Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी पंतप्रधानांचा संवाद

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी पंतप्रधानांचा संवाद

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी पंतप्रधानांचा संवाद


भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. हा संघ अलिकडेच महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला होता.

एखाद्या पंतप्रधानाला महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ट्विट करण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला असे या चमूने यावेळी सांगितले. आपल्या खेळाकडे पंतप्रधानांचे लक्ष आहे हे कळल्यावर अतिशय अभिमान आणि आनंद झाला तसेच प्रेरणा मिळाली अशा भावना या खेळाडूंनी व्यक्त केल्या.

एखाद्या कामाचा ताण कसा सहन करायचा यावर चर्चा झाली असतांना योग यासाठी मदत करु शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. मन, शरीर आणि कृती यातला समतोल साधण्यासाठी तसेच इतर गोष्टींपासून मनाला अलिप्त ठेवण्यासाठी योगाचा उत्तम उपयोग होतो असे पंतप्रधानांनी सांगितले.

अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला नाही तर सव्वाशे कोटी भारतीयांनी या पराभवाचा भार स्वत:च्या खांद्यावर घेतला होता आणि हाच महिला संघाचा मोठा विजय आहे, असेही मोदी म्हणाले.

अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात भारताच्या मुलींनी देशाला अभिमान वाटेल असे यश मिळवले आहे, असे सांगत विविध क्षेत्रात महिलांच्या प्रगतीमुळे समाजाचे भले होत आहे, असेही ते म्हणाले. केवळ क्रीडाच नाही तर शालेय परीक्षांच्या निकालांपासून ते अंतराळ संशोधक म्हणून इस्रोच्या अभियानात महिलांची भरारी लक्षणीय आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी या संघाने स्वसाक्षांकित क्रिकेट बॅट पंतप्रधानांना भेट म्हणून दिली.

****

B.Gokhale/R.Aghor/Anagha