Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित


 

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित केले. या परिषदेत गेल्या तीन दिवसांत पारंपारिक औषध क्षेत्रातील जगभरातील तज्ज्ञांनी गंभीर आणि अर्थपूर्ण चर्चा केली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यात भारत एक मजबूत व्यासपीठ म्हणून काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि या प्रक्रियेत जागतिक आरोग्य संघटनेच्या सक्रिय भूमिकेची दखलपूर्ण नोंदही त्यांनी घेतली. शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकारचे आयुष मंत्रालय आणि उपस्थित सर्व सहभागींचे मनापासून आभारही मानले.

​जामनगरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपारिक औषधोपचारांवरील जागतिक केंद्र स्थापन होणे हा भारताचा बहुमान आणि अभिमानाची बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 2022 मध्ये, पहिल्या पारंपारिक औषध शिखर परिषदेदरम्यान, जगाने मोठ्या विश्वासाने ही जबाबदारी भारतावर सोपवली होती याचे स्मरण त्यांनी करून दिले. या केंद्राची प्रतिष्ठा आणि प्रभाव जागतिक स्तरावर विस्तारत आहे ही सर्वांसाठी आनंदाची बाब असून या शिखर परिषदेचे यश हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे असे ते म्हणाले. पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा संगम या शिखर परिषदेत पाहायला मिळाला, या परिषदेत सर्वांगीण आरोग्याचे भविष्य बदलू शकतात असे अनेक नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत ही बाबही त्यांनी नमूद केली. विविध देशांचे आरोग्य मंत्री आणि प्रतिनिधी यांच्यातील संवाद या शिखर परिषदेमुळे सुलभ झाला असून, यामुळे संयुक्त संशोधनाला चालना देणे, नियम सोपे करणे तसेच प्रशिक्षण आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी नवीन मार्ग खुले झाले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. हे सहकार्य भविष्यात पारंपारिक औषधोपचार अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या​शिखर परिषदेदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेल्या  सहमतीतून जागतिक भागीदारीची ताकद दिसून येते असे ते म्हणाले. संशोधनाला बळकटी देणे, पारंपारिक औषध क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि जगभरात विश्वासार्ह ठरेल अशी नियामक चौकट तयार केल्याने पारंपारिक औषधोपचारांना मोठे बळ मिळेल असे त्यांनी सांगितले. या परिषदेनिमीत्त आयोजित केलेल्या प्रदर्शनात डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ताधारित साधने, संशोधन विषयक नवोन्मेष आणि आधुनिक कल्याणकारी पायाभूत सुविधांचे प्रदर्शन आहे, या सगळ्यातून एकत्रितपणे परंपरा आणि तंत्रज्ञान यांच्यातील नव्या सहकार्याचे दर्शन घडते असे त्यांनी नमूद केले. जेव्हा परंपरा आणि तंत्रज्ञान एकत्र येतात, तेव्हा जागतिक आरोग्यविषयक स्थितीवर अधिक प्रभाव पाडण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढते आणि म्हणूनच या शिखर परिषदेचे यश जागतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे, ही बाब पंतप्रधानांनी ठळकपणे अधोरेखित केली.

योग हा पारंपरिक औषध प्रणालीचा अविभाज्य भाग असून त्याने संपूर्ण जगाला आरोग्य, संतुलन आणि सुसंवादाचा मार्ग दाखवला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या प्रयत्नांमुळे आणि 175 हून अधिक देशांच्या पाठिंब्याने, संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. अलिकडच्या वर्षांत योग जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे, असे ते म्हणाले. योगाच्या प्रचार आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी कौतुक केले. आज काही मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून या सन्माननीय व्यक्तींची निवड एका प्रतिष्ठित परीक्षक मंडळाने कठोर प्रक्रियेतून केली असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुरस्कार विजेते योगाप्रती समर्पण, शिस्त आणि आजीवन वचनबद्धतेचे प्रतीक असून त्यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या परिषदेच्या निष्कर्षांना कायमस्वरूप देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत, याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधानांनी पारंपरिक औषध जागतिक ग्रंथालयाच्या शुभारंभावर प्रकाश टाकला. हे ग्रंथालय एक जागतिक व्यासपीठ म्हणून पारंपरिक औषधांशी संबंधित वैज्ञानिक डेटा आणि धोरणात्मक दस्तऐवज एकाच ठिकाणी जतन करेल, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे उपयुक्त माहिती प्रत्येक देशापर्यंत समान रीतीने पोहोचणे सोपे होईल, हे त्यांनी अधोरेखित केले. या ग्रंथालयाची घोषणा भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात पहिल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक परिषदेत करण्यात आली होती, याचे स्मरण पंतप्रधानांनी केले आणि आज ती वचनबद्धता पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध देशांच्या आरोग्यमंत्र्यांनी जागतिक भागीदारीचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, भागीदार म्हणून मानके, सुरक्षितता आणि गुंतवणूक यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. या संवादामुळे दिल्ली जाहीरनाम्याचा मार्ग मोकळा झाला आहे, जो आगामी वर्षांसाठी एक सामायिक मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी विविध देशांच्या प्रतिष्ठित मंत्र्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

आज दिल्लीत जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय  आशिया प्रादेशिक कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले असून ते भारताकडून दिलेले एक नम्र योगदान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हे कार्यालय संशोधन, नियमन आणि क्षमता बांधणीला चालना देण्यासाठी एक जागतिक केंद्र म्हणून काम करेल, हे त्यांनी स्पष्ट केले.

भारत जगभरात आरोग्याच्या क्षेत्रातील भागीदारीवर लक्ष केंद्रित करत आहे, यावर जोर देत पंतप्रधान मोदींनी दोन महत्त्वपूर्ण सहकार्यांची माहिती दिली. पहिले म्हणजे दक्षिण आणि आग्नेय  आशियाचा समावेश असलेल्या बिमस्टेक देशांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना आणि दुसरे म्हणजे विज्ञान, पारंपरिक पद्धती आणि आरोग्य यांचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने जपानसोबतचे सहकार्य.

या परिषदेची संतुलन पुनर्संचयित करणे: आरोग्य आणि निरामयता  विज्ञान आणि सरावही संकल्पना, सर्वांगीण आरोग्याच्या मूलभूत विचाराचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आयुर्वेद संतुलनालाच आरोग्य मानतो आणि ज्यांच्या शरीरात हे संतुलन टिकून राहते, तेच खऱ्या अर्थाने निरोगी असतात, हे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, आज मधुमेह, हृदयविकाराचा झटका, नैराश्य ते कर्करोगापर्यंतच्या अनेक आजारांची मूळ कारणे जीवनशैली आणि असंतुलन हीच आहेत, ज्यात कामाच्या आणि वैयक्तिक जीवनातील असंतुलन, आहारातील असंतुलन, झोपेतील असंतुलन, आतड्यातील सूक्ष्मजीवांचे असंतुलन, उष्मांकांचे असंतुलन आणि भावनिक असंतुलन यांचा समावेश आहे. या असंतुलनांमुळे अनेक जागतिक आरोग्य आव्हाने निर्माण होत आहेत, असे अभ्यासातून आणि आकडेवारीतून सिद्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य तज्ञांना हे अधिक चांगल्या प्रकारे समजते, असेही ते म्हणाले. संतुलन पुनर्संचयित करणेहा केवळ एक जागतिक मुद्दा नाही, तर एक जागतिक निकड आहे आणि यासाठी वेगवान पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.

21 व्या शतकात जीवनात संतुलन राखण्याचे आव्हान आणखी मोठे होणार आहे, यावर भर देत पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्ससह नवीन तांत्रिक युगाचा उदय हा मानवी इतिहासातील सर्वात मोठे परिवर्तन आहे. येत्या काही वर्षांत जगण्याची पद्धत अभूतपूर्व रीतीने बदलणार आहे, असेही ते म्हणाले. अशा अचानक होणाऱ्या जीवनशैलीतील बदलांमुळे, तसेच शारीरिक श्रमाशिवाय संसाधने आणि सुविधांच्या सोयीमुळे मानवी शरीरासमोर अनपेक्षित आव्हाने निर्माण होतील, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. पारंपरिक आरोग्यसेवेने केवळ सध्याच्या गरजांवरच लक्ष केंद्रित करू नये, तर भविष्यातील जबाबदाऱ्यांकडेही लक्ष दिले पाहिजे, जी सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे पंतप्रधानांनी सुचवले.

जेव्हा पारंपरिक औषधांवर चर्चा होते, तेव्हा सुरक्षितता आणि तथ्य यासंबंधीचा एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. भारत या दिशेने सातत्याने काम करत आहे, यावर त्यांनी भर दिला. या परिषदेत अश्वगंधाचे उदाहरण सादर करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले. अश्वगंधाचा वापर भारताच्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालीमध्ये शतकानुशतके केला जात आहे, यावर त्यांनी जोर दिला. कोविड-19 च्या काळात अश्वगंधाची जागतिक मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि अनेक देशांमध्ये तिचा वापर सुरू झाला, असे ते म्हणाले. भारत आपल्या संशोधन आणि पुराव्यांवर आधारित प्रमाणीकरणाद्वारे अश्वगंधाला विश्वासार्ह पद्धतीने पुढे नेत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. या शिखर परिषदेत अश्वगंधावर एक विशेष जागतिक चर्चा आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय तज्ञांनी अश्वगंधाची सुरक्षितता, गुणवत्ता आणि वापराबाबत सखोल विचारमंथन केले, असे त्यांनी नमूद केले. अशा काळाच्या कसोटीवर उतरलेल्या औषधी वनस्पतींना जागतिक सार्वजनिक आरोग्याचा भाग बनवण्यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.

पारंपरिक वैद्यकशास्त्र केवळ आरोग्य किंवा जीवनशैलीपुरतेच मर्यादित आहे, अशी एक धारणा पूर्वी होती, परंतु आज ही धारणा वेगाने बदलत आहे, असे अधोरेखित करत मोदी म्हणाले की, पारंपरिक वैद्यकशास्त्र गंभीर परिस्थितीतही प्रभावी भूमिका बजावू शकते आणि भारत याच दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करत आहे. आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राने एक नवीन उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.त्यांनी नमूद केले की, भारतात एकात्मिक कर्करोग उपचारांना बळकटी देण्यासाठी या दोघांनी संयुक्त प्रयत्न केले असून याअंतर्गत पारंपरिक वैद्यकीय प्रणालींना आधुनिक कर्करोग उपचारांशी जोडले जाईल. त्यांनी यावर जोर दिला की, या उपक्रमामुळे तथ्य-आधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासही मदत होईल. पंतप्रधानांनी सांगितले की, भारतातील अनेक महत्त्वाच्या संस्था पंडुरोग, संधिवात आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांवर क्लिनिकल अभ्यास करत आहेत. त्यांनी सांगितले की, भारतातील अनेक स्टार्टअप्सनीही या क्षेत्रात प्रवेश केला असून आता युवा ऊर्जा प्राचीन परंपरेशी जोडली जात आहे. त्यांनी अधोरेखित केले की, या सर्व प्रयत्नांमुळे पारंपरिक औषधोपचार नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की, पारंपरिक औषधोपचार आज एका निर्णायक वळणावर उभे आहेत. त्यांनी अधोरेखित केले की, जगातील लोकसंख्येचा एक मोठा वर्ग दीर्घकाळापासून यावर अवलंबून आहे, तरीही प्रचंड क्षमता असूनही पारंपरिक औषधोपचारांना जे स्थान मिळायला हवे होते, ते मिळालेले नाही. त्यांनी यावर भर दिला की, विज्ञानाच्या माध्यमातून विश्वास संपादन केला पाहिजे आणि त्याचा आवाका आणखी वाढवला पाहिजे. ही जबाबदारी कोणत्याही एका राष्ट्राची नसून, ती सर्वांची सामायिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी नमूद केले की, या परिषदेत गेल्या तीन दिवसांत दिसून आलेला सहभाग, संवाद आणि वचनबद्धता यामुळे हा विश्वास दृढ झाला आहे की जग या दिशेने एकत्र पुढे जाण्यास तयार आहे. त्यांनी सर्वांना विश्वास, आदर आणि जबाबदारीने पारंपरिक वैद्यकशास्त्राला पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आणि परिषदेच्या यशाबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम घेब्रेयसस, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, प्रतापराव जाधव आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

पारंपरिक औषधोपचारांवरील दुसऱ्या जागतिक डब्ल्यूएचओ शिखर परिषदेच्या कार्यक्रमामुळे जागतिक, विज्ञान-आधारित आणि लोक-केंद्रित पारंपरिक औषधोपचार कार्यक्रम तयार करण्यामध्ये भारताचे वाढते नेतृत्व आणि पथदर्शी पुढाकार अधोरेखित होतो.

पंतप्रधानांनी संशोधन, प्रमाणीकरण आणि जागतिक सहकार्याच्या माध्यमातून पारंपरिक औषध प्रणाली आणि भारतीय ज्ञान प्रणालीला मुख्य प्रवाहात आणण्यावर सातत्याने भर दिला आहे. या दृष्टिकोनाला अनुसरून या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी आयुष क्षेत्रासाठी एक मास्टर डिजिटल पोर्टल असलेल्या माय आयुष इंटिग्रेटेड सर्व्हिसेस पोर्टल (MAISP)’ सह अनेक महत्त्वपूर्ण आयुष उपक्रमांचा प्रारंभ केला. त्यांनी आयुष मार्कचेही अनावरण केले, ज्याची कल्पना आयुष उत्पादने आणि सेवांच्या गुणवत्तेसाठी जागतिक मापदंड म्हणून करण्यात आली आहे.

या प्रसंगी पंतप्रधानांनी योगविद्या प्रशिक्षणावरील जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक अहवाल आणि “फ्रॉम रूट्स टू ग्लोबल रीच: आयुषमधील परिवर्तनाची 11 वर्षे” हे पुस्तक यांचे प्रकाशन केले. त्यांनी भारताच्या पारंपरिक औषधोपचार वारशाच्या जागतिक प्रतिध्वनीचे प्रतीक असलेल्या अश्वगंधावरील एक स्मारक टपाल तिकीट देखील जारी केले.

पंतप्रधानांनी दिल्लीतील जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन आग्नेय  आशिया प्रादेशिक कार्यालयाच्या संकुलाचेही उद्घाटन केले, जिथे जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे कंट्री कार्यालयही असेल. हा जागतिक आरोग्य संघटनेसोबतच्या भारताच्या भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

पंतप्रधानांनी 2021-2025 या वर्षांसाठी योगविद्या प्रचार आणि विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात येणाऱ्या पंतप्रधान पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला, आणि योगाप्रती त्यांचे अविरत समर्पण व त्याच्या जागतिक प्रसारातील योगदानाची दखल घेतली. संतुलन, कल्याण आणि सुसंवादासाठी योगविद्या ही एक कालातीत प्रथा असल्याचे यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून यामुळे एका निरोगी आणि सशक्त नवीन भारताच्या निर्मितीस हातभार लागत आहे.

पंतप्रधानांनी पारंपरिक औषध शोध दालनालाही भेट दिली, या प्रदर्शनात भारत आणि जगभरातील पारंपरिक औषध ज्ञान प्रणालींची विविधता, सखोलता आणि समकालीन प्रासंगिकता यांचे दर्शन घडते.

जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने संयुक्तपणे आयोजित केलेली ही शिखर परिषद 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे “संतुलन पुनर्स्थापित करणे: आरोग्य आणि निरामयता  विज्ञान आणि चिकित्सा” या संकल्पनेखाली आयोजित केली होती. या शिखर संमेलनात जागतिक नेते, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, चिकित्सक, स्थानिक ज्ञानधारक आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधी यांच्यात न्याय्य, शाश्वत आणि पुराव्यांवर आधारित आरोग्य प्रणालींना चालना देण्याबाबत सखोल विचारमंथन झाले.

***

निलिमा चितळे/तुषार पवार/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com