Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 10 आणि 11 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 आणि 11 मे 2026 रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 10 मे रोजी उशिरा रात्री त्यांचे जामनगरमध्ये आगमन होईल. त्यानंतर, 11 मे रोजी सकाळी साधारण 10:15 वाजता पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होतील. तिथला कार्यक्रम आटोपून पंतप्रधान वडोदरासाठी रवाना होतील. संध्याकाळी साधारण 6 वाजता त्यांच्या हस्ते सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन होईल. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

पंतप्रधानांचे सोमनाथमधील कार्यक्रम

पंतप्रधान सोमनाथ इथल्या पवित्र मंदिरात आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होणार आहेत. सोमनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. हे मंदिर भारताची अढळ श्रद्धा आणि नागरी सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानले जाते. सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी होऊन  उद्घाटन झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.

या महोत्सवाचा भाग म्हणून पंतप्रधान विविध मंगल, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी ते विशेष महापूजाही करणार आहेत. यानंतर त्यांच्या हस्ते कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. मंदिराच्या कळसाचे पूजन आणि मंदिरावर ध्वज फडकवण्याचे विधीही पार पडणार आहेत. 

या ऐतिहासिक क्षणाचे आणि सोमनाथच्या आध्यात्मिक महत्त्वाचे स्मरण म्हणून यानिमीत्ताने पंतप्रधानांच्या हस्ते एक विशेष स्मरणिका टपाल तिकीट आणि नाण्याचे प्रकाशनही केले जाणार आहे.

पंतप्रधानांचे वडोदरा येथील कार्यक्रम

पंतप्रधानांच्या हस्ते वडोदरा येथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत 1,000 मुले आणि 1,000 मुलींच्या राहण्याची स्वतंत्र सोय असलेले वसतीगृह उभारण्यात आले आहे. या वसतीगृहात एक मोठा भोजन कक्ष, ग्रंथालय आणि सभागृह यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी पंतप्रधान सरदारधाम संकुलातील स्वागत कक्ष, नागरी सुविधा, भोजन क्षेत्र आणि ई ग्रंथालय अशा विविध सुविधा स्थळांना भेट देऊन पाहणीही करणार आहेत.

***

आशिष सांगळे / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai