Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानाचे भाषण

स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानाचे भाषण

स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडिया अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानाचे भाषण


आज शनिवार आहे. शनिवारी साधारणपणे सरकारची सुट्टीची मनःस्थिती असते. आणि संध्याकाळी सहा नंतर तर विचारूच नका. तेव्हा तुम्हाला जर कोणी विचारले की काय फरक झाला आहे, तर, त्यांच्यासाठी उत्तर की- हाच फरक आहे.

मी कधी कधी विचार करतो, की मला ही तुमच्यासारखीच काही ताकद मिळाली असती तर? आता मी जेव्हा रितेशचे भाषण ऐकत होतो, तेव्हा माझ्या मनात विचार आला की चहा विकणाऱ्या माझ्यासारख्या माणसाने उपहारगृहांची साखळी बनवण्याच्या उद्योगाचा विचार का नाही केला? मात्र कदाचित माझ्या नशिबात काही वेगळे असेल. मात्र चहा विकणारा नरेंद्र मोदी काही करू शकत असेल किंवा नसेल, पण या देशातील कोट्यावधी युवकांनी काही विशेष करावे अशी आशा माझ्या मनात नक्कीच आहे.

जेव्हा मी लाल किल्यावरुन १५ ऑगस्टला केलेल्या भाषणात स्टार्ट अप इंडिया-स्टँड अप इंडियाची घोषणा केली होती, तेव्हा कोणी त्याकडे फार गांभीर्याने लक्ष दिले नाही, ती घोषणा जणू हवेतच राहिली, लोकांना लक्षात आली नाही. मात्र आज शंभर-सव्वाशे दिवसांनंतर लोकांना लक्षात येते आहे की ही नेमकी काय योजना आहे?

आपण जे पाहतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, seeing is believing! आज देशभरातील आय आय टीचे युवक तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. देशातील अनेक भागातील युवक सकाळपासून हा कार्यक्रम बघत आहेत. तेही या योजनेत तुमच्यासोबत भागीदार आहेत.

अनेकांना असे वाटते, की सरकारने असे केले तर हे होईल, तसे केले तर अमुक होईल. माझा विचार मात्र थोडा वेगळा आहे. मला वाटते की सरकारने हे नाही केले तर खूप काही होईल. आणि म्हणूनच तुम्हा सर्वाना आज इथे एकत्र केले आहे, तुम्ही सगळे आज आम्हाला सांगा की आम्हाला काय नाही करायचे आहे. ७० वर्षापर्यंत सरकारने खूप काही केले आहे, आणि आपण कुठे पोचलो आहोत, ते आपण सर्व पाहताच आहात. माझे असे म्हणणे आहे, की आता काही न करण्याचा निर्णय घेतला तर बघा आपण आपल्या देशाला पुढच्या १० वर्षात कुठल्या कुठे पोचवू शकू.

देशातील प्रत्येक माणसाच्या मनात एक स्वप्न असते, त्या स्वनासोबतच त्याच्या मनात काही विचारही असतात, काही कल्पना असतात. काही लोकांना दररोज नव्या कल्पना सुचतात आणि रात्रीच त्यांचा अकाली मृत्यू होऊन जातो. मात्र काही लोक असे असतात, जे आपल्या कल्पनांवर सातत्याने विचार करतात, त्यात मन गुंतवतात, ते त्या विश्वातून बाहेरच पडत नाहीत. अशा लोकांचे कुटुंब अस्वस्थ असते की हा काहीच काम करत नाही, एकाच गोष्टीचा विचार करतोय, बाहेर मित्रांमध्ये रमत नाही, याला वेड तर नाही लागले, असा विचार सगळे जण करतात. मात्र तोच मुलगा काही दिवसांनी अशी कमाल करून दाखवतो, तेव्हा पूर्ण कुटुंबाला असे वाटते की नाही, याच्यात काहीतरी वेगळे आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात असा अनुभव नक्कीच आला असेल. कारण आज इथे बसलेली स्वयंउद्योजकांची ही साधारण पहिलीच पिढी आहे.

तुमच्या संशोधनाविषयी, कल्पनांविषयी सुरुवातीला जेव्हा मित्रांनी ऐकले असेल, तेव्हा त्याची खिल्ली उडवली असेल, उपहास केला असेल. कधी असाही प्रसंग आला असेल की सगळ्यांनी तुमच्या या कल्पनांना विरोध केला असेल. तो विरोध सहन करूनही तुम्ही टिकून राहिलात. तुमच्यासारखे जे लोक आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकले, त्यांच्याविषयी आता तेच लोक म्हणत असतील की, व्वा याने तर कमाल केली. प्रत्येकाच्या स्टार्ट अपच्या आयुष्याची हीच कथा असेल.

आपण कधी विचार केला आहे का, की १४२३ मध्ये कोलंबस जेव्हा नवे मार्ग शोधण्यासाठी निघाला, तेव्हा त्याने विचार केला असेल, की मला जगाला जोडायचे आहे, नवे मार्ग शोधायचे आहेत, आणि तो निघाला. मात्र निघण्यापूर्वी त्याने अनेक गोष्टींचा अभ्यास केला असेल. नवे तंत्रज्ञान शोधले असेल. आणि एक नवा मार्ग जगाला दिला. आज अनेक लोक अवकाश क्षेत्रात काम करतात, पण जेव्हा याची सुरुवात झाली तेव्हा लोकांनी या संशोधनाची थट्टाच केली होती, की हे काय भलतच करताय.

त्यामुळे स्टार्ट अप मध्ये जे यशस्वी झाले आहेत, ते केवळ स्वयंउद्योजक नाही, तर साहसी वृत्ती त्यांच्या स्वभावात आहे, त्यामुळेच ते हे धाडस करू शकले. स्टार्ट अप साठी केवळ उद्यमशीलतेची गुणवत्ता उपयोगी नाही तर धोका पत्करण्याची तयारी, साहसी वृत्तीचा पक्का इरादा याचीही गरज असते. आणि हे सगळे जेव्हा एकत्र होते, तेव्हाच स्टार्ट अप यशस्वी होऊ शकते.

काल मी आदमशी गप्पा मारत होतो. अतिशय रसिक, खास माणूस आहे तो. भारताच्या आध्यात्मिक विश्वात त्याला फार रस आहे. मात्र त्याने एक खूप चांगली गोष्ट मला सांगितली. तो म्हणाला कि, जो माणूस पैसे कमावण्याच्या इराद्याने स्टार्ट अप मध्ये येतो, तो कधी स्टार्ट अप करू शकणार नाही. जो काही करण्याच्या इराद्याने इथे येतो, त्याच्यासाठी पैसे कमावणे दुय्यम असते. आपल्याकडे पूर्वी कुबेर भंडारी होते ना, मला वाटते, त्यांनी पहिल्यांदा पैसा कमावण्याचा विचार नक्कीच केला नसेल, तर मी लोकांच्या समस्या कशा सोडवू असा विचार केला असेल, आणि त्यातूनच एक व्यवस्था विकसित होत गेली.

जेव्हा स्टार्ट अप ची चर्चा होते तेव्हा नेहमीच आय टी बद्दल विचार केला जातो. आणि आता तर ही मोहीम आपल्या अगदी हाताशी आहे, फक्त ॲप डाउनलोड केले की झाले. मी ही त्याचा लाभार्थी आहे. मी नरेंद्र मोदी ॲप सुरु केल्यापासून मला देशभरातून अनेक युवकांचे विचार, त्यांच्या कल्पना ऐकायला मिळतात. म्हणूनच माझा तुम्हाला आग्रह आहे, की तुम्ही या ॲपच्या माध्यमातून तुमच्या स्टार्ट अपच्या यशस्वीतेच्या कथा आणि गाथा मला कळवा. त्या कथा मी इतरांपर्यंत पोचवेन. सर्वांनाच त्यातून प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल.

आज देशातील निराशेचे वातावरण दूर गेले आहे. ते दिवस आता संपले. आशा, विश्वास, काही करण्याची जिद्द अशी सकरात्मक स्थिती आज आहे. आज मी इथे आलो तेव्हा लगेच मला एक माहिती देण्यात आली, की इथे खूप जास्त उर्जा आणि उत्साहाचे वातावरण आहे. तसे तर विज्ञान भवन पहिल्यांदाच भरलेले नाही, मात्र आज ते एका वेगळ्या उर्जेने, उत्साहाने भारलेले आहे. कारण संपूर्ण देशातील युवकांच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिबिंब या ठिकाणी पडले आहे.

जो कोणी हे ॲप बनवतो, किवा स्टार्ट अप च्या जगात प्रवेश करतो, अथवा काही नव्या गोष्टीचा शोध लावतो, त्याच्या मनात काहीतरी वेगळे करण्याचा इरादा असतो, साहसी स्वभाव असतो. गोष्टींच्या मूळाशी जाण्याची वृती असते. मात्र सर्वात मोठी गोष्ट ही की, त्याच्या आत एक संवेदना असते. जेव्हा तो कोणाला अडचणीत बघतो, तेव्हा त्याला स्वस्थ झोप लागत नाही. ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं त्याचे मन त्याला सांगत असते, त्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मी आता बाहेर त्याचे एक उदाहरण पाहिले. अगदी साधे उदारहण. एक हार्ड बोर्डचा पॅड. जर कोणाला रस्त्यात अपघात झाला, आणि त्याचे हाड मोडले, तर त्याला त्वरीत आधार देण्यासाठी प्रथमोपचार म्हणून हा हार्डबोर्ड कामी येतो. म्हंटल तर अगदी छोटा शोध आहे, मात्र त्याचा उपयोग खूप मोठा आहे.

कोणासाठी काही करण्याची इच्छा होणे, मग त्यातून आपल्याला कोणाचे आशीर्वाद मिळो न मिळो, पण आपल्या मदत करण्याच्या इच्छेतून आपण मनाच्या अशा अवस्थेत पोचतो, की ती अवस्था लाखो- कोटी लोकांचे दुःख दूर करण्यास उपयोगी ठरते, आणि तिथेच स्टार्ट अपची सुरुवात होते. हे अभियान पैसे कमवण्यासाठी किंवा कोणाच्या खात्यात किती पैसे जमा होतात. यासाठी नाही, तर सर्वसामान्य जनतेला त्याच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी आहे, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. ज्याच्या मनात हे करण्याची चेतना आहे, तो याचा उपाय नक्की शोधेल आणि तेच त्याच्या स्टार्ट अपचे कारण बनेल.

आपण जरा विचार करा, आपल्या देशातला शेतकरी इतकी मेहनत करतो, धान्य पिकवतो, मात्र जे पिक निघतं त्यातलं बरचसं वाया जाते. माझ्या देशातला कोणी तरुण जरा बुद्धी लावून अशी व्यवस्था विकसित करू शकेल का, जी शेतकऱ्यांनाही परवडणारी असेल. त्यामुळे आपले वाया जाणारे पिक वाचू शकेल. असेही होऊ शकेल, की आपल्याकडे होणाऱ्या कृषी उत्पादनातून इतर काही गरीब देशांची भूक आपण भागवू शकू. दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठ मिळवून देऊ शकू. शहरात आणेपर्यंत त्याचा माल खराब होऊन जातो, त्यावर आपण काहीतरी उपाय करू शकू.

काही दिवसांपूर्वी मी शीतपेये बनवणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधीना भेटलो होतो. मी त्याना म्हटले की तुम्ही इतकी शीतपेये बनवता, त्यात तुम्ही काही टक्के नैसर्गिक फळांचा रस मिश्रित करण्याचे तंत्र का विकसित करत नाही? त्यामुळे भारतात विविध भागात शेतकरी जे फळ पिकवतात, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. तुमच्यापैकी कोणी असा विचार केला तर उत्तमच!

आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी औषधी शास्त्राच्या क्षेत्रात संशोधन करून लस विकसित केली, आज देशातील बहुतांश गरीब देशात बालकांना माफक दरात जी प्रतिबंधक लस दिली जाते, ती भारतीय संशोधकांनी विकसित केली आहे. मला जेवढे लोक भेटतात ते सांगतात, की या लसींना खूप मागणी आहे, याचे उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल? ज्याने प्रयोगशाळेत बसून ही लस विकसित केली असेल, त्याला तेव्हा जाणीवही नसेल, मात्र आज त्याच्या या संशोधनाने मानवतेची केवढी मोठी सेवा केली आहे.

भारतात अणुउर्जेवर संशोधन करणाऱ्यांनी कांद्याला दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची व्यवस्था विकसित केली आहे. जेव्हा कांद्याचे भाव कमी जास्त होतात, तेव्हा सरकारचा श्वासही वरखाली होत असतो! कांद्याचे उत्पादन जास्त झाले तरी शेतकऱ्याचे नुकसान आहे, कमी झाले तरी शेतकऱ्याचे नुकसान आहे. हे टाळता यावे, कांद्याचा साठा टिकवता यावा यासाठी अणुउर्जा शास्त्रज्ञ काम करत आहेत, मात्र, ते खूप महाग आहे.

आपल्या स्टार्ट अप योजनेतील तरुण आय टी क्षेत्राच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाही का? आज प्रत्येक व्यक्तीकडे काही न काही नवे विचार, कल्पना आहेत. मी पाहिले आहे, खेड्यापाड्यात जिथे वीज नसते, तिथे लोक मोटारसायकलच्या मदतीने पंप चालवतात, आणि शेताला पाणी देतात. अनेक जण अशी स्वतःपुरती अभिनव शक्कल लढवून काहीतरी जुगाड करतात, आपली सोय करून घेतात. पण अशीच व्यवस्था इतरांसाठी करण्याची दृष्टी आपल्याकडे असेल तर सर्वांचाच फायदा होईल.

जेव्हा आपण मेक इन इंडिया असे म्हणतो, तेव्हा त्याचा एक भाग मेक फॉर इंडिया असाही असतो. आपल्या या विशाल देशात मोठी बाजारपेठ आहे. मात्र ती अधिक उत्तम, आणि सहज उपलब्ध कशी होईल याचा विचार करायला हवा. मघाशी बोलताना तिवारी अतिशय योग्य म्हणाले की, जेव्हा मी माझ्या समस्या समजू शकेन तेव्हाच नवे रस्ते शोधण्याचे मार्ग सापडतील. देशाचा विकास अशाच गोष्टीतून होत असतो.

स्टार्ट अपचा अर्थ हा नाही की प्रत्येकाकडे बिलियन डॉलरचे काम असेल आणि त्यांच्याकडे दोन हजार लोक काम करतील, असे जरुरी नाही. एखाद्यानेपाच लोकांना रोजगार दिला तरी त्याचे स्टार्ट अप देशाला पुढे नेण्यात त्याचे मोठे योगदान असेल. आम्हाला एक मानसिक बदल आणायचा आहे, युवकांची नोकरी शोधण्याची मानसिकता बदलून नोकरी देण्याची मानसिकता आणायची आहे.

आपल्या देशात शिक्षण, पायाभूत सुविधा यावर भर दिला जातो, शिक्षकाच्या नेमणुकीवर भर दिला जातो, हे काम ठीक आहे, मात्र आज गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे ही काळाची गरज आहे. गरीब, दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत श्रीमंताना मिळणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण पोचवावे यासाठीचे तंत्रज्ञान आम्हाला विकसित करता येईल का? आपल्या देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत जेव्हा सुविधा पोचतील आणि त्याचे जीवनमान सुधारेल तेव्हाच देश बदलेल.

आज आरोग्य क्षेत्र हे प्रामुख्याने डॉक्टरवर नाही तर तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तुम्हाला काय त्रास होतोय हे यंत्र सांगते. याचा अर्थ असा की आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान संशोधनाला मोठा वाव निर्माण झाला आहे. मात्र भारतासारख्या देशात आपल्याला आणखी एक विचार करावा लागतो, तो म्हणजे, हे तंत्रज्ञान स्वस्त, गरिबांना परवडणारे कसे होऊ शकेल? यावर आपण काही विचार करू शकतो का? काही संशोधन करू शकतो का?

हस्तकौशल्याच्या वस्तूमध्ये आज भारत जगभरात नावाजलेला आहे. आपण त्यासाठी एखादे ॲप बनवून जगाची बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो का? केवळ ई कॉमर्स नाही, तर त्याच्याही दोन पावले पुढे जाऊन जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार, आपण त्यांना डिझाईन बनवून देऊ, गावातल्या गरीब माणसाला ही कल्पना दिल्यास तो त्याचा माल जागतिक पातळीवर पोचवू शकेल. मात्र त्यासाठी आपला व्यापक संपर्क हवा, हे आवश्यक आहे. आपल्या देशातील तरुण हे काम करू शकतात. म्हणूनच मी जेव्हा स्टार्ट अप इंडिया म्हणतो, तेव्हा स्टँड अप इंडिया त्यासोबत जोडलेले असते. ज्या देशाजवळ ३५ वर्षापेक्षा कमी वयाचे ८०० दशलक्ष लोक आहेत, तरुणांकडे बुद्धिमत्ता आहे, कौशल्य आहे, अपरंपार स्वप्ने आहेत आणि संपूर्ण जगाचा अवकाश पसरलेला आहे, त्या देशात काय अशक्य आहे?

आज मी आय टी क्षेत्रातील व्यावसायिकांना सांगू इच्छितो की मी जगभरात जेवढ्या नेत्यांना भेटतो, ते एकच चिंता व्यक्त करतात ती म्हणजे, सायबर सुरक्षेची. आपला देश सायबर सुरक्षा पुरवण्याच्या क्षेत्रात एक महत्वाचे नाव बनू शकतो का? भारत जर सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात सॉफ्टवेअरचा ब्रँड बनू शकला तर जगातली कुठलीही शक्ती त्याला हलवू शकणार नाही.

मानवजातीसाठी ही आव्हाने पेलणे आवश्यक झाले आहे, कारण जगात असे अनेक समाजकंटक आहेत, जे जग उध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. आपल्याकडेही असे लोक आहेत. मला मान्य आहे की भारतात लक्षावधी समस्या आहेत मात्र त्याचवेळी मला हाही विश्वास आहे की, आपल्याकडे अब्जावधी बुद्धिमान व्यक्ती देखील आहेत.

जेव्हा कुठल्या स्टार्ट अपजवळ समाधान शोधण्याचा इरादा असेल, तेव्हा त्याच्या स्वतःच्या समाधानाची पातळीही वेगळी असेल, कोणाच्या आयुष्यात बदल झाल्यास त्यालाही एक वेगळे समाधान मिळेल. मी काही केल्यामुळे, माझ्या देशाचे एक पाउल पुढे नेण्यात मी योगदान देतोय हे समाधान त्याला मिळेल.

आज इथे आपल्यासमोर एक कृती आराखडा सादर झाला आहे. माझे पहिले घोषवाक्य आहे की, सरकारने मध्ये येऊ नये, मग बरेच काही होऊ शकेल. आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, तो असा की, स्वप्रमाणीत आधारित कागदपत्रे पूर्ततेची व्यवस्था केलीं आहे. आणखी एक म्हणजे, तीन वर्षेपर्यंत काहीही निरीक्षण होणार नाही. कंपनीमध्ये तीन वर्षे निरीक्षक न येणे म्हणजे किती सुविधा मिळेल हे तुम्ही समजू शकता. स्टार्ट अप इंडिया हब, सिंगलपॉइंट कंत्राट, हँड होल्डिंग अशा सुविधा देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. या योजनेत सरकार, एक मित्र आणि एक सहकार्याच्या रुपात तुमच्या सोबत असेल.

या वर्षी एक एप्रिलपासून स्टार्ट अप इंडियाचे ऑनलाईन पोर्टल आणि मोबाईल ॲपवरून कार्यान्वित होणारा एक छोटासा फॉर्म सुरु करणार आहोत. लोकांचा स्वभाव प्रत्येक गोष्ट मोठी, लांबलचक करण्याचा असतो. मात्र आम्ही हे जितके सोपे सहज करता येईल तितके करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या फॉर्म द्वारे ऑनलाइन नोंदणीची पण सोय करता येईल.

स्टार्ट अपच्या लोकाना येणारी आणखी एक समस्या असते, ती म्हणजे, पेटंटच्या बौद्धिक संपदा स्वामित्व हक्काची. आपल्याकडे आजही असे पेटंट मिळविण्यासाठी महिने लागतात. मात्र अशा नव्या प्रयोगांना कायद्याचे सहकार्य आणि संरक्षण देणे आवश्यक आहे असे आम्ही मानतो. त्यासाठी आम्ही स्टार्ट अपच्या आय पी आर सेवेची योजना आणणार आहोत, ज्यामुळे स्टार्ट अप ची फाईल त्वरीत पुढे सरकू शकेल.

तसेही बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात आपण अजुन बरेच मागे आहोत. आपल्याकडे युवाशक्ती आहे, आणि या युवाशक्तीची सांगड मला बौद्धिक संपदेशी घालायची आहे, त्यातून आपल्याला नकीच जास्त लाभ मिळू शकेल. या कामासाठी भारताच्या प्रत्येक प्रमुख शहरात एक वेगळी व्यवस्था निर्माण करण्यावरही आम्ही विचार करतो आहोत. मग स्थानिक वाणिज्य महासंघ असेल, किंवा वकिलांचा गट असेल, त्यांच्या मदतीने हे होऊ शकेल. आज पेटंट साठी लागणाऱ्या शुल्कात आम्ही ८० टक्के कपात करणार आहोत. कारण हे संशोधन आणि सृजनशीलता यातच भारताचे भविष्य सामावले आहे, आणि याला आपण जेवढे महत्व देऊ तेवढा देशाचा विकास होईल.

स्टार्ट अपसाठी सार्वजनिक क्षेत्रातील खरेदीवर सवलत देण्याचाही आमचा विचार आहे. सरकारी क्षेत्रात स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनुभव आणि कंपनीचा नफा यातही सूट देण्याचा विचार करतो आहोत. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत आम्ही काहीही तडजोड करणार नाही. नवे असले तरी युवकांना पूर्ण संधी मिळावी असा आमचा विचार आहे, त्यामुळे ती संधी त्यांना दिली जाईल, मात्र त्याचवेळी झिरो डीफेक्ट आणि झिरो इफेक्ट अशा तत्वावर काम व्हावे अशी आमची अपेक्षा आहे.

आणखी एक चिंतेचा विषय आहे, तो म्हणजे आपल्याकडे बाहेर पडण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे आम्ही सर्वात आधी युवकांसाठी ही बाहेर पडण्याची व्यवस्था करतो आहोत. आम्हाला कल्पना आहे, की एक मोठा आणि यशस्वी व्यवसाय करण्यासाठी कधीकाळी अपयशाचाही सामना करावा लागतो, मात्र या अपयशाची तयारी ठेवाणाऱ्यांना मला पाठबळ द्यायचे आहे. जो पाण्यापासून दूर पळतो, तो कधीच पोहणे शिकू शकत नाही. हे लक्षात घेऊनच आम्ही ९० दिवसांच्या आत स्टार्ट अप मधून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना तशी व्यवस्था देणार आहोत. त्यासाठी आम्ही संसदेत दिवाळखोरी संरक्षण विधेयक आणले आहे, बाकी संसदेत काय अडचण आहे, ते तर तुम्ही जाणताच! तुम्ही युवकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संसदेचे काम सुरळीत होण्याबाबत आग्रह धरायला हवा, मोहीम सुरु करायला हवी.

स्टार्ट अपच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येत्या चार वर्षात दरवर्षी २५०० कोटी रुपये याप्रमाणे १० हजार कोटी रुपयांचा निश्चित निधी मंजूर करण्यात आला आहे.

स्टार्ट अपसाठी पतहमी देण्याच्या योजनेवरही काम सुरु आहे. येत्या चार वर्षात दरवर्षी ५०० कोटी रुपये या निधीसह पतहमी योजना आणणार आहोत.

तसेच स्टार्ट अप अंतर्गत करातही सवलत दिली जाईल. स्टार्ट अपसाठी वित्तीय संस्थाना निधी देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने आम्ही या गुंतवणुकीला भांडवली करातून सवलत देणार आहोत. बाकी गोष्टी अर्थमंत्री सांगतील, पण मी आता त्यांच्या उपस्थितीत हे जाहीर केल्याने गाडी पुढे सरकेलच! जर एखादी व्यक्ती आपलीच संपत्ती विकून आलेल्या पैशातून स्टार्ट अप सुरु करणार असेल तर त्याला भांडवली करातून सूट दिली जाईल. स्टार्ट अप मिळणाऱ्या नफ्याला ३ वर्षांसाठी प्राप्तिकरातून सवलत दिली जाईल. तसेच वाजवी बाजार किमतीवर गुंतवणूकीवर असलेल्या कराविषयीच्या समस्येवरही उपाय शोधतो आहोत.

महिला उद्योजकांची संख्या देशात वाढते आहे. त्यांच्यासाठी विशेष स्टार्ट अप योजना बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू.

औद्योगिक संशोधनाला वाव मिळणे अतिशय महत्वाचे आहे आणि त्यासाठी आम्ही अटल इनोव्हेशन मिशन सुरु करणार आहोत. जागतिक स्तरावर संशोधनाला वाव देण्यासाठी आणि स्टार्ट अपला अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी हे एक महत्वपूर्ण आणि उपयुक्त व्यासपीठ ठरेल. देशातील संशोधन प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी याचा खूप उपयोग होईल. या अंतर्गत ५०० प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील. सध्या असलेल्या प्रयोग शाळाना सक्षम केले जाईल. सध्या अशी ३५ केंद्र तयार करण्याचे काम सुरु आहेच. खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून हे काम देशभर सुरु आहे. त्यासाठी सरकार १०० कोटी रुपये निधी देणार आहे.

जैवतंत्रज्ञान हा ही एक महत्वाचा विषय आहे. यावर संशोधन करण्यासाठी ५ नवे जैव समूह, ५० जैव संशोधन प्रयोगशाळा, १५० तंत्रज्ञान कार्यालये, आणि २० जैव संपर्क कार्यालये बनवली जाणार आहेत.

विद्यार्थ्यांमध्येही एक उपजत संशोधन वृत्ती असते. तिला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी संशोधनावर आधारित कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. त्यांच्यातील बुद्धीमत्ता आणि संशोधनाला चालना दिली तर त्याचा भविष्यात देशाला खूप उपयोग होऊ शकेल.

देशातील अशी १० उद्योग संशोधन केंद्रे जी जागतिक दर्जाचे काम करतील त्या प्रत्येकाला सरकार कडून १० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाईल. देशात अनेकांना ही स्टार्टअप योजना कळावी यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील. या क्षेत्रातल्या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारही देण्याचा विचार केला जाईल.

मी १० सप्टेंबरला अमेरिकेत गेलो होतो. त्यावेळी भारतातील ४० स्टार्टअप लोकांना सोबत घेऊन गेलो होतो. एक मोठा सोहळा तिथे झाला. खूप प्रेरणादायी कार्यक्रम होता तो. या स्टार्ट अप सोहळ्याला आम्ही कायमस्वरूपी साजरा करणार आहोत. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत सरकार करेल. हा सोहळा नव्या पिढीच्या लोकांनीही बघावा अशी माझी इच्छा आहे.

या कार्यक्रमातून मला नवे स्वप्न बघण्याची शक्ती मिळाली आहे. हाच एक मोठा संदेश आहे या योजनेचे काही पैलू मी आज तुमच्या समोर ठेवले. मला विश्वास आहे कि या योजनेतून भारतातील गुणवत्तेला वाव मिळेल आणि मानवतेसाठी काहीतरी करण्याची ताकद मिळेल, प्रेरणा मिळेल. इथे आलेल्या सर्व तरुणांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. जगभरातून इथे आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो कि त्यांनी इथे येऊन आमचा उत्साह द्विगुणीत केला. खूप खूप धन्यवाद!

R. Aghor/ S. Tupe/ M. Desai