Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘मन की बात’च्या 138 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (27.09.2026)


नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!

‘मन की बात’ च्या सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे. मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो. ‘मन की बात’ मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो. देशाच्या यशाबद्दल बोलतो. भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतर 10 वर्षे पूर्ण होणार आहेत. हे यश आहे सर्जिकल स्ट्राईकचे. दहा वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. एलओसीच्या (नियंत्रण रेषेच्या) पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती, ते पाहून जग अचंबित झालं होतं. सर्जिकल स्ट्राईकने छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं. दहशतवादी हल्ल्यांमुळे भारताने दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या, सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती. गेल्या एका दशकभरात, बालाकोटच्या एअर स्ट्राईकपासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारताने वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे, की जर दहशतवा‌द्यांनी भारतावर नजर टाकली, तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल.

मित्रहो, 

दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घकाळापासून जखमा दिल्या आहेत. एक काळ असा होता की तेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती. सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजेच 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते. या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 चा खूप मोठा हल्ला झाला होता. 

मित्रहो, 

याधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितके लक्ष दिलं जात नव्हतं. वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची. आता आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत वाटचाल करत आहे, आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत.

मित्रहो, 

याच वर्षी 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता, त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते. मला आठवतं, 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो, तेव्हा न्यू यॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो. आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

सध्या देशाचं एक खूप मोठे चित्र आकार घेत आहे. या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजार पाजारचे लोकही आहेत. मी बोलत आहे भारताच्या जनगणनेबद्दल. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. 32 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागांतही हे काम सुरू आहे. तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्यासमोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावातून झाली. माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं. माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावत जी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तरकाशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणाऱ्या हरदेव सिंह राणा जी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली.

मित्रहो, 

जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं, की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदीसोबतच 16 भाषांमध्ये उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाइन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे se.census.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉगिन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, तुमच्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती सबमिट (दाखल) करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाहीए. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष संदर्भ क्रमांक मिळेल. जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील, तेव्हा तुम्ही त्यांना हा संदर्भ क्रमांक सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. 

मित्रहो, 

आतापर्यंत मोबाईलवरून 2 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्व-गणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100 वी जयंती आहे ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतो आहे विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहल जी यांच्याब‌द्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथे त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखे आयुष्य जगले. त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाला जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येत भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर खूप मोठे सौभाग्य लाभले. मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही, तर मला त्यांच्यासोबत या अभियानात जोडले जाण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो, त्यावेळीही मला वारंवार अशोक जी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. 

मित्रहो, 

अशोक जी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्यांबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश जण मोठ्या मोठ्या पदांवर होते. ते स्वतः आयआयटी बीएचयूचे पदवीधर होते. मात्र असं सगळं असतानाही त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं, हीच तर महान लोकांची ओळख असते. आज मी त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो. माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती. हे पर्व होतं ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’. आजपासून एक हजार वर्षांपूर्वी, 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र, जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते, आज, त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, आणि सोमनाथ मंदिर, पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं या वर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. 

मित्रहो, 

ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता, त्याच वर्षी गुजरातच्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता, ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही या वर्षी एक हजार वर्षे झाली आहेत, खरे तर त्या वेळी, हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं. 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. 

मित्रहो, 

तुम्ही त्या काळाबद्दचा विचार करा, ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखे श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतर अनेक ठिकाणीही हल्ले झाले असतील, अशावेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु, पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही तर, काहीच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनर्डभारणीही केली. याच जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊनही पुनर्रभारणी होत राहिली.

मित्रहो, 

मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात देखील हल्ले थांबले नाहीत. नंतर अल्लाउ‌द्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचं हे भव्य मंदिर तोडलं होतं, पण मित्रहो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही, आपली सूर्य उपासना, याचा एक अर्थ असाही असतो प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. म्हणूनच, मोढेराही आज केवळ सूर्य मंदिरासाठीच ओळखलं जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव, सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते, आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचे एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणे आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथे मोढेरा नृत्य महोत्सवाचं देखील आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्यांचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की, तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं.

मित्रहो, 

भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचे समर्पण आणि परिश्रम आहेत, जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पारई इथे असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए. सेल्वाराजू जी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तीची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरेही दिसली. भूतकाळाशी जोडले जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागांतही असे प्रयत्न केले जाऊ शकतात. यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

काही दिवसांनंतर 2 ऑक्टोबर आहे पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यांपैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्रे, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तन्हेनं, आंध्र प्रदेशात, युवा वर्ग, जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं, ते पुन्हा संवर्धित करण्याचं काम होतं आहे. मुंबईत काही तरुण समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथे दिल्लीत मुलं आणि युवा वर्ग, लोकांना कचऱ्याचं वर्गिकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. 

मित्रहो, 

या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, ताफा वाढत गेला (कारवां बढ़ता गया) – हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

आपण पर्यावरणाचं रक्षण करतो, तेव्हा आपण फक्त झाडं-पानं किंवा पशु-पक्षी आणि इतर जीवसृष्टीचंच संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करीत असतो. देशाच्या विविध भागांत सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर घेऊन येत आहेत.

मित्रांनो, 

आसाममध्ये सोनाई-रुपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता, जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळे हत्ती या परिसरापासून दूर गेले. तीन वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येताहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्षं त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसताहेत.

मित्रांनो, 

आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय. या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं, पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जातंय. एकेकाळी या जीवाचं अस्तित्त्व संपुष्टात येतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी केवळ सहा पिग्मी हॉग्सच्या मदतीने एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं परत एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं. आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉगची संख्या 190 च्या वर गेली आहे.

मित्रांनो, 

आपलं निसर्गाशी असलेलं नातं हे केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो, आणि दुसऱ्या बाजूला तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅन्ग्रोव्हज् ची जंगलं निर्माण करीत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत, ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलंय. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅन्ग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर, ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राख्या आणि निसर्गातील जैवविविधतेचं संरक्षण करूया. या दिशेने आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रति आपली असलेली जबाबदारी आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध, अमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व ‘नशामुक्त युवा’ अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये MY Bharat चे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. NSS मधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठे देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांत देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

मित्रांनो, 

या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली ती म्हणजे ‘नशामुक्तीचा संदेश’. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत. मी ‘मन की बात’ मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत. MY Bharat वरून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक ‘#नशामुक्त युवा’ या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच, संदेशही युवकांचा आहे, माध्यमही युवांचे आहे आणि हा संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे, ध्यान शिबिरे यांसारख्या अनेक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

मित्रांनो, 

लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल, तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिला आधार देऊया. ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी ‘टॅलेंट हंट’ अभियानाची घोषणा केली आहे. भारताने क्रीडा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत राहावी, यासाठी गावागावांत आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा-प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणे हा एकच त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंह जी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नावासोबत ‘सिनियर’ ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातील ते एक सदस्य होते. 1982 च्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. 2001 साली भारताने प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2003 मध्ये भारताने सीनियर आशिया कपचे विजेतेपद पटकावले. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजिंदर सिंह जी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून गावांमध्ये नवीन हॉकी अॅस्ट्रो-टर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजिंदर जी यांचं उ‌द्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत, अशा ठिकाणी लपलेल्या, क्रीडा-प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं. त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सीनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करीत आहेत. राजिंदर सिंह जी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेले लोणचे आणि मुरंबा आवडीने खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्युसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा भाग बनतो. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी तर पिढ्यान् पिढ्या आवळ्याच्या गुणधर्माविषयी आपल्याला सांगत आली आहेत. 

मित्रांनो, 

आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करीत आहे. प्रतापगढ आणि आवळ्याचं नातं खूप जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यान् पिढ्या आवळ्याची लागवड करीत आले आहेत. आवळ्याने प्रतापगढला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता हीच जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथे आवळ्याशी संबंधित स्थानिक उ‌द्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळाले आहे. आज प्रतापगढमध्ये आवळा प्रक्रिया उ‌द्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये स्वयं सहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील ‘सावित्री फुले स्वयं-सहायता गट’. या गटातील महिला आवळ्यापासून कँडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करीत आहेत. ODOP च्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याच्या संधी वाढल्या आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली. याचप्रमाणे, एका गावात ‘विंध्यवासिनी स्वयं-सहायता गट’ कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचे लोणचे, पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करीत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळाली आणि पाहता पाहता, त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं.

मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याब‌द्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये. ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून ‘व्होकल फॉर लोकल’ या अभियानालाही बळ मिळतं. आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण-उत्सवांच्या काळातही आपण ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र अजिबात विसरता कामा नये.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. ‘पोषण माह’मध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडने ‘हर घर मुनगा-घर घर मुनगा’ हे अभियान सुरू केलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनेही ‘वांगी स्पर्धा’, म्हणजेच मिलेट्सपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वस्त, पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिले जात आहे. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेने सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोरममध्येही लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील ‘तलो-मड-यना’ या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे, ‘निःस्वार्थ सेवा करणे आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणे.’ अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे, ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्रे ‘पोषण ट्रॅकर’ या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालंय. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे.

मित्रांनो, 

आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला आहे. देशभरात अत्यंत भक्तिभावाने गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि चैतन्याने भारून टाकतो. 

मित्रांनो, 

विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचे प्रतीक आहे. त्याच्याप्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असे नाही. उदाहरणच द्यायचं तर श्री पंथौन थीरखानोन जी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा ‘फ्रा फिकानेत’ या रूपात केली जाते. जेव्हा श्री पंथौन थीरखानोन जी 19 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशांची एक प्रतिमा भेट म्हणून दिली. तेथूनच त्यांच्या मनात गणेशभक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करीत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेशभक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई येथे ‘गणेश हिमाल म्युझियम’ची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10 हजारांहून अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथे दर रविवारी सकाळी 10 च्या सुमारास भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठानेही आयोजित केली जातात.या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहे हे आपल्याला समजते. माझी अशी इच्छा आहे की गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो.

मित्रांनो, 

‘मन की बात’ च्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन, त्यांचं कौतुक करतो, तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वाच्या सहकार्याने अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण-उत्सव आपण आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. 

खूप खूप धन्यवाद ! 

नमस्कार !

 

* * *

यश राणे/आकाशवाणी मुंबई/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai