Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बांग्लादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यादरम्यान 5 ऑक्टोबर रोजी द्विपक्षीय प्रकल्पांच्या व्हिडिओ उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


महामहीम, पंतप्रधान शेख हसीना,

मित्रहो,

नमस्कार

शबाइके शारोदीयो शुभेच्छा

मला आनंद आहे की पंतप्रधान शेख हसीना यांच्याबरोबर आणखी तीन द्विपक्षीय प्रकल्पांचे उद्‌घाटन करण्याची संधी मला मिळाली. गेल्या एक वर्षात आम्ही विडिओ लिंकच्या माध्यमातून 9 प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. आजचे तीन प्रकल्प जोडून आम्ही एका वर्षात आम्ही एक डझन संयुक्त प्रकल्प सुरु केले आहेत. या कामगिरीबद्दल मी दोन्ही देशांचे अधिकारी आणि नागरिकांचे अभिनंदन करतो.

आजचे तीन प्रकल्प वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत- एलपीजी आयात, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सामाजिक सुविधा. मात्र या तिन्ही प्रकल्पांचा उद्देश एकच आहे. आणि तो आहे- आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारणे. हाच भारत-बांगलादेश संबंधांचा मूलमंत्र देखील आहे. आपल्या मैत्रीद्वारे आपल्या प्रत्येक नागरिकाचा विकास सुनिश्चित करणे हा भारत-बांगलादेश भागीदारीचा पाया आहे.

बांग्लादेशमधून एलपीजीचा घाऊक पुरवठा दोन्ही देशांना लाभदायक ठरेल.  यामुळे बांग्लादेशमध्ये निर्यात, उत्पन्न आणि रोजगार वाढेल. वाहतुकीचे अंतर 1500 किलोमीटरने कमी झाल्यामुळे आर्थिक लाभ देखील होईल आणि पर्यावरणाचे नुकसान कमी होईल. दुसरा प्रकल्प बांगलादेश-भारत व्यावसायिक कौशल्य विकास संस्था बांग्लादेशच्या औद्योगिक विकासासाठी कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञ तयार  करेल.

महामहीम,

आणि तिसरा महत्वपूर्ण प्रकल्प, ढाका येथील रामकृष्ण मिशन येथे विवेकानंद भवनाचा प्रकल्प, जो दोन महामानवांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेतो.  आपल्या समाज आणि मूल्यांवर स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा अमिट प्रभाव आहे.

बांग्ला संस्कृतीच्या  उदार आणि मोकळ्या भावनेप्रमाणे या मिशनमध्ये सर्व पंथांच्या अनुयायींना स्थान आहे.  आणि हे मिशन प्रत्येक पंथाचा उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा करते. विवेकानंद भवनात 100हून अधिक विद्यापीठ विद्यार्थी आणि संशोधकांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महामहीम,

भारत बांग्लादेश बरोबरच्या  आपल्या भागीदारीला प्राधान्य देतो. मला अभिमान वाटतो कि भारत-बांग्लादेश संबंध दोन शेजारी मित्र देशांमधील सहकार्याचे संपूर्ण जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे. मला आनंद आहे कि आजच्या आपल्या चर्चेमुळे आपल्या संबंधांना आणखी ऊर्जा मिळेल.

जय हिंद! जय बांग्ला! जय भारत-बांग्ला बंधुत्व!

धन्यवाद.

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane