Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार निवेदनावेळी पंतप्रधानांचे वक्तव्य

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार निवेदनावेळी पंतप्रधानांचे वक्तव्य


नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2026

 

आपले महामहिम राष्ट्राध्यक्ष लुला,

दोन्ही देशांचे प्रतिनिधीमंडळ,

माध्यम प्रतिनिधींनो,

नमस्कार!

“बोआ तार्दे”!

राष्ट्राध्यक्ष लुला आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे.

गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये आपण ज्या आत्मीयता आणि ऊबदार स्वागताने माझे स्वागत केले होते, त्याच भावनेने आज भारतात आपले अभिनंदन करीत आहे. हे माझ्यासाठी विशेष समाधानाचे कारण आहे. भारत आणि ब्राझीलमधील संबंधांना राष्ट्राध्यक्ष लूला यांच्या दूरदृष्टी आणि प्रेरणादायी नेतृत्वाचा दीर्घकाळ लाभ होत आला आहे.

गत काही वर्षांत मला त्यांची अनेकदा भेट घेण्याचा योग आला आहे. प्रत्येक भेटीत मला भारताविषयी त्यांची सखोल मैत्री आणि विश्वास जाणवला आहे. राष्ट्राध्यक्ष लूला यांच्या या भेटीमुळे ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट समिटची शोभा वाढली आहे आणि आपल्या धोरणात्मक भागीदारीला नवचैतन्य मिळाले आहे. त्यांच्या मैत्रीबद्दल आणि दोन्ही देशांतील संबंधांप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल मी राष्ट्राध्यक्षांचे आभार व्यक्त करतो.

मित्रहो,

आज झालेल्या चर्चांमध्ये आपण प्रत्येक क्षेत्रात समान उद्दिष्टे आणि समान आकांक्षा यांसह पुढे जाण्याबाबत सविस्तर विचारविनिमय केला.

ब्राझील हा लॅटिन अमेरिकेत भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज डॉलरपेक्षाही पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. आपला व्यापार केवळ आकडेवारी नसून तो परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. राष्ट्राध्यक्षांसोबत आलेले मोठे उद्योग प्रतिनिधीमंडळ हाच विश्वास दर्शवते.

भारत-मर्कोसुर व्यापार कराराच्या विस्तारामुळे आपले आर्थिक सहकार्य अधिक बळकट होईल. तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील सहकार्य दोन्ही देशांसाठी तसेच संपूर्ण ग्लोबल साउथसाठी महत्त्वपूर्ण आहे. ब्राझीलमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उत्कृष्टतेचे केंद्रस्थान स्थापन करण्याच्या कामात आपण सहकार्य करत आहोत, याचा मला आनंद आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपरकॉम्प्युटर, सेमीकंडक्टर्स आणि ब्लॉकचेन यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्यालाही आपण प्राधान्य देत आहोत. तंत्रज्ञान सर्वसमावेशक असावे आणि सामूहिक प्रगतीसाठी ते एक पूल ठरावे, अशी दोन्ही देशांची भूमिका आहे.

ऊर्जा सहकार्य हे आपल्या संबंधांचे एक भक्कम स्तंभ राहिले आहे. हायड्रोकार्बनसह नूतनीकरणीय ऊर्जा, इथेनॉल मिश्रण, शाश्वत विमान इंधन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपण सहकार्याला अधिक गती देत आहोत. जागतिक जैव इंधन आघाडीमध्ये ब्राझीलचा सक्रिय सहभाग हरित भविष्याबाबतच्या आपल्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे.

ब्राझीलने आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय मंच या उपक्रमाच्या सह-अध्यक्षपदाचा प्रस्ताव दिला आहे. या महत्त्वपूर्ण पुढाकाराबद्दल मी राष्ट्राध्यक्ष लुला यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या क्षेत्रातील ब्राझीलचा व्यापक अनुभव सीडीआरआय  अधिक बळकट करण्यास मोलाचा ठरेल.

अत्यावश्यक खनिजे आणि महत्त्वाची खनिजे या संदर्भात झालेला करार बळकट आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी उभारण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. संरक्षण क्षेत्रातही आपले सहकार्य सातत्याने वाढत आहे. हे परस्परांतील विश्वास आणि धोरणात्मक समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे. ही परस्पर लाभदायी भागीदारी आपण आणखी दृढ करत राहू.

कृषी आणि पशुपालन क्षेत्रात आपण भविष्यातील गरजांचा विचार करून सहकार्याला नवे आयाम देत आहोत. हवामान-प्रतिरोधक शेती, अचूक शेती  आणि जैव खते यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्यामुळे दोन्ही देशांची अन्नसुरक्षा अधिक बळकट होईल. ब्राझीलमध्ये तेलबिया, कडधान्ये आणि एकात्मिक शेतीसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची योजना ही त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

आरोग्य आणि औषधनिर्मिती क्षेत्रातही सहकार्याच्या मोठ्या संधी आहेत. भारतातून ब्राझीलला परवडणारी आणि दर्जेदार औषधे पुरवठा वाढवण्यावर आपण काम करू. तसेच ब्राझीलमध्ये आयुर्वेद आणि पारंपरिक औषधपद्धतीचा विस्तार करून सर्वांगीण आरोग्यसेवेला प्रोत्साहन दिले जाईल.

मित्रांनो,

जागतिक पातळीवर भारत आणि ब्राझील यांची भागीदारी प्रभावी आणि बळकट राहिली आहे. लोकशाही देश म्हणून आपण ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांना आणि अपेक्षांना पुढे नेण्यास कटिबद्ध आहोत. भारत आणि ब्राझील एकत्र काम करत असताना ग्लोबल साउथचा आवाज अधिक ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण होतो.

प्रत्येक समस्येचे समाधान संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातूनच व्हावे, असा आपला ठाम विश्वास आहे. भारत आणि ब्राझील यांचे मत आहे की दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणारे घटक हे संपूर्ण मानवजातीचे शत्रू आहेत. सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे, यावरही आपली एकमत आहे. या दिशेने आपण संयुक्तपणे प्रयत्न करत राहू.

महोदय,

आपली ही भेट आपल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक गती देईल आणि येत्या काळात सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

आपल्या या भेटीबद्दल आणि दृढ मैत्रीबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

खूप-खूप धन्यवाद.

“मुईतो ऑब्रिगाडो!”

 

* * *

नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai