा स्रोतांच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्यास दोन्ही बाजूंनी संमती दर्शवली.
7. धोरणनिर्मिती, नियमन, मानके, वनीकरण, जोखीम मानचित्रण आणि हवामान-प्रतिरोधक शेती यांसारख्या पर्यावरणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये नेपाळी युवा व्यावसायिक, अधिकारी आणि तज्ज्ञांच्या प्रशिक्षणासाठी भारत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देईल.
8. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि जलप्रदूषण रोखणे या क्षेत्रांतील आपले कौशल्य आणि तांत्रिक अनुभव भारत नेपाळसोबत सामायिक करेल.
4. सुशासन:
सुशासनाशी संबंधित नेपाळच्या प्राधान्यक्रमांमध्ये आणि भारताने अवलंबलेल्या मार्गांमध्ये लक्षणीय साम्य आहे; विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संवाद अधिक पारदर्शक, सोयीस्कर व प्रभावी बनवण्याच्या बाबींमध्ये हे साम्य दिसून येते. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी:
1.‘डिजिटल नेपाळ फ्रेमवर्क’च्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी, डिजिटल ओळख, व्यवहार/पेमेंट्स आणि ई-गव्हर्नन्स या क्षेत्रांतील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबतचे तांत्रिक कौशल्य आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण केली जाईल.
2. नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (एनसीजीजी) मार्फत भारतामध्ये नेपाळी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाईल.
3. राष्ट्रीय आणि प्रांतीय स्तरावरील विधिमंडळांमध्ये दोन्ही बाजूंकडून अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धती सामायिक केल्या जातील.
4. भारतातील संबंधित संस्थांमध्ये परस्पर भेटी आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य कारभारातील सहकार्य अधिक बळकट केले जाईल.
5. तंत्रज्ञान, अवकाश आणि नवोन्मेष:
तंत्रज्ञानाचा अधिकाधिक स्वीकार आणि वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच तंत्रज्ञानाचे केंद्र बनण्याच्या नेपाळच्या उद्दिष्टाशी सुसंगत राहून आणि या क्षेत्रांतील भारताची सामर्थ्यस्थळे विचारात घेऊन, भारत-नेपाळ भागीदारीद्वारे खालीलप्रमाणे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जाईल:
i. भारतातील नेपाळी स्टार्टअप्सना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणे, काठमांडू येथे ‘स्टार्टअप सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि पोखरा येथे ‘डिजिटल नोमॅड्स अँड इनोव्हेशन हब’ स्थापन करणे यांसह भारत-नेपाळ स्टार्टअप भागीदारी नेटवर्कचा (IN-SPAN) विस्तार करणे.
ii. खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन नेपाळमध्ये डिजिटल पार्क्स आणि डेटा सेंटर्सचा विकास करणे.
iii.’भाषिणी’ (Bhashini) सोबतच्या सहकार्याद्वारे नेपाळी भाषेसाठी लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) विकसित करण्यासह कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवणे.
iv. उपग्रह विकास, पृथ्वी निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापनासाठी रिमोट सेन्सिंग आणि क्षमता बांधणीसाठी नेपाळ अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी व संबंधित नेपाळी संस्थांचे इस्रो (ISRO) आणि इन-स्पेस (IN-SPACE) सोबतचे सहकार्य वाढवून अंतराळ क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करणे.
v. 5G/6G आणि इतर पुढील पिढीच्या नेटवर्क्ससारख्या उदयोन्मुख दूरसंचार तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवणे.
VI. शिक्षण आणि कौशल्य विकास:
कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीचे महत्त्व ओळखून, दोन्ही देश प्रशिक्षण, मानव संसाधन विकास आणि शैक्षणिक देवाणघेवाणीमध्ये अधिक मजबूत सहकार्य साध्य करण्यासाठी कार्य करतील, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश असेल:
i.नेपाळमध्ये नामांकित भारतीय उच्च शैक्षणिक संस्थांच्या शाखा/परिसर (कॅम्पस) सुरू करण्याच्या शक्यता तपासल्या जातील, ज्याची सुरुवात आयआयटीने (IIT) होईल.
ii. सध्या सुरू असलेल्या अत्यंत यशस्वी शिष्यवृत्ती योजनांच्या आधारावर, नेपाळी विद्यार्थ्यांसाठी विधी (कायदा), तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या नवीन शाखांमध्ये शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षणाच्या संधींचा समावेश केला जाईल.
iii. शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्थांमधील अधिक मजबूत सहकार्याव्यतिरिक्त प्राध्यापक आणि तज्ज्ञांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन दिले जाईल आणि तिला संस्थात्मक स्वरूप दिले जाईल.
iv. उत्पादन, सेवा आणि उद्योजकता या क्षेत्रांशी संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण नेपाळच्या तरुणांना देण्यासाठी भारतीय सहाय्याने एक व्यावसायिक प्रशिक्षण संस्था स्थापन केली जाईल.
VII. क्रीडा:
नेपाळने क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीवर आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासावर दिलेला भर अधिक बळकट करण्यासाठी भारत आणि नेपाळ खालील मुख्य उपक्रमांवर एकत्रितपणे कार्य करतील:
i. नेपाळमध्ये राष्ट्रीय आणि प्रांतीय स्तरावरील क्रिकेट पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठिंबा देण्याव्यतिरिक्त, राष्ट्रीय क्रिकेट कोचिंग/प्रशिक्षण अकादमी स्थापन करण्यासाठी भारत सहाय्य करेल.
ii.नेपाळच्या प्रांतीय क्रिकेट संघांतील खेळाडूंना भारतातील राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमींमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.
iii. नेपाळमध्ये आधुनिक बहु-क्रीडा केंद्रे (multi-sports centers) विकसित करण्यासह बॅडमिंटन, टेनिस, नेमबाजी आणि अॅथलेटिक्स यांसारख्या इतर खेळांमध्येही अशाच प्रकारच्या संधींचा शोध घेतला जाईल.
iv. संयुक्त मोहिमा हाती घेण्यासह पर्वतीय खेळांमध्ये सहकार्य करण्याच्या शक्यतांची चाचपणी केली जाईल.
v. क्रिकेट, फूटबॉल आणि इतर खेळांच्या परस्परांच्या क्रीडा लीगमध्ये भारत आणि नेपाळच्या खेळाडूंना सहभागी होण्याच्या संधी शोधण्यासाठी दोन्ही देशांतील संबंधित क्रीडा संस्था/प्राधिकरणांना प्रोत्साहित केले जाईल.
VIII. संस्कृती आणि पर्यटन:
दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध हे द्विपक्षीय संबंधांच्या सर्वात महत्त्वाच्या आधारस्तंभांपैकी एक आहेत. हा चेतनादायी संवाद अधिक समृद्ध करण्यासाठी:
i.धार्मिक पर्यटन परिपथ (सर्किट्स) आणि नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी भारत आणि नेपाळ भागीदारी करतील. यामध्ये जनकपूर–अयोध्या, लुंबिनी–बोधगया–सारनाथ–कुशीनगर आणि काठमांडू (पशुपतीनाथ)–वाराणसी यांना जोडून तसेच भगिनी-शहर (सिस्टर-सिटी) करारांद्वारे रामायण, बौद्ध आणि शिव-शक्ती परिमंडलांचा विकास करणे समाविष्ट असेल.
ii.नेपाळ आणि भारतात आलटून-पालटून वार्षिक युवा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याचे आणि चित्रपट निर्मिती, रंगभूमी व ललित कला क्षेत्रातील कलाकारांसाठी प्रशिक्षण व देवाणघेवाणीचा विस्तार करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.
iii.लुंबिनी बौद्ध विद्यापीठात (LBU) ‘नालंदा केंद्र’ स्थापन करून नालंदा विद्यापीठ आणि लुंबिनी बौद्ध विद्यापीठ यांच्यातील सहकार्य अधिक दृढ केले जाईल.
iv.पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील युवा उद्योजकांमधील सहकार्याला चालना देण्याचे आणि दुहेरी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व कंटेंट क्रिएटर्सच्या फॅमिलियरायजेशन व्हिजिट्स अर्थात परिचय दौऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.
IX. आरोग्य
नेपाळमध्ये मूलभूत आरोग्य सेवेची एकात्मिक व्यवस्था उभारण्यावर नेपाळ सरकारने दिलेला भर हा भारताच्या आरोग्यविषयक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. ही सुसंगती लक्षात घेऊन आणि सहकार्य बळकट करण्यासाठी दोन्ही देश पुढीलप्रमाणे कार्य करतील –
i. नेपाळ सरकारच्या गरजांनुसार आरोग्य केंद्रे, प्रसूती केंद्रे आणि रुग्णालयांच्या बांधकामासाठी उच्च परिणामकारक सामुदायिक विकास प्रकल्प (एचआयसीडीपी)कार्यपद्धतीअंतर्गत प्रकल्प हाती घेऊन आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा बळकट करणे.
ii. नेपाळच्या राष्ट्रीय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अद्ययावतीकरणासाठी सहकार्य.
iii. परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषधे सहज उपलब्ध करून देण्यासाठी भारत–नेपाळ जनौषधी केंद्रांची स्थापना करणे.
iv. नेपाळमधील आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या क्षमता बांधणीसाठी भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य कार्यक्रम – आयटीईसी – अंतर्गत आरोग्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
v. भारत आणि नेपाळमधील अग्रगण्य वैद्यकीय संस्थांमध्ये परस्परसंबंध विकसित करणे आणि विद्यार्थी व प्राध्यापकांना परस्परदेशांत भेटी देण्यास प्रोत्साहित करणे.
vi. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नेपाळ आरोग्य संशोधन परिषद (एनएचआरसी), तसेच भारताच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था – सीडीएससीओ आणि नेपाळच्या औषध प्रशासन विभागाच्या औषध नियामक प्राधिकरणांमधील संशोधन सहकार्य बळकट करणे.
X. कृषी
कृषी क्षेत्रात भारत आणि नेपाळ यांच्यात अनुभवांची देवाणघेवाण, प्रशिक्षण आणि आराखडा दस्तऐवजांना अंतिम स्वरूप देणे यांसह लक्षणीय परस्पर सहकार्य आहे. आगामी काळात हे सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देश पुढीलप्रमाणे कार्य करतील –
i. नेपाळच्या कृषी उत्पादनांमध्ये मूल्यवर्धनासाठी चितवन इथे कृषी-औद्योगिक परिसराच्या स्थापनेसाठी भारत अनुदान देईल.
ii. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि नेपाळ कृषी संशोधन परिषद (एनएआरसी) यांच्या 2026 ते 2030 या काळासाठी कार्ययोजनेच्या अंमलबजावणीला गती देणे.
iii. नेपाळमधील अधिकारी, शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित इतर व्यावसायिकांच्या क्षमता बांधणीसाठी कृषी आणि पशुपालनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
iv. नेपाळमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे, आघाडीच्या कृषी विद्यापीठांमध्ये परस्परसंबंध प्रस्थापित करणे आणि नेपाळमधील अधिकारी, शेतकरी व उद्योजकांसाठी कृषी आणि पशुपालन क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती
दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी नेपाळचे परराष्ट्र सचिव आणि भारताचे राजदूत यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय देखरेख गट सक्रिय करण्याचा निर्णय घेतला. हा गट दर सहा महिन्यांतून किमान एकदा बैठक घेईल आणि नियोजित प्रकल्प, संकल्पना व उपक्रम यांच्या अंमलबजावणीला गती मिळेल याची खात्री करेल, तसेच संबंधित परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करेल.
उच्चस्तरीय देखरेख गट आपला अहवाल भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सहअध्यक्षतेखालील भारत–नेपाळ संयुक्त आयोगाला सादर करेल यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. भारत–नेपाळ संयुक्त आयोगाची पुढील बैठक 2027 मध्ये आयोजित करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.
या संयुक्त दृष्टिकोन दस्तऐवजामुळे भारत आणि नेपाळ यांच्या महत्त्वाकांक्षी, आधुनिक आणि परस्पर लाभदायक भागीदारीसाठीचा आराखडा उपलब्ध झाला आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या सामायिक दृष्टिकोनाच्या प्रत्यक्ष पूर्ततेसाठी कार्य करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/भक्ती सोनटक्के/शैलेश पाटील/वैभवी जोशी/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai