Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळच्या पंतप्रधानांसोबत प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या संयुक्त निवेदनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन


नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026

महामहीम, पंतप्रधान बालेन्द्र शाह महोदय,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांमधील सहकारी,

नमस्कार!

नेपाळचे पंतप्रधान बनल्यावर आपल्या पहिल्या द्विपक्षीय भेटीवर आलेले बालेंद्र शाह महोदयांचे भारतात स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे.

काही महिन्यांपूर्वी ज्यावेळी जगातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्रांना संबोधित केले होते, त्यावेळी त्यांच्या दूरदृष्टीची स्पष्ट झलक दिसून आली होती आणि आज गेल्या काही तासात झालेल्या चर्चेदरम्यान, नेपाळचे भविष्य आणि भारत-नेपाळ संबंधांविषयीचा त्यांचा स्पष्ट दृष्टीकोन आणि बांधिलकी  मला जाणवली आहे. या वर्षी नेपाळच्या जनतेने त्यांना जो ऐतिहासिक जनादेश दिला आहे, तो नेपाळच्या नव्या पिढीच्या आकांक्षा आणि अपेक्षा दर्शवत आहे.

सशक्त आणि समृद्ध नेपाळच्या विकास प्रवासात भारत नेहमीच सहभागी राहिला आहे. याच भावनेतून आज आम्ही आमचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी महत्त्वाचे अनेक निर्णय घेतले आहेत.

मित्रांनो,

भारत आणि नेपाळ यांच्यात केवळ शेजारी हेच नाते नाही, तर आपुलकी आणि अतूट विश्वासाचे नाते आहे. आमच्या आनंदात आणि आव्हानांतही समानता आहे. आम्ही एकमेकांच्या प्रगतीत सोबती आहोत आणि कठीण काळात एकमेकांचा आधारही आहोत.

ऑगस्टमध्ये नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल आम्ही तीव्र संवेदना व्यक्त करतो. आणि आज, नेपाळच्या पुनर्बांधणीला आणि दीर्घकालीन विकासाला नवी बळकटी देण्यासाठी आम्ही 24,000 कोटी नेपाळी रुपयांच्या विकास सहकार्य पॅकेजची  घोषणा करतो.

पूरग्रस्त कुटुंबांचे जीवन पुन्हा पूर्वपदावर यावे, नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि भविष्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी नेपाळची क्षमता अधिक मजबूत व्हावी, हा आमचा संकल्प असेल.

मित्रांनो,

भारत आणि नेपाळचे संबंध सामायिक इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि परस्परांच्या नागरिकांमधील दृढ लोकसंवादाच्या  धाग्यांनी विणलेले आहेत. भगवान राम आणि सीता माता ही आमच्या सामायिक संस्कृतीची आणि श्रद्धेची ओळख आहे. 2018 मध्ये जनकपूरच्या पवित्र भूमीवर मी म्हटले होते, “नेपाळशिवाय आमचे धाम अपूर्ण आहेत, नेपाळशिवाय आमचे रामही अपूर्ण आहेत.”

2024 मध्ये अयोध्येत रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली. या ऐतिहासिक प्रसंगाने आमच्या सामायिक श्रद्धेला नवी ऊर्जा दिली. तेव्हापासून कोट्यवधी भाविक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. 2025 मध्येच देशभरातून आणि जगभरातून सुमारे 30 कोटी भाविकांनी अयोध्येला भेट दिली.

आज सुरु करण्यात आलेल्या सरयू-कमला एक्सप्रेस’ रेल्वे सेवेद्वारे आम्ही या पवित्र नात्याला  एक नवा आयाम देत आहोत. यामुळे आता अयोध्येला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना जनकपूरला जाऊन सीतामातेचे दर्शन घेणे अधिक सुलभ होईल.

आम्ही लुंबिनी आणि बोधगया यांच्यासह दोन्ही देशांमधील  बौद्ध आणि शिव-शक्तीशी  निगडित पवित्र स्थळांमधील संपर्क सुविधा वाढवण्यासाठीही एकत्र काम करू.

मित्रांनो,

आज आम्ही उत्तराखंड आणि नेपाळ दरम्यान धारचुला रस्ते पुलाचे उद्घाटन केले तसेच बनबसा येथील एकात्मिक तपासणी चौकीची  पायाभरणी केली. त्याचबरोबर ,आम्ही नेपाळ कडील बाजूला असलेल्या दोधारा-चांदनी एकात्मिक तपासणी चौकीच्या कामालाही गती देऊ. या उपक्रमांमुळे उत्तराखंड आणि नेपाळ दरम्यान व्यापार आणि लोकांची ये-जा अधिक सुलभ होईल.

याव्यतिरिक्त, बिहार व उत्तर प्रदेश आणि भारतातील इतर राज्ये आणि  नेपाळ  दरम्यान रस्ते, रेल्वे आणि सीमा संपर्कविषयक प्रकल्पांना देखील नवी गती देऊ. नेपाळच्या पारगमन व्यापाराला (transit trade) अधिक सुलभ करण्यासाठी, आम्ही त्यांना कांडला आणि पारादीप बंदरांचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ. मला विश्वास आहे की, व्यापार, संपर्क आणि गुंतवणुकीला चालना देणाऱ्या या उपक्रमांमुळे नेपाळच्या आर्थिक विकासाला नवी गती मिळेल.

मित्रांनो ,

नेपाळच्या नद्यांमध्ये स्वच्छ ऊर्जेची प्रचंड क्षमता आहे. या क्षमतेचा वापर करून, भारताची विशाल ऊर्जा बाजारपेठ नेपाळच्या आर्थिक समृद्धीचा एक भक्कम पाया ठरू शकते.

आज ‘लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पा’ची (Lower Arun Hydroelectric Project) पायाभरणी आणि ‘अरुण-3’ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याप्रति आमची कटिबद्धता, याच दूरदृष्टीचा एक भाग आहे.

मित्रांनो,

भारत अनेक वर्षांपासून  नेपाळसाठी  पेट्रोलियम उत्पादने आणि इतर आवश्यक वस्तूंचा विश्वासार्ह पुरवठादार राहिला आहे. आमच्या ‘शेजारी प्रथम’  धोरणांतर्गत, यावर्षी इंधन पुरवठ्याबाबत गंभीर आव्हाने असूनही, आम्ही नेपाळला इंधन, खते आणि इतर आवश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुरू ठेवला. 

आज मोतिहारी-अमलेखगंज पाइपलाईनच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आणि झापा पेट्रोलियम केंद्राच्या पायाभरणीने आपल्यातील भागीदारी अधिक मजबूत होईल.

मित्रांनो ,

नेपाळ मधील युवा पिढी प्रतिभावंत, चैतन्यशील  आणि मोठ्या महत्वाकांक्षा बाळगणारी  आहे. त्यांची स्वप्ने साकार करण्यात भारत पूर्ण वचनबद्धतेने सहकार्य करु इच्छितो.

या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आम्ही नेपाळ मध्ये स्टार्ट अप इन्क्युबेटर, नवोन्मेष केंद्र आणि आय आय टी म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे भारताबाहेरील केंद्र स्थापन करणार आहोत.

आम्ही नेपाळ मधील विद्यार्थ्यांसाठी भारतात विधी आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात शिष्यवृत्तीच्या संधी अधिक वाढवणार आहोत. त्याचबरोबर अन्नप्रक्रिया आणि मूल्यवर्धन क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्ही नेपाळ मध्ये कृषी औद्योगिक पार्क विकसित करण्यात देखील सहकार्य करणार आहोत.

मित्रांनो,

चित्रपट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहायाने रामायणाची कथा आज नवीन पिढीसह संपूर्ण जगभरात पोहोचत आहे. आमची अशी इच्छा आहे की भारत आणि नेपाळमधील सर्जनशील युवकांनी आपला सामायिक वारसा  नवीन माध्यमांच्या सहाय्याने जगापर्यंत पोहोचवावा. याच उद्देशाने आम्ही आगामी वेव्ह्ज शिखर परिषदेत नेपाळच्या एका मोठ्या प्रतिनिधिमंडळाचे स्वागत करणार आहोत.

क्रीडाक्षेत्रात, विशेषतः क्रिकेटच्या दृष्टीने देखील आम्ही नेपाळमध्ये पायाभूत सुविधांचा विकास आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणात सहकार्य वाढवणार आहोत.

महामहिम,

आज आपण आपल्या सामायिक भविष्याला नवीन दिशा देण्याच्या उद्देशाने   एक संयुक्त दृष्टिकोन दस्तऐवज  प्रसिद्ध करत आहोत. हे विकसित भारत आणि समृद्ध नेपाळच्या आपल्या आपल्या स्वप्नांना एकत्र मिळून साकार करण्यासाठी एक संयुक्त आराखडा आहे.

आमचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, परस्परांप्रती दृढ विश्वास आहे आणि ते साकार करण्यासाठी आवश्यक सामर्थ्य देखील आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या पाठीशी सीतामाई, श्रीराम आणि भगवान बुद्ध यांचा आशीर्वाद आहे.

मला खात्री आहे की याच भावनेने, आपण आपला सामायिक दृष्टिकोन ठोस यशामध्ये रूपांतरित करू तसेच, एकत्रितपणे भारत-नेपाळ संबंधांचा एक नवा सुवर्ण अध्याय लिहू.

भारत–नेपाळ मैत्री अमर राहो!

आपले मनःपूर्वक आभार!

 
निलीमा चितळे/शैलेश पाटील/सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai