पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2026
किर्गिस्तानचे अध्यक्ष,
महामहीम,
नमस्कार!
एससीओ’च्या 25 व्या वर्धापन दिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे.
“बिश्केक” मध्ये आमच्या भव्य स्वागतासाठी आणि आदरातिथ्यासाठी मी अध्यक्ष जापारोव्ह यांचे हार्दिक अभिनंदन करतो.
काल किर्गिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी आम्हांला येथे उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. मी अध्यक्ष महोदय आणि येथील जनतेला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि आज उझबेकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी मी अध्यक्ष महोदय आणि उझबेकिस्तानच्या जनतेलाही खूप खूप शुभेच्छा देतो.
वर्ल्ड नोमॅड गेम्स’च्या भव्य उद्घाटन समारंभादरम्यान आपल्या सर्वांना किर्गिस्तानची समृद्ध संस्कृती आणि आपल्या सामायिक वारशाची झलक पाहायला मिळाली. हाच सामायिक वारसा आणि परस्पर जोडणी ही ‘एससीओ’ कुटुंबाची एक मोठी शक्ती आहे.
मित्रांनो,
गेल्या पंचवीस वर्षांत ‘एससीओ’ने यूरेशियाच्या प्रचंड भूभागात संवाद आणि सहकार्याची एक मजबूत परंपरा विकसित केली आहे. आपण सर्वांनी मिळून आपल्या लोकांच्या कल्याणासोबतच मानवतेच्या विकासातही बहुमूल्य योगदान दिले आहे. या पंचवीस वर्षांत आपण सहकार्याचा एक मजबूत पाया तयार केला आहे. आता येत्या पंचवीस वर्षांत या सहकार्याला स्पष्ट परिणामांमध्ये बदलणे हे आपले ध्येय असले पाहिजे.
आज जेव्हा जग अनिश्चितता आणि अस्थिरतेतून जात आहे, तेव्हा आपल्याला आपल्या सामायिक भूगोलाला सामायिक संधींमध्ये बदलायचे आहे. आणि आपल्या प्रयत्नांमधून आपल्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणायचे आहेत.
मागील बैठकीत मी एससीओ संदर्भात भारताच्या दृष्टिकोनाचे तीन प्रमुख स्तंभ नमूद केले होते:
S – Security (सुरक्षा),
C – Connectivity (संपर्क-सुविधा), आणि
O – Opportunity (संधी).
आता या तीनही स्तंभांना केवळ दृष्टिकोनाच्या पातळीवर न ठेवता, ठोस परिणामांपर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठीची पहिली गरज आहे – शांतता आणि सुरक्षा. दहशतवाद आजही संपूर्ण मानवतेसमोरील एक गंभीर आव्हान आहे. त्याविरोधातील लढा केवळ कृती-प्रतिकृतीच्या विचारसरणीपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही.
दहशतवादासाठी होणारा वित्तपुरवठा, भरती, कट्टरतावादाचा प्रसार आणि सुरक्षित आश्रयस्थाने या संपूर्ण परिसंस्थेचा आपल्याला नायनाट करावा लागेल. या गंभीर विषयावर दुहेरी मापदंडांना कोणतेही स्थान असू शकत नाही, हे आपल्याला एकमुखाने सांगावे लागेल.
जे देश दहशतवादाला आपल्या धोरणाचे साधन म्हणून वापरतात, दहशतवाद्यांना आश्रय आणि पाठबळ देतात, त्यांना कठोर संदेश द्यावा लागेल की दहशतवाद कोणासाठीही धोरणात्मक साधन किंवा धोरणात्मक संपत्ती ठरू शकत नाही.
शांततापूर्ण आणि सुरक्षित युरेशियाची आपली सामायिक आकांक्षा अफगाणिस्तानातील शांतता आणि स्थैर्याशीही जोडलेली आहे. भारत अफगाणिस्तानच्या जनतेच्या विकासासाठी आणि मानवतावादी मदतीसाठी योगदान देत आला आहे आणि पुढेही देत राहील.
आजच्या परस्परावलंबी जगात सुरक्षेची व्याप्ती आणखी व्यापक झाली आहे. पश्चिम आशियातील संकटाने हे दाखवून दिले आहे की, एखाद्या प्रदेशातील संघर्ष केवळ त्या प्रदेशापुरता मर्यादित राहत नाही. त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या ऊर्जा-सुरक्षेवर, सागरी व्यापारावर आणि पुरवठा साखळीवर होतो.
याचा सर्वाधिक फटका ग्लोबल साउथ अर्थात विकसनशील देशांना सहन करावा लागतो.
त्यामुळे, भारताने सर्व तणाव आणि युद्धांचे निराकरण युद्धभूमीवर नव्हे, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे करण्याचे आवाहन केले आहे.
अमली पदार्थांची तस्करी हा केवळ एक गुन्हा नसून, आपल्या तरुण पिढीसाठी आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी एक गंभीर धोका आहे. सुरक्षा विषयक धोके, संघटित गुन्हेगारी, माहिती सुरक्षा आणि अमली पदार्थ यासारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शांघाय सहकार्य संघटने (एससीओ) अंतर्गत स्थापन करण्यात येत असलेली केंद्रे हे एक सकारात्मक पाऊल आहे. आपण त्यांना व्यावहारिक समन्वयाचे आणि वेळेवर कृतीचे प्रभावी माध्यम बनवले पाहिजे.
मित्रांनो,
आपल्या सामायिक विकासाचा आणखी एक पाया म्हणजे मजबूत आणि विश्वासार्ह संपर्क व्यवस्था. बाजारपेठांना जोडणाऱ्या, व्यापाराला चालना देणाऱ्या आणि विकासाचे नवीन मार्ग खुले करणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा आहे. तथापि, या प्रयत्नांमध्ये सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे अत्यावश्यक आहे. एससीओ जाहीरनाम्याची देखील हीच मूळ भावना आहे.
आगामी काळात कनेक्टिव्हिटीची व्याप्ती आणखी वाढेल. रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गांबरोबरच, आपल्याला सीमाशुल्क प्रक्रिया सुलभ करावी लागेल, डिजिटल दस्तऐवजीकरणाला प्रोत्साहन द्यावे लागेल आणि लॉजिस्टिक नेटवर्क अधिक प्रभावी करावे लागेल.
मित्रांनो,
तिसरा स्तंभ म्हणजे संधी.
याचा अर्थ असा की, एससीओ सहकार्याचे फायदे थेट आपल्या जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. परस्परांच्या जनतेमधील संबंध ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. भारतासाठी, एससीओ म्हणजे महान संस्कृती, सभ्यता आणि विचारांचा संगम आहे. एससीओच्या पुढील पंचवीस वर्षांमध्ये, लोकांमधील संबंध हे आपल्या सहकार्याच्या केंद्रस्थानी असायला हवेत.
आपल्या प्रयत्नांमुळे युवा पिढीला किती नव्या संधी मिळाल्या, व्यावसायिकांसाठी किती बाजारपेठा खुल्या झाल्या, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा किती लाभ झाला आणि नागरिकांच्या जीवनमानात किती सुधारणा झाली यावरुन आपल्या यशाची पारख केली पाहिजे.
हाच सुरक्षितता, सुसंवाद आणि संधीचा खरा अर्थ आहे.
एससीओमधला आपला सहभाग केवळ सरकारपुरता मर्यादित नाही तर नागरिकांसाठीही असावा. किरगिझस्तानच्या अध्यक्षतेखालील एससीओमध्ये युवा पिढीच्या सहभागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचा मला आनंद आहे. भारताने एससीओमध्ये स्टार्ट अप मंच, युवा लेखक परिषद आणि युवा संशोधक मंच यासारखे उपक्रम राबवले.
गेल्या वर्षी भारताने एससीओ सांस्कृतिक संवाद मंचाचा प्रस्ताव मांडला होता. याच्या पहिल्या सत्राचे आयोजन यावर्षी भारतात होत असल्याचा मला अभिमान आहे. तुम्हा सर्वांच्या सक्रिय भागीदारीतून हा मंच एससीओमध्ये प्रत्यक्ष संवादाचे सशक्त माध्यम बनेल असा मला विश्वास आहे.
मित्रांनो,
किरगिझस्तानचे महान लेखक ‘चिंगीज ऐतमातोव’ यांनी जगाला एक सुंदर आणि गहन विचार दिला. ते म्हणाले होते की आपण नेहमी आपल्यात फूट पाडणाऱ्या गोष्टींकडे अधिक लक्ष देतो आणि आपल्याला जोडून ठेवणाऱ्या बाबींकडे दुर्लक्ष करतो.
आज एससीओ साठीदेखील हा संदेश खरा आहे. आपली विविधता ही आपली ओळख आहे. आपल्या सगळ्यांचे एकत्रित ध्येय ही आपली शक्ती आहे. बिश्केकमधून आपण हाच संकल्प करुन पुढील वाटचाल करूया.
समान भौगोलिकतेपासून समान संधींच्या दिशेने,
दृष्टीकोनापासून परिणामांपर्यंत,
आणि सरकारमधील सहकार्यातून नागरिकांच्या भागीदारीपर्यंत.
सरकार याच विश्वासातून आणि हीच वचनबद्धता राखत एससीओ परिवाराच्या समान उद्दीष्टांसाठी आपले योगदान देण्यासाठी तयार आहे.
खूप खूप आभार.
* * *
सुषमा काणे/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/राजश्री आगाशे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Addressed the SCO Summit in Bishkek.
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026
This Summit is special because we are marking 25 years since the start of SCO.
Here are the points I’ve raised in the Summit pic.twitter.com/oYZLLFvztf
It’s time to look at the SCO agenda for the next 25 years.
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026
India’s position is clear…We must transform our shared geography into shared opportunities.
We must work on the three pillars of Security, Connectivity and Opportunity.
From the SCO Summit in Bishkek. pic.twitter.com/GDlPpVkSLR
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026