पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2026
महामहीम पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू,
महामहीम, नेसेटचे अध्यक्ष अमीर ओहाना,
महामहीम, विरोधी पक्षनेते याइर लापिद,
नेसेटचे सन्माननीय सदस्य,
माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,
शालोम !
नमस्ते !
माननीय सदस्यगण,
या प्रतिष्ठीत सदनामध्ये उपस्थित राहणे ही माझ्यासाठी भाग्याची आणि सन्मानाची बाब आहे.भारताचे पंतप्रधान म्हणून आणि एका प्राचीन संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या प्राचीन संस्कृतीला संबोधित करत आहे. माझ्यासमवेत 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा आणि मैत्री, आदर आणि भागीदारीचा संदेश घेऊन मी आलो आहे.
अध्यक्ष महोदय,
आपल्या निमंत्रणाबद्दल मी आपले आभार मानतो. नेसेट भारतीय रंगांनी उजळवण्याच्या विलक्षण भावनेबद्दलही मी आपले आभार मानतो.तीन वर्षांपूर्वी आपण भारताला दिलेली भेट ही नेसेटच्या अध्यक्षांची पहिली भारत भेट होती. आपणामुळे या प्रतिष्ठीत सदनाला संबोधित करणारा, मी भारताचा पहिला पंतप्रधान ठरलो आहे.
नऊ वर्षांपूर्वी इस्रायलला भेट देणारा पहिला भारतीय पंतप्रधान ठरण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. ज्या भूमीचे मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे अशा या भूमीवर पुन्हा आल्याने मला आनंद झाला आहे. भारताने इस्रायलला औपचारिक मान्यता दिली त्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर 1950 या दिवशी माझा जन्म झाला.
माननीय सदस्यगण,
7 ऑक्टोबरला हमासने केलेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांप्रती आणि या हल्ल्यात ज्यांचे जगच उध्वस्त झाले अशा प्रत्येक कुटुंबाप्रती भारतीय जनतेच्या शोक भावना घेऊन मी आलो आहे. तुमचे दुःख आम्ही जाणतो. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भारत आत्ता आणि पुढेही ठामपणे इस्रायलसमवेत उभा आहे.
कोणतेही कारण नागरिकांच्या हत्येचे समर्थन करू शकत नाही. दहशतवादाचे कधीही समर्थन होऊ शकत नाही.
भारतानेही दीर्घ काळापासून दहशतवादाच्या झळा सोसल्या आहेत. 26/11 च्या मुंबई हल्ला आणि त्यात इस्रायली नागरिकांसह निष्पाप लोकांनी गमावलेले प्राण आम्हाला आठवतात. आपणाप्रमाणेच दहशतवाद जराही खपवून न घेणारे, दुटप्पीपणाला थारा नसणारे, आमचे कठोर आणि सातत्यपूर्ण धोरण आहे.
समाजाला अस्थिर करण्याचा, विकासाला रोखण्याचा आणि विश्वास नष्ट करण्याचा दहशतवादाचा उद्देश आहे.दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि समन्वित जागतिक कृतीची आवश्यकता आहे कारण दहशतवाद हा कोठेही असला तरी तो प्रत्येक ठिकाणी शांतता धोक्यात आणतो. म्हणूनच चिरंतन शांतता आणि प्रादेशिक स्थैर्य यासाठीच्या सर्व प्रयत्नांना भारत पाठींबा देतो.
काही वर्षांपूर्वी आपण अब्राहम कराराला पूर्णत्व दिले तेव्हा आम्ही आपल्या दूरदृष्टी आणि धैर्याची प्रशंसा केली होती. दीर्घ काळापासून त्रस्त असलेल्या या प्रदेशासाठी हा नव्या आशेचा क्षण होता. त्यानंतर परिस्थितीत लक्षणीय बदल घडून आला आहे. मार्ग अधिक आव्हानात्मक आहे मात्र ती आशा बाळगणे अधिक महत्वाचे आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अनुमोदित केलेल्या गाझा शांतता उपक्रमाने मार्ग दाखविला आहे. यासाठी भारताने आपला ठाम पाठींबा दर्शविला आहे. पॅलेस्टीन मुद्य्याची दखल घेण्यासह प्रदेशातल्या सर्व लोकांसाठी न्याय्य आणि स्थायी शांततेचे आश्वासन यात आहे असा आमचा विश्वास आहे.
आपल्या सर्व प्रयत्नांना विवेक, धैर्य आणि मानवतेचे मार्गदर्शन राहो. शांततेचा मार्ग नेहमीच सुलभ नसतो. मात्र या प्रदेशात संवाद, शांतता आणि स्थैर्य यासाठी भारत आपणा समवेत आणि जगासमवेत आहे.
सन्माननीय सदस्यगण,
इस्रायलचा निर्धार, धाडस आणि कामगिरी यांना भारतात मोठी प्रशंसा लाभली आहे. आधुनिक राष्ट्रे म्हणून परस्परांशी संबंध स्थापित होण्यापूर्वीपासून, दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळापासून दोन्ही देशांमध्ये संबंध होते. बुक ऑफ एस्टरमध्ये भारताचा होदू असा उल्लेख आढळतो. प्राचीन काळात तलमूडमध्ये भारतासमवेत व्यापाराचा उल्लेख आहे.
यहुदी व्यापारी हिंदी महासागराला जोडणाऱ्या भूमध्य सागरी मार्गाने प्रवास करत असत. संधी आणि प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी ते आले आणि भारतात ते आपल्यापैकीच एक झाले.
अत्याचार वा भेदभाव यांच्या भीतीविना यहुदी समुदाय भारतात राहिला आहे. त्यांनी त्यांच्या श्रद्धा जपल्या असून समाजातही ते पूर्णपणे मिसळले आहेत. आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.
माननीय सदस्यगण,
महाराष्ट्राचे बेने इस्रायली, केरलमचे कोचीनी यहुदी, कोलकाता आणि मुंबईचे बगदादी यहुदी, ईशान्येकडील बेनी मेनाशे यांनी भारताला समृद्ध केले आहे. माझे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये श्रीमान आणि श्रीमती बेस्ट यांनी स्थापन केलेली एक शाळा आहे. ही उत्कृष्ट शाळा आहे आणि उघड आहे की त्या शाळेला बेस्ट स्कूल म्हटले जाते.
एडविन मायर्स यांनी भारतीय चित्रपट प्रभागाला आकार दिला आणि भारतीय चित्रपटांच्या इतिहासातले ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. डॉक्टर रुबेन डेव्हिड यांनी अहमदाबाद इथल्या कांकरिया प्राणीसंग्रहालयाची स्थापना केली. अभिनेते अब्राहम च्युलकर किंवा अंकल डेव्हिड हे देशातल्या घराघरात पोहोचलेले नाव आहे. वॉल्टर काऊफमॅन यांनी आकाशवाणीची सिग्नेचर धून रचली. डेव्हिड ससून यांनी अनेक संस्थांची उभारणी केली आणि या संस्था आजही भारतीय समाजाच्या सेवेत आहेत.
आणि 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात लेफ्टनंट जनरल जे एफ आर जेकब यांचे शौर्यपूर्ण योगदान अर्थातच सर्व परिचित आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्यासमवेत जवळून काम करण्याची संधी मला लाभली.चहासमवेत आम्ही भारत-इस्रायल सबंधांसह अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे.याशिवाय अशा अगणित लोकांचे योगदान भारताच्या समृद्ध जीवनात विणले गेले आहे.
सन्माननीय सदस्यगण,
विसाव्या शतकाच्या मध्यात अनेक भारतीय यहुदी इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले.आज भारतीय मूळ असलेला चैतन्यपूर्ण यहुदी समुदाय इथे वास्तव्य करतो. आधुनिक इस्रायलची उभारणी करण्यात, प्रयोगशाळा आणि रुग्णालये, शाळा उभारण्यात आणि रणभूमीवरही त्यांचे योगदान आहे. इस्रायल ही त्यांची पितृभूमी आणि भारत ही त्यांची मातृभूमी आहे हा त्यांचा दृढ विश्वास आहे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
सन्माननीय सदस्यगण,
या भूमीशी भारताचा संबंध रक्त आणि त्यागाने लिहिला गेला आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात चार हजाराहून जास्त भारतीय सैनिकांनी या भागात आपल्या प्राणांची आहुती दिली. सप्टेंबर 1918 मध्ये हैफा इथे घोडदळाचा हल्ला हा लष्करी इतिहासातला महत्वाचा अध्याय राहिला आहे.
मेजर ठाकूर दलपत सिंग हे हैफाचे नायक म्हणून स्मरले जातात, जे सामायिक इतिहासाचे प्रतिक आहेत. माझ्या मागच्या भेटीत हैफा स्मारकावर भारतीय सैनिकांना आदरांजली अर्पण करताना मी अतिशय भावूक झालो होतो.
सन्माननीय सदस्यगण,
गेल्या महिन्यात जगाने होलोकॉस्ट स्मरण दिन पाळला. होलोकॉस्ट हा मानवतेच्या इतिहासातल्या काळ्या अध्यायांपैकी एक आहे. मात्र त्या उलथापालथीच्या काळातही मानवतेच्या काही घटना झाल्या. गुजरातमधल्या नवानगरचे महाराजा जे जाम साहेब म्हणूनही ओळखले जात असत त्यांनी यहुदी मुलांसह पोलिश मुलांना आश्रय दिला. या मुलांना दुसऱ्या कोठेही थारा नव्हता.
मला सांगण्यात आले की नुकतेच मोशव नेवतीम येथे जाम साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
या सन्मानबद्दल धन्यवाद.
माननीय सदस्य,
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक भारतीय नेत्यांचे इस्रायलच्या लोकांशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले. 1950 च्या दशकातील भारताच्या संसदीय वादविवादांमध्ये वाळवंटात शेतीचा विकास करण्याच्या इस्रायलच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली. इस्रायलच्या किबुत्झ चळवळीने आचार्य विनोबा भावे आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या आमच्या नेत्यांना प्रेरणा दिली. प्रथम माझ्या गृहराज्य गुजरातमध्ये आणि आता संपूर्ण भारतात, मी “पर ड्रॉप, मोर क्रॉप” हा दृष्टिकोन शेतीमध्ये आश्चर्यकार बदल घडवत असल्याचे पहिले आहे.
2006 मध्ये गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून मी पहिला इस्रायल दौरा केला होता. त्यानंतर 2017 मध्ये, पंतप्रधान म्हणून माझ्या इस्रायल दौऱ्यादरम्यान, आपल्या दोन्ही देशांनी आपले संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत वाढवले. तेव्हापासून, आपल्यातील संबंधांचे प्रमाण आणि व्याप्ती वाढली आहे. आणि हे संबंध अनेक क्षेत्रांमध्ये आणखी दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
माननीय सदस्य,
गेल्या काही वर्षांत भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. लवकरच जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आम्हाला स्थान मिळेल. त्याच वेळी, इस्रायल हे नवोन्मेष आणि तांत्रिक नेतृत्वाचे उर्जास्थान आहे. यामुळे भविष्यवेधी भागीदारीसाठी एक नैसर्गिक पाया निर्माण होत आहे.
परस्परांबरोबर व्यापाराचा विस्तार करण्यासाठी, गुंतवणुकीचा ओघ मजबूत करण्यासाठी आणि संयुक्त पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. गेल्या वर्षी स्वाक्षरी केलेला द्विपक्षीय गुंतवणूक करार आपल्या व्यवसायांना आत्मविश्वास आणि अंदाज प्रदान करेल. गेल्या काही वर्षांत, भारताने इतर देशांबरोबर अनेक महत्त्वाचे व्यापार करार केले. तुमच्या पश्चिमेकडे, युरोपियन युनियन आणि यूके. तुमक्या पूर्वेकडे, संयुक्त अरब अमिरात आणि ओमान.
अलिकडच्या वर्षांत आपला द्विपक्षीय वस्तू व्यापार अनेक पटींनी वाढला आहे. परंतु, तो संधींची पूर्ण व्याप्ती प्रतिबिंबित करत नाही. म्हणूनच आपले प्रतिनिधीमंडळ एका महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. यामुळे आपल्यातील व्यापारी संबंधांमध्ये अद्याप वापरात न आलेल्या अपार शक्यतांचा मार्ग खुला होईल.
आपण भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर आणि भारत, इस्रायल, युएई आणि अमेरिका यांच्यातील I2U2 फ्रेमवर्क अशा विविध स्वरूपात जवळून काम करू. संरक्षण आणि सुरक्षा हा आपल्या भागीदारीचा आणखी एक महत्वाचा स्तंभ आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपण संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. आजच्या अनिश्चित जगात, भारत आणि इस्रायल सारख्या विश्वासार्ह भागीदारांमधील मजबूत संरक्षण भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे.
माननीय सदस्य,
इस्रायलला अनेकदा “स्टार्ट-अप नेशन” म्हटले जाते. अलीकडच्या काही वर्षांत, आम्ही आमच्या तरुणांमधील नवोन्मेष आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी देखील काम करत आहोत. मला आठवते की 2018 मध्ये, पंतप्रधान नेतन्याहू आणि मी भारतात आयक्रिएट टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्यूबेटरचे उद्घाटन केले होते. तेव्हापासून, त्याने अशा जवळजवळ 900 स्टार्ट-अप्सना पाठिंबा दिला आहे.
गेल्या आठवड्यात, आम्ही जगातील सर्वात मोठे आणि सर्वात लोकशाहीकृत एआय इम्पॅक्ट समिट आयोजित केले होते, ज्यामध्ये 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आमची आकांक्षेची भावना ही इस्रायलच्या नवोन्मेष परिसंस्थेशी नैसर्गिकरित्या जुळते. क्वांटम तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस यासारख्या क्षेत्रात मला खूप सहकार्य दिसते. आम्ही आमच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा वापर करून सीमापार आर्थिक संबंध निर्माण करण्यासाठी इस्रायलसोबत काम करत आहोत.
माननीय सदस्य,
वाळवंटात इस्रायलने घडावलेले कृषी चमत्कार आम्हाला किती प्रेरणादायी वाटला हे मी नमूद केले. अचूक सिंचन आणि जल व्यवस्थापनातील इस्त्रायली कौशल्याने यापूर्वीच भारतातील कृषी पद्धतींमध्ये बदल घडवून आणला आहे.
आपण एकत्रितपणे, संपूर्ण भारतात 43 उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली आहेत, ज्यांनी अर्धा दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. आता आपण लाखो शेतकरी आणि मच्छीमारांना लाभ देण्यासाठी 100 केंद्रांपर्यंत विस्तार करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवायला हवे.
माननीय सदस्य,
भारत-इस्रायल भागीदारीच्या केंद्रस्थानी आपल्या लोकांमधील संबंध आहेत. 2006 मध्ये मी पहिल्यांदा इस्रायलला भेट दिली तेव्हा इस्रायलमध्ये मोजकी योगाभ्यास केंद्रे होती. आज, जवळजवळ प्रत्येक परिसरात योगाभ्यास केला जातो, असे दिसते!
मला सांगण्यात आले आहे की इस्रायलमध्येही आयुर्वेदाबाबत रुची वाढत आहे. मी अधिकाधिक इस्रायली तरुणांना भारतात येण्यासाठी आमंत्रित करतो. ते आपल्या समाजाच्या गतिमानतेचे साक्षीदार होतील आणि समग्र निरामय आरोग्य, शरीर आणि मनासाठी काय करू शकते याचा अनुभव घेतील.
या सन्माननीय सभागृहाला कळवताना मला आनंद होत आहे की भारतीय संसदेने इस्रायलसाठी एक संसदीय मैत्री गट स्थापन केला आहे. मी तुम्हा सर्वांना भारत भेटीसाठी आणि आमच्या संसद सदस्यांबरोबर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आमंत्रित करतो.
इस्रायलमधील भारतीय काळजीवाहक आणि कुशल कामगार, हे इथली कुटुंबे आणि समुदायांसाठी मोठे योगदान देतात, याची मला जाणीव आहे. त्यांनी 7 ऑक्टोबर, आणि संकटाच्या काळात उल्लेखनीय धैर्य आणि समर्पण दाखवले. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.
ज्यू शिकवण आपल्याला आठवण करून देते की, “जो एक जीव वाचवतो तो संपूर्ण जगाचे रक्षण करतो.” त्यांच्या सेवेतून आपल्या सहकार्यामागील मानवी बंधांची ताकद दिसून येते. आपल्या दोन्ही देशांना फायदा होईल अशा क्षेत्रांमध्ये आपण परस्परांचे कामगार आणि व्यावसायिकांचे आदान-प्रदान सुरू ठेवू.
माननीय सदस्य,
आपल्या दोन्ही प्राचीन संस्कृति आहेत. आणि यात आश्चर्य नाही की, आपल्या सांस्कृतिक परंपरांमध्ये देखील तात्विक साधर्म्य दिसून येते. इस्रायलमध्ये, टिक्कुन ओलमचे तत्व जगाला बरे करण्याबद्दल बोलते. भारतात, वसुधैव कुटुंबकम हे जग एक कुटुंब आहे असे मानते. दोन्ही कल्पना जबाबदारीच्या कक्षा रूंदवतात. त्या समाजाला करुणा आणि नैतिक धैर्याने वागण्याचे आवाहन करतात.
यहुदी धर्म हलखावर भर देतो, जो कायदा आणि व्यवहाराद्वारे दैनंदिन वर्तनाचे मार्गदर्शन करतो. हिंदु तत्त्वज्ञान धर्म या नैतिक व्यवस्थेबद्दल बोलते, जी कर्तव्य आणि योग्य कृतीला आकार देते. दोन्ही परंपरांमध्ये, नैतिक जीवन कृतीतून जगले जाते आणि श्रद्धा आचरणातून व्यक्त होते.
आपल्या सणांमध्ये देखील एक आकर्षक साम्य आहे. तुम्ही मेणबत्त्यांच्या उबदार प्रकाशाने हनुक्का साजरा करता. त्याच वेळी, आम्ही दिव्यांच्या सौम्य तेजाने, प्रकाशाचा सण, दिवाळी साजरी करतो. लवकरच, भारत आनंद आणि रंगांनी भरलेला होळीचा सण साजरा करेल. आणि त्याच वेळी, इस्रायल देखील उत्साह आणि आनंदाने पुरीम साजरा करेल.
माननीय सदस्य,
आपले सामायिक आदर्श हे आपल्यातील आधुनिक भागीदारी बळकट करणारा खोल पाया आहेत. आपण इतिहासाने आकार दिलेल्या आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या लोकशाही आहोत. आपली भागीदारी सामायिक अनुभव आणि सामायिक आकांक्षांवर आधारित आहे. आपली मजबूत भागीदारी केवळ राष्ट्रीय हित नव्हे, तर जागतिक स्थैर्य आणि समृद्धीला देखील हातभार लावते.
अनिश्चिततेच्या काळात भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्री हा एक शक्तीचा स्रोत राहील याची आपण खात्री करूया.
अॅम यिझ्राएल चाई.
जय हिंद.
धन्यवाद.
* * *
नेहा कुलकर्णी/निलीमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Addressing the Knesset. Do watch my speech. @KnessetENG https://t.co/a8V6Ah5HwY
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
I bring with me the greetings of 1.4 billion Indians and a message of friendship, respect and partnership: PM @narendramodi at the Knesset pic.twitter.com/9SL3bQjr5Y
— PMO India (@PMOIndia) February 25, 2026
I am very happy to be here again, returning to a land to which I have always felt drawn.
— PMO India (@PMOIndia) February 25, 2026
After all, I was born on the same day that India formally recognised Israel – September 17, 1950: PM @narendramodi at the Knesset pic.twitter.com/4gotvXEsy8
Nothing can justify terrorism: PM @narendramodi pic.twitter.com/VuwpULEjXF
— PMO India (@PMOIndia) February 25, 2026
Countering terrorism requires sustained and coordinated global action, because terror anywhere threatens peace everywhere: PM @narendramodi pic.twitter.com/iUK05sBJi7
— PMO India (@PMOIndia) February 25, 2026
Jewish communities have lived in India without fear of persecution or discrimination.
— PMO India (@PMOIndia) February 25, 2026
They have preserved their faith and participated fully in society: PM @narendramodi at the Knesset pic.twitter.com/cDML2cljFB
The Holocaust stands as one of humanity’s darkest chapters. Yet, even in those turbulent years, some acts of humanity stood out.
— PMO India (@PMOIndia) February 25, 2026
The Maharaja of Nawanagar in Gujarat, also known as the Jam Saheb, offered refuge to Polish children, including Jewish children, who had nowhere else… pic.twitter.com/ptX3SKezs6
In Israel, the principle of Tikkun Olam speaks of healing the world.
— PMO India (@PMOIndia) February 25, 2026
In India, Vasudhaiva Kutumbakam affirms that the world is one family. pic.twitter.com/QhzqqpjHAn
I bring with me the greetings of 1.4 billion Indians and a message of friendship, respect and partnership. pic.twitter.com/fD3P1spB29
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
We feel your pain.
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
We share your grief. pic.twitter.com/mmYDPjwwP3
In India, there is great admiration for Israel’s resolve, courage and achievements. pic.twitter.com/pjXIaU5PIt
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
Historical connect between India and Israel… pic.twitter.com/qnGC88oySx
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
May the India-Israel friendship remain a source of strength in an uncertain world. pic.twitter.com/aLRDcNJXB1
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026