पीएम्इंडिया

तुम्हा सर्वांना विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आज बेळगावीचे हे विहंगम दृश्य, हे भव्य चित्र पाहून असे वाटत आहे की सर्व काही विवेकानंदमय होऊन गेले आहे. आज या ठिकाणी सर्व धर्म सभेचे आयोजन देखील करण्यात येत आहे. यासाठी देखील तुम्हा सर्वांना माझ्या मंगलकामना.
या वेळी जो उत्साह मला दिसत आहे, त्याने सर्वांच्या मन-मस्तिष्कांना, मनमंदिरांना एकरुप केले आहे, एकीकृत केले आहे.
“सहस्र-सहस्र विवेक आवाहन”यांच्या साथीने विश्वविक्रम स्थापित होत आहे.
हे सर्व काही परमपूज्य श्री सिद्धलिंग महाराज, श्री यल्लालिंग प्रभू आणि श्री सिद्ध रामेश्वर महास्वामी यांच्या आशीर्वादानेच होत आहे. त्यांच्या आशीर्वादाची ऊर्जा यावेळी तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
ती ऊर्जा, तो आशीर्वाद मला देखील जाणवत आहे. बंधु आणि भगिनींनो बेळगावी येण्याचा अनुभव माझ्यासाठी नेहमीच अतिशय सुखद राहिला आहे. या ठिकाणी एक भारत- श्रेष्ठ भारताचे भव्य चित्र पाहायला मिळते. अतिशय लहानशा भागात पाच वेगवेगळ्या भाषांचा प्रवाह देशाच्या इतर भागांमध्ये फार कमीच पाहायला मिळतो. मी तुम्हा सर्वांसोबतच बेळगावीच्या भूमीला देखील प्रणाम करतो. बेळगावी कित्तूरची राणी चेन्नमा यांची भूमी आहे. इंग्रजांच्या विरोधात लढा उभारणारे महान योद्धा संगोली रायन्ना यांची भूमी आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील बेळगाव मध्ये दहा दिवस प्रवास केला होता.
ते म्हैसूरच्या सुप्रसिद्ध महालात देखील राहिले होते. म्हैसूरहून पुढे जात ते केरळ आणि तमिळनाडूला गेले जिथे कन्याकुमारीमध्ये त्यांना एक नवी प्रेरणा प्राप्त झाली. याच प्रेरणेने ते शिकागोला गेले आणि त्यांनी सर्व जगाला मोहून टाकले.
स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये केलेल्या भाषणाला या वर्षी 125 वर्षे होत आहेत. ज्या वेळी या भाषणाला शंभर वर्षे झाली त्या वर्षी मी विशेषत्वाने शिकागोला गेलो होतो. त्या गोष्टीला देखील 25 वर्षे उलटून गेली आहेत. त्यांच्या गोष्टींना, त्यांच्या भाषणाला इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही आपल्याला दर दिवशी, प्रत्येक प्रसंगात एखाद्या समस्येचे उत्तर शोधताना असे वाटत राहते, खरेच, स्वामी विवेकानंदांनी हे सांगितले होते !!! किती योग्य होते ते !!! आपल्याला विवेकनंदांची आठवण करावी लागत नाही. ते नेहमीच आपल्या मनात उपस्थित होत असतात. एक भारतीय कसा असला पाहिजे, याविषयी विवेकानंदांनी खूपच शक्तिशाली मंत्र दिला होता आणि तो मंत्र होता स्वदेशीचा. त्याच्या प्रत्येक ओळीत शक्ती आणि प्रेरणा ओतप्रोत भरलेली होती. त्यांनी म्हटले होते, हे भारत, तुम्ही विसरू नका तुमचे जीवन आपल्या वैयक्तिक सुखासाठी नाही. हे वीरा, अभिमानाने सांग की मी भारतीय आहे आणि प्रत्येक भारतीय माझा बंधू आहे . अभिमानाने घोषणा देऊन म्हणा की प्रत्येक भारतीय माझा बंधू आहे, भारतीय माझे प्राण आहेत. भारताची माती माझा स्वर्ग आहे. भारताच्या कल्याणात माझे कल्याण आहे.
असे होते विवेकानंद. भारताशी एकाकार विवेकानंद. भारताशी एकरुप विवेकानंद. भारताच्या सुख-दुःखात आपले सुख-दुःख मानणारे विवेकानंद. प्रत्येक कुप्रथेच्या विरोधात त्यांनी लढा दिला. परदेशात भारताची प्रतिमा गारुड्यांचा आणि नटांचा देश अशी करणा-यांच्या कुटिल अपप्रचाराला त्यांनी पुसून टाकले. जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्यात ज्ञान-विज्ञान, भाषा, सामाजिक सुधारणा, आधुनिक जगात पुढे पडणा-या पावलांसोबत पावले टाकत चालण्याचे धैर्य होते.
त्यांच्यात समाजातील विकृती, अस्पृश्यता, भेदभाव, दांभिकपणा यांचे समूळ उच्चाटन करण्याची लढवय्या वृत्ती होती. याच वृत्तीमुळे विवेकानंदांना संन्यासी बनवले. स्वामी विवेकानंदांनी कोलंबोहून अल्मोडादरम्यानच्या प्रवासात भेदभावाच्या विरोधात आवाज उठवला.
त्यांनी लोकांकडे दृष्टिक्षेप टाकत म्हटले की, ज्ञान आणि दर्शनात जगात तुमच्या सारखे महान कोणीच नसेल, पण प्रत्यक्षात इतका वाईट व्यवहार देखील कोणीच करत नसेल, धिक्कार आहे तुमच्या अशा व्यवहाराचा !!!
शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी त्यांनी जे म्हटले होते, ते कदाचित इतक्या बेधडकपणे बोलण्याचे धाडस आजच्या काळातही कोणी करू शकणार नाही. मित्रांनो, आपल्याला हे वातावरण बदलावे लागेल, ही मानसिकता बदलली पाहिजे. विवेकानंदांना तर वाटत होते की जातींचा द्वेष करण्याचे, जातिभेदाचे विष बाहेर काढले पाहिजे, त्याचे उच्चाटन झाले पाहिजे.
श्री सिद्धलिंग महाराजांच्या प्रेरणेमुळे तुमच्या मठाने देखील गेल्या दशकात जातीच्या प्रत्येक प्रकारच्या भेदभावाला संपुष्टात करण्याचे काम केले आहे. कोणाच्याही जातीची पर्वा न करता, कोणाचीही जात न विचारता समाजातील उपेक्षित आणि दुर्बल घटकांना तुमच्या कडून आवश्यक असलेली मदत दिली जात आहे.
तुमच्या मठाशी संबंधित लोकांकडून गावागावांमध्ये जाऊन पूर निवारण मदत कार्याचे काम केले जाते. गरीबांना मोफत औषधांचे वाटप केले जाते, मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले जाते आणि या कामांसाठी जात विचारात घेतली जाते का? नाही.
अनेक दशके लोकांनी केलेल्या पराकोटीच्या प्रयत्नांमुळे, देश जातींच्या बंधनातून मुक्त होण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करू लागला आहे. मात्र, तुमच्या सारख्या लाखो-करोडो लोकांच्या या कष्टांवर काही समाजविरोधी घटकांची वक्रदृष्टी पडली आहे. हे लोक पुन्हा एकदा जातीच्या आधारावर देशाचे विभाजन करण्याचा कट रचत आहेत.
अशा लोकांना आजच्या युवा पिढीकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताचे तरुण काही मूठभर लोकांच्या प्रभावाखाली येणार नाहीत. देशात जातीवाद, कुप्रथा, अंधविश्वास नष्ट करण्याचा निर्धार करणारे असे तरुणच विवेकानंद आहेत. ते भारताच्या नव्या विक्रमी-पराक्रमी विकासकारी चेह-याचे प्रतीक आहेत.
असा प्रत्येक तरुण जो राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहे, नवभारताचा संकल्प साध्य करण्यासाठी काम करत आहे, तो विवेकानंद आहे. एखाद्या शेतात, एखाद्या कारखान्यात, एखाद्या शाळेत, एखाद्या महाविद्यालयात, गल्लीबोळात देशाच्या सेवेत कार्यरत असलेली प्रत्येक व्यक्ती विवेकानंद आहे.
जे यावेळी स्वच्छ भारताच्या मोहिमेला पुढे नेत आहेत, गावोगावी जाऊन लोकांना डिजिटल साक्षर बनवत आहेत, ते विवेकानंद आहेत. जे दलित-पीडित-शोषित वंचितांसाठी काम करत आहेत, ते विवेकानंद आहेत. जे आपल्या उर्जेचा, आपल्या नव्या कल्पनांचा वापर समाजासाठी करत आहेत, ते विवेकानंद आहेत.
मित्रांनो, गेल्या वर्षी एक कार्यक्रम झाला होता, स्मार्ट इंडिया हॅकथ़ॉन. या कार्यक्रमात 40 हजारांहून जास्त तरुण देशातील सुमारे 600 समस्यांवर डिजिटल उपाययोजना शोधण्यासाठी काम करत होते. हे देखील माझ्यासाठी विवेकानंदच आहेत. लाखो-करोडो सामान्य लोक, भारताच्या मातीच्या सुगंधासाठी नवभारताचे निर्माते, आपल्या नव्या युगाचे विवेकानंद आहेत. त्यांना मी प्रणाम करतो. या कार्यक्रमात उपस्थित देशात असलेल्या प्रत्येक विवेकानंदाला मी प्रणाम करतो.
बंधुभगिनींनो, हजारो वर्षांच्या इतिहासाला स्वतःमध्ये सामावून आपल्या देशात काळानुरूप बदल होत राहिले आहेत. व्यक्तीमधील परिवर्तन, समाजातील परिवर्तन. मात्र, काळानुरूप काही वाईट गोष्टींचा देखील समाजात समावेश होत गेला आहे.
आपल्या समाजाचे एक वैशिष्ट्य आहे की ज्या ज्या वेळी अशा वाईट गोष्टींचा शिरकाव झाला, त्या त्या वेळी सुधारणेचे कार्य समाजातीलच एखाद्या व्यक्तीने सुरू केले आहे. अशा महान समाजसुधारकांनी नेहमीच जनसेवा केंद्रस्थानी मानली. आपले मन-वचन-कर्म यांद्वारे त्यांनी समाजाला शिक्षित तर केलेच, त्याचबरोबर लोकांच्या सेवेला प्राधान्य देखील दिले. देशातील सर्वसामान्य माणसाला त्याच्यासाठी अतिशय सोप्या असलेल्या भाषेत समजावले.
ही एक प्रकारची लोकचळवळ होती जिचा विस्तार शेकडो वर्षांच्या कालखंडात दिसून आला.
ही चळवळ दक्षिणेत मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, वल्लभचार्य, रामानुजाचार्य, पश्चिमेत मीराबाई, एकनाथ, तुकाराम, रामदास, नरसी मेहता, उत्तरेत रामानंद, कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानकदेव, संत रवीदास, पूर्वेत चैतन्य महाप्रभु, आणि शंकर देव यांच्यासारख्या संतांच्या विचारांमुळे बळकट झाली.
ही देखील आपल्या देशाची अद्भूत शक्ति आहे या चळवळींचा संबंध धार्मिक आंदोलनांशी जोडण्यात आला नाही. आपल्याकडे नेहमीच ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिघांचे संतुलन स्वीकारण्यात आले.
ज्ञानात हे संत एका मुलूभत प्रश्नाचे उत्तर शोधत असायचे आणि ते म्हणजे मी कोण आहे?
भक्ती, समर्पणाचे दुसरे नाव होते आणि कर्म पूर्णपणे सेवाभावावर आधारित होते. अशा अनेक संतांच्या, महापुरुषांच्याच प्रभावाने देश अनेक संकटांना झेलत पुढे वाटचाल करू शकला. या कालखंडात देशाच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक भागात, प्रत्येक दिशेने मंदिरे-मठातून बाहेर पडून आपल्या संतांनी एक सामाजिक चेतना जागृत करण्याचा प्रयत्न केला.
आपण अभिमानाने हे सांगू शकतो की भारताकडे अशी महान परंपरा आहे, असे महान संत-मुनी होऊन गेले, ज्यांनी आपल्या तपश्चर्येचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी केला.
याच मालिकेत स्वामी दयानंद सरस्वती, राजा राम मोहन रॉय. ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, विनोबा भावे यांच्यासारखे अगणित महापुरुष निर्माण झाले. त्यांनी सेवा केंद्रस्थानी ठेवली आणि सामाजिक सुधारणा देखील केल्या.
त्यांनी देशासाठी, समाजासाठी जो संकल्प केला तो पूर्ण करून दाखवला.
मित्रांनो, तुमच्या मठाने देखील त्यागाच्या परंपरेला स्वीकारले आहे, सेवेची परंपरा स्वीकारली आहे. तुमच्या मठाला विरक्त मठ म्हणून ओळखले जाते. विरक्त म्हणजे सर्व प्रकारच्या संसारिक मोहांपासून मुक्त. वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेल्या तुमच्या 360 पेक्षा जास्त मठात अन्नदानाची प्रथा चालते, गरीब आणि भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते, तर निश्चितच धरणीमातेची, मानवतेची सर्वोत्तम सेवा होत राहते आहे.
“शिव भावे जीव सेवा” याचे हे उत्तम उदाहरण आहे. आपल्या देशाला तर सेवेचा, सेवाभावाचा इतिहास आहे. ठराविक अंतरावर गरीबांसाठी अन्न आणि राहण्याची व्यवस्था करणे ही आपली परंपरा आहे. ही व्यवस्था साधु-संतांच्या आशीर्वादाने सामान्य समाजातील लोक करत असायचे. आजही अनेक शहरांमध्ये गावांमध्ये ही व्यवस्था जिवंत आहे, ती आणखी विस्तारत आहे.
बंधू आणि भगिनींनो, भारताने नेहमीच संपूर्ण जगाला मानवता, लोकशाही, सुशासन, अहिंसा यांचा संदेश दिला आहे. जेव्हा जगातील बड्या बड्या देशांनी, पश्चिमेकडील मोठ-मोठ्या जाणकारांनी लोकशाहीला एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची सुरुवात केली, त्याआधी अनेक शतकांपूर्वी भारताने ही मूल्ये केवळ आत्मसात केली नाहीत तर त्यांचा समावेश आपल्या प्रशासन पद्धतींमध्ये केला.
भगवान बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जगाला लोकशाहीचा, समानतेचा विचार दिला होता. त्यांनी ‘अनुभव मंडप’ नावाची अशी एक व्यवस्था विकसित केली होती ज्यात प्रत्येक प्रकारचे लोक, गरीब-दलित-पीडित-वंचित आपले विचार मांडू शकत होते. ते सर्व एकाच पातळीवर होते.
2015 मध्ये जेव्हा मी ब्रिटनमध्ये गेलो होतो तेव्हा मला भगवान बसवेश्वरांच्या मूर्तीचे लोकार्पण करण्याचे भाग्य प्राप्त झाले. त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान मॅग्ना कार्टाचा उल्लेख करत असल्याचे मला आठवते.
मात्र, मॅग्ना कार्टाच्या खूपच आधी बसवेश्वर यांनी आपल्याला एका प्रकारच्या संसदेची ओळख करून दिली होती.
भगवान बसवेश्वर यांचे बोधवचन होते की-
“ जेव्हा विचारांची देवाणघेवाण होत नाही, जेव्हा तर्कांना धरून वादविवाद होत नाहीत तेव्हा अनुभवाच्या गोष्टी देखील प्रासंगिक होत नाहीत आणि जेव्हा असे काही ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य देखील असत नाही.
म्हणजेच त्यांनी विचारांच्या या मंथनाला ईश्वराप्रमाणे शक्तिशाली आणि ईश्वराप्रमाणेच आवश्यक देखील मानले आहे. अनुभव मंडपात महिलांना मुक्तपणे बोलण्याचे स्वातंत्र्य होते.
समाजातील प्रत्येक स्तरातून आलेल्या महिला आपले विचार तिथे मांडत असत. अनेक महिला अशा असायच्या ज्यांच्याकडून अशी अपेक्षा देखील नसायची की त्या काळातील तथाकथित सभ्य समाजामधून आलेल्या असतील, अशा महिला देखील मंडपात आपले विचार मांडायच्या.
महिला सक्षमीकरणासंदर्भात मी त्या काळात खूप जास्त प्रमाणात प्रयत्न केले होते. गेल्याच वर्षी मी भगवान बसवेश्वर यांच्या वचनांचे 23 भाषात झालेल्या अनुवादाचे लोकार्पण केले.
भगवान बसवेश्वर यांच्या संदेशाला लोकांपर्यंत घेऊन जाणे अतिशय उपयुक्त सिद्ध होईल, अशी आपल्याला आशा वाटत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
या प्रसंगी मी माजी उपराष्ट्रपती श्री बी. डी. जत्ती यांना देखील नमन करत आहे आणि बासवा समितीमधील त्यांच्या योगदानाचे स्मरण करतो. श्री अरविंद जत्ती यांचा देखील या ठिकाणी मला विशेष उल्लेख केला पाहिजे.
मित्रांनो, मला असे सांगण्यात आले आहे की, पूजनीय श्री सिद्ध रामेश्वर महास्वामीजी यांच्याकडून अनुभव मंडपाचा पुन्हा प्रारंभ करण्याचा संकल्प करण्यात आला होता. याला या मठात पुन्हा स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती.
त्यांचे हे स्वप्न श्री मुरुघा राजेंद्र महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली साकार होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या “अनुभव मंडपाने” देशात समानतेच्या अधिकाराचा संदेश प्रसारित होईल.
“सर्व जन सुखिनो भवंतु” या मंत्राने चालताना सर्वांच्या सुखाची कामना करत या ठिकाणी होणा-या या आयोजनासाठी मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो, 2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचा सोहळा साजरा करेल. आपल्या देशातील अंतर्गत कमतरतांच्या साथीने आपण हा सोहळा साजरा करायचा का? नाही आपण सर्वांनी एक संकल्प केला आहे नवभारत बनवण्याचा. या संकल्पामध्ये तुमचे योगदान संकल्पातून सिद्धीच्या या प्रवासाला आणखी सोपे करणार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात, मुलींना शिकवण्याच्या क्षेत्रात, युवकांच्या कौशल्य विकासाच्या क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात, स्वच्छतेच्या क्षेत्रात, डिजिटल साक्षरतेच्या क्षेत्रात, सौर उर्जा प्रसारासाठी तुम्ही देखील एखादा संकल्प करू शकता का?
मला माहित आहे की तुम्ही या प्रकारच्या क्षेत्रात पूर्वीपासून काम करत आहात, पण आकड्यांमध्ये आपले लक्ष्य निर्धारित करून एखादा संकल्प केला जाऊ शकतो का ?असा संकल्प करता येऊ शकतो की पुढील दोन वर्षात 2 हजार, 5 हजार गावांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त करण्यासाठी मदत करण्यात येईल. असा संकल्प करता येईल का की पुढील दोन वर्षात तुमच्या निवडलेल्या 5 हजार गावांत प्रत्येक घरात LED बल्ब असेल.
मित्रांनो, सरकार या सर्व क्षेत्रात कार्य करत आहे मात्र, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यामध्ये, त्यांना प्रेरित करण्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्ही पावले उचलली तर लाखो विवेकानंदांची शक्ती तुमच्या संकल्पांना पूर्ण करेल, असा विश्वास मला वाटत आहे.
आता बेळगाव मध्ये दहा हजार विवेकानंद कार्यरत आहेत, नंतर लाखो विवेकानंद कार्यरत होतील. तुमच्या कार्याला यश मिळाले तर आपल्या सामाजिक व्यवस्थेला देखील बळकटी मिळेल. एक भारत-श्रेष्ठ भारताचे, सामर्थ्यवान भारताचे स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न साकार होईल.
हेच शब्द बोलत मी आपले बोलणे थांबवत आहे. पुन्हा एकदा या व्यासपीठावर उपस्थित सर्व संतांना मी नमस्कार करतो. तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिवस आणि सर्व धर्म सभेच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद
B.Gokhale/S.Patil/Anagha
Swami Vivekananda emphasised on brotherhood. He believed that our wellbeing lies in the development of India: PM @narendramodi https://t.co/mH5WSFU7Je
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
There was a lot of propaganda against India in the Western world that Swami Vivekananda proved wrong. He also raised a voice against social evils: PM @narendramodi https://t.co/mH5WSFU7Je
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
Some people are trying to divide the nation and the youth of this country are giving a fitting answer to such elements. Our youth will never be misled: PM @narendramodi https://t.co/mH5WSFU7Je
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
It is India's youth that is taking the Swachh Bharat Mission to new heights: PM @narendramodi https://t.co/mH5WSFU7Je
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
India has been home to several saints, seers who have served society and reformed it: PM @narendramodi https://t.co/mH5WSFU7Je
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
Seva Bhav is a part of our culture. All over India, there are several individuals and organisations selflessly serving society: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018
Let us work to make our nation ODF: PM @narendramodi https://t.co/mH5WSFU7Je
— PMO India (@PMOIndia) January 12, 2018