Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन


नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.   नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

25 डिसेंबर म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि भारतरत्न महामना मदन मोहन मालवीय या देशातील दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंतीचा गौरवशाली दिवस असतो असे ते म्हणाले. या दोन्ही व्यक्तिमत्वांनी भारताची ओळख, एकता आणि अभिमानाचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, असे त्यांनी नमूद केले. या दोन्ही दिग्गजांनी आपल्या अनमोल  योगदानातून देशाच्या जडणघडणीच्या प्रक्रियेवर अमीट  छाप उमटविली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

25 डिसेंबरलाच महाराजा बिजली पासी यांचीही जयंती असल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. लखनौचा प्रसिद्ध बिजली पासी किल्ला या सभेच्या ठिकाणापासून जवळच आहे. महाराजा बिजली पासी यांनी आपल्या पश्चात पराक्रम, सुशासन आणि सर्वसमावेशकतेचा वारसा मागे ठेवला आहे, आणि पासी समाजाने तो अभिमानाने पुढे नेला आहे असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. वर्ष  2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनीच महाराजा बिजली पासी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले होते हा योगायोगाही त्यांनी उपस्थिताना  सांगितला. यानिमित्ताने त्यांनी महामना मालवीय, अटल बिहारी वाजपेयी आणि महाराजा बिजली पासी यांना आदरांजलीही वाहिली.

या सभेच्या काही वेळ आधीच आपल्याला राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हे ठिकाण भारताला स्वाभिमान, एकता आणि सेवेचा मार्ग दाखवणाऱ्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे भव्य पुतळे इथे आहेत, मात्र या पुतळ्यांपेक्षाही त्यातून मिळणारी प्रेरणा जास्त मोठी आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी याच्या काही ओळीही उद्धृत केल्या. आपले प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक प्रयत्न देशाच्या जडणघडणीसाठी समर्पित असायला हवे, हाच संदेश इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळातून मिळतो असे त्यांनी सांगितले.  विकसित भारताचा संकल्प केवळ सामूहिक प्रयत्नांतूनच पूर्ण करता येणार असल्याची जाणिवही त्यांनी उपस्थितांना करून दिली. या आधुनिक प्रेरणा स्थळाबद्दल पंतप्रधानांनी लखनौ, उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले. ज्या जमिनीवर हे प्रेरणा स्थळ उभारले गेले आहे, तिथे गेल्या अनेक दशकांपासून 30 एकरपेक्षा जास्त जागेवर कचऱ्याचा डोंगर उभा राहीला होता, मात्र गेल्या तीन वर्षांत या जागेची पूर्ण स्वच्छता करण्यात आल्याची बाब त्यांनी ठळकपणे नमूद केली. या राष्ट्र प्रेरणा स्थळ उभारणीच्या कामाशी जोडलेल्या सर्व कामगार, कारागीर आणि नियोजनाची जबाबदारी सांभाळलेल्या प्रत्येकाचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले, तसेच मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण संघाच्या प्रयत्नांचे विशेष कौतुकही केले.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्राला दिशा देण्यात निर्णायक भूमिका बजावली असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी नमूद केले की, डॉ. मुखर्जी यांनीच भारतात दोन संविधान, दोन निशाण  आणि दोन पंतप्रधान ही तरतूद फेटाळून लावली होती. स्वातंत्र्यानंतरही जम्मू आणि काश्मीरमधील व्यवस्था भारताच्या अखंडतेसाठी एक मोठे आव्हान होते, असे त्यांनी स्पष्ट केले. कलम 370 ची भिंत पाडण्याची संधी त्यांच्या सरकारला मिळाली आणि आज भारताचे संविधान जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्णपणे लागू झाले आहे, असे मोदी यांनी अभिमानाने सांगितले.

पंतप्रधानांनी पुढे आठवण करून दिली की, स्वतंत्र भारताचे पहिले उद्योग मंत्री म्हणून डॉ. मुखर्जी यांनी आर्थिक स्वावलंबनाचा पाया घातला आणि देशाला पहिले औद्योगिक धोरण दिले, त्यातूनच भारतातील औद्योगिकीकरणाचा आधार तयार झाला. आज तोच स्वावलंबनाचा मंत्र नव्या उंचीवर नेला जात असून ‘मेड इन इंडिया’ उत्पादने जगभर पोहोचत आहेत, असे त्यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशात ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही मोठी मोहीम राबवली जात असून त्याद्वारे लघु उद्योग आणि लहान घटकांना बळ दिले जात असल्याचे मोदी यांनी सांगितले. त्यासोबतच उत्तर प्रदेशात एक मोठा संरक्षण कॉरिडॉर बांधला जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ज्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद जगाने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाहिली, त्याचे उत्पादन आता लखनौमध्ये होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. उत्तर प्रदेशचा हा संरक्षण कॉरिडॉर संरक्षण उत्पादनासाठी जागतिक स्तरावर ओळखला जाईल, तो दिवस आता दूर नाही, यावर त्यांनी भर दिला.

दशकांपूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’चे स्वप्न पाहिले होते, हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी नमूद केले की, तळातील शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हसू हेच भारताच्या प्रगतीचे मोजमाप असावे, असे दीनदयाळजी मानत असत. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांचा एकत्रित विकास होणाऱ्या ‘एकात्म मानवतावादा’बद्दल दीनदयाळजींनी सांगितले होते, यावर त्यांनी भर दिला. मोदी यांनी पुढे सांगितले की, दीनदयाळजींचे हे स्वप्न त्यांनी स्वतःचा संकल्प म्हणून स्वीकारले आहे आणि आता ‘अंत्योदय’ला संपृक्तता हा नवा आयाम देण्यात आला आहे, त्याचा अर्थ प्रत्येक गरजू व्यक्तीला आणि प्रत्येक लाभार्थ्याला सरकारी कल्याणकारी योजनांच्या कक्षेत आणणे असा आहे. जेव्हा संपृक्ततेची भावना असते, तेव्हा कोणताही भेदभाव नसतो आणि हेच खरे सुशासन, खरा सामाजिक न्याय आणि खरी धर्मनिरपेक्षता असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आज देशातील कोट्यवधी नागरिकांना कोणत्याही भेदभावाशिवाय पहिल्यांदाच पक्की घरे, शौचालये, नळाचे पाणी, वीज आणि गॅस जोडण्या मिळत आहेत, असे त्यांनी नमूद केले. कोट्यवधी लोकांना पहिल्यांदाच मोफत रेशन आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जेव्हा तळातील  शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जातात, तेव्हा पंडित दीनदयाळजींच्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने न्याय दिला जात असतो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

“गेल्या दशकात कोट्यवधी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे,” असे मोदी यांनी आवर्जून सांगितले. जे मागे राहिले होते, जे शेवटच्या रांगेत उभे होते, त्यांना आपल्या सरकारने प्राधान्य दिले म्हणूनच हे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले. 2014 पूर्वी सुमारे 25 कोटी नागरिक सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेत होते, तर आज उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांच्या  मोठ्या संख्येसह सुमारे 95 कोटी भारतीय या सुरक्षा कवचाखाली आहेत, असे त्यांनी सांगितले. एकेकाळी जशी बँक खाती मर्यादित लोकांपुरती होती, त्याचप्रमाणे विमा देखील केवळ श्रीमंतांपुरता मर्यादित होता, असे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. विमा सुरक्षा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्या सरकारने घेतली, यावर त्यांनी भर दिला. यासाठी ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ सुरू करण्यात आली, ज्यामध्ये नाममात्र प्रीमियमवर दोन लाख रुपयांचा विमा सुनिश्चित केला गेला असून आज 25 कोटींहून अधिक गरीब नागरिक या योजनेत सहभागी झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे, अपघात विम्यासाठीच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेशी, जे पूर्वी विम्याचा विचारही करू शकत नव्हते असे जवळपास 55 कोटी गरीब नागरिक जोडले गेले आहेत असे त्यांनी नमूद केले. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या सुमारे 25,000 कोटी रुपयांच्या दाव्यांची रक्कम अगोदरच देण्यात आली आहेत हे कळल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल, याचाच अर्थ असा होतो की गरीब कुटुंबांना संकटाच्या काळात या पैशांची मदत झाली आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, अटलजींच्या जयंती हा सुशासन दिन साजरा करण्याचा दिवस आहे. गरिबी निर्मूलन सारख्या घोषणा करणे म्हणजे शासनाचा कारभार करणे असे दीर्घकाळ मानले जात होते, परंतु अटलजींनी खरोखर सुशासन प्रत्यक्षात आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या डिजिटल ओळख याबद्दल बरीच चर्चा होत असली तरी, त्याचा पाया अटलजींच्या सरकारनेच घातला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा सुरू झालेला विशेष कार्ड उपक्रम आज आधार म्हणून जगभर प्रसिद्ध झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारतातील दूरसंचार क्रांतीला गती देण्याचे श्रेय देखील अटलजींना जाते. त्यांच्या सरकारच्या काळात तयार झालेल्या दूरसंचार धोरणामुळे प्रत्येक घरात फोन आणि इंटरनेट पोहोचवणे सोपे झाले आहे तसेच आज भारत जगात सर्वाधिक मोबाइल आणि इंटरनेट वापरकर्ते असलेल्या देशांपैकी एक झाला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. 

गेल्या 11 वर्षात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे याचा अटलजींना आनंद झाला असता असेही मोदी यांनी नमूद केले. उत्तर प्रदेश म्हणजेच ज्या राज्यातून अटलजी संसद सदस्य म्हणून निवडून जात होते, ते राज्य आज भारतातील पहिल्या क्रमांकाचे मोबाईल फोन उत्पादन करणारे राज्य बनले आहे, असेही त्यांनी सांगितले.

अटलजींच्या दळणवळण तंत्रज्ञानासंबंधीच्या दृष्टीनेच 21 व्या शतकातील भारताला सुरुवातीला बळ मिळाले यावर पंतप्रधानांनी भर दिला. अटलजींच्या सरकारच्या काळातच गावांना रस्त्यांनी जोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आणि सुवर्ण चतुष्कोन द्रुतगती महामार्गाच्या विस्ताराचे काम सुरू झाले, याची आठवण त्यांनी करून दिली.

सन 2000 पासून, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत, सुमारे 8 लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधण्यात आले आहेत, त्यापैकी सुमारे 4 लाख किलोमीटर रस्ते गेल्या 10–11 वर्षात बांधण्यात आले आहेत, असेही मोदी यांनी पुढे सांगितले. आज संपूर्ण देशभर अभूतपूर्व वेगाने महामार्गांचे बांधकाम करण्यात येत असून उत्तर प्रदेश महामार्गांचे राज्य म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे असे त्यांनी नमूद केले . दिल्ली मेट्रोची सुरुवात देखील अटलजींनीच केली होती आणि आज देशभरातील 20 हून अधिक शहरांमधील मेट्रो नेटवर्क लाखो लोकांचे जीवन सुकर करत आहेत असेही पंतप्रधानांनी पुढे अधोरेखित केले. त्यांच्या सरकारने सुरू केलेल्या सुशासनाच्या वारशाचा आता केंद्र सरकार आणि राज्यांमधील आपल्या पक्षाच्या सरकारांकडून विस्तार केला जात असून त्याला नवीन आयाम दिले जात आहेत, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या भव्य पुतळ्यांच्या बरोबरीने त्यांच्या  प्रेरणा, दूरदर्शी कार्याने विकसित भारताचा भक्कम पाया घातला गेला असल्याचेही स्पष्ट करत मोदी यांनी हे पुतळे आज देशाला नवीन उर्जा देण्याचे काम करत आहेत असे नमूद केले. स्वातंत्र्यानंतर, भारतातील प्रत्येक चांगले काम एकाच कुटुंबाशी जोडण्याची प्रवृत्ती कशी निर्माण झाली – मग ती पुस्तके असोत, सरकारी योजना असोत, संस्था असोत, रस्ते असोत किंवा चौक असोत, सर्वकाही एकाच कुटुंबाच्या गौरवाशी, त्यांच्या नावांशी आणि त्यांच्या पुतळ्यांशी जोडले गेले होते ही गोष्ट विसरता कामा नये असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, देशाला एका कुटुंबाच्या ताब्यात ठेवण्याच्या जुन्या  पद्धतीतून आपल्या पक्षाने देशाला मुक्त केले आहे. आपले  सरकार मातृभूमीच्या प्रत्येक अमर सुपुत्राचा सन्मान राखत असून राष्ट्रसेवेसाठी केलेल्या प्रत्येक योगदानाला सन्मानित करत आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. याचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, दिल्लीतील कर्तव्य पथावर आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अभिमानाने उभा आहे, तसेच अंदमानमध्ये ज्या बेटावर नेताजींनी तिरंगा फडकावला होता, त्या बेटाला आता नेताजींचे नाव देण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा नष्ट करण्याचे प्रयत्न कसे झाले, हे कोणीही विसरू शकत नाही, असे सांगत पंतप्रधानांनी नमूद केले की, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्षांनी हे पाप केले. बाबासाहेबांचा अमूल्य वारसा कधीही पुसला जाणार नाही, याची आपल्या  पक्षाने दक्षता घेतली, असे त्यांनी स्पष्ट केले. आज दिल्लीपासून लंडनपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे  पंचतीर्थ त्यांच्या वारशाची साक्ष देत आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेकडो संस्थानांत विभागलेल्या भारताला एकसंध राष्ट्रात बांधले; मात्र स्वातंत्र्यानंतर त्यांच्या कार्याचे आणि योगदानाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न झाले. सरदार पटेल यांना यथोचित  सन्मान देण्याचे कार्य आपल्या  पक्षानेच केले, असे त्यांनी स्पष्ट केले.  त्यांच्या सरकारने सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारून एकता नगरला राष्ट्रीय प्रेरणास्थळ म्हणून विकसित केले, असे त्यांनी नमूद केले.  त्यांनी अधोरेखित केले की, आता दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य सोहळा याच ठिकाणी आयोजित केला जातो.

आदिवासी समाजाच्या योगदानाकडे अनेक दशकांपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले, असे सांगत मोदी यांनी नमूद केले की, भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारण्याचे कार्य आपल्या  सरकारने केले. काही आठवड्यांपूर्वीच छत्तीसगडमध्ये शहीद वीर नारायण सिंह आदिवासी संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, देशभरात अशा अनेक उदाहरणांचा उल्लेख करता येईल. उत्तर प्रदेशमध्ये महाराजा सुहेलदेव यांचे स्मारक आपल्या  सरकारच्या सत्तेच्या काळातच उभारण्यात आले, असे त्यांनी सांगितले. निषादराज आणि भगवान श्रीराम यांच्या भेटीच्या स्थळालाही अखेर योग्य सन्मान प्राप्त झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्यापासून ते चौरी चौरा येथील हुतात्म्यांपर्यंत, मातृभूमीच्या सुपुत्रांच्या योगदानाचा आपल्या  सरकारने संपूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने गौरव केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुटुंबाधिष्ठित राजकारण ही असुरक्षिततेतून जन्मलेली विशिष्ट  ओळख असल्याचे सांगत मोदी यांनी नमूद केले की, अशा विचारसरणीमुळे काही नेत्यांनी स्वतःच्या कुटुंबाचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी इतरांचे योगदान जाणीवपूर्वक कमी लेखले. याच मानसिकतेमुळे देशात राजकीय अस्पृश्यतेचा शिरकाव झाला, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. स्वतंत्र भारतात अनेक पंतप्रधान होऊनही दिल्लीतील संग्रहालयात अनेक माजी पंतप्रधानांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. ही चूक दुरुस्त करण्याचे काम आपल्या  सरकारने केले असून, आज दिल्लीतील भव्य पंतप्रधान संग्रहालयात स्वतंत्र भारतातील प्रत्येक पंतप्रधानाना त्यांचा  कार्यकाळ कितीही अल्प असला तरी त्यांना सन्मानाचे योग्य स्थान देण्यात आले आहे.

विरोधक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या  पक्षाला नेहमीच राजकीयदृष्ट्या अस्पृश्य मानले, असे सांगत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, आपल्या  पक्षाची मूल्ये मात्र सर्वांप्रती आदरभाव बाळगण्याची शिकवण देतात. गेल्या 11 वर्षांत आपल्या  सरकारच्या कार्यकाळात माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  यांना भारतरत्न ने  सन्मानित करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधानांनी यावर भर दिला की आपल्या  सरकारनेच   मुलायम सिंह यादवजी आणि तरुण गोगोईजी सारख्या नेत्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले. अशी अपेक्षा विरोधी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून कधीही केली जाऊ शकत नाही, त्यांच्या राजवटीत  इतर पक्षांच्या नेत्यांना फक्त अपमान सहन करावा लागला.

21व्या शतकातील भारतात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उत्तर प्रदेशला केंद्र आणि राज्यातील आपल्या सरकारांचा मोठा फायदा झाला आहे हे अधोरेखित करून,  स्वतः उत्तर प्रदेशचे खासदार असणाऱ्या पंतप्रधानांनी   अभिमानाने सांगितले की राज्यातील कष्टाळू लोक एक नवीन भविष्य लिहित आहेत. त्यांनी आठवण करून दिली की एकेकाळी ढासळलेली  कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत उत्तर प्रदेशची चर्चा होत असे , परंतु आज विकासासाठी चर्चा केली जाते. अयोध्येतील भव्य राम मंदिर आणि काशी विश्वनाथ धाम हे जगातील राज्याच्या नवीन ओळखीचे प्रतीक बनत असल्याने, देशाच्या पर्यटन नकाशावर उत्तर प्रदेश वेगाने उदयास येत आहे हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी नमूद केले की राष्ट्र प्रेरणा स्थळासारख्या आधुनिक बांधकामांमुळे उत्तर प्रदेशची नवीन प्रतिमा आणखी उजळते आहे.

पंतप्रधानांनी समारोप करताना उत्तर प्रदेश सुशासन, समृद्धी आणि खऱ्या सामाजिक न्यायाचे मॉडेल म्हणून अधिक उंची गाठत राहो अशी इच्छा व्यक्त केली आणि पुन्हा एकदा राष्ट्र प्रेरणा स्थळाबद्दल अभिनंदन केले.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल  आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री   राजनाथ सिंह,   पंकज चौधरी हे या कार्यक्रमात उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

स्वतंत्र भारताच्या दिग्गजांच्या वारशाचा सन्मान करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित, राष्ट्र प्रेरणा स्थळ भारतातील सर्वात आदरणीय राजकीय नेत्यांमध्ये समाविष्ट  असलेल्या नेत्याच्या  जीवनाला, आदर्शांना आणि चिरस्थायी वारशाला आदरांजली वाहेल, ज्यांच्या नेतृत्वाने देशाच्या लोकशाही, राजकीय आणि विकासात्मक प्रवासावर खोलवर प्रभाव पाडला.

राष्ट्र प्रेरणा स्थळ हे एक ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारक आणि कायमस्वरूपी राष्ट्रीय महत्त्वाचे प्रेरणादायी संकुल म्हणून विकसित केले गेले आहे. अंदाजे ₹230  कोटी खर्चून बांधलेले आणि 65  एकरच्या विस्तृत क्षेत्रात पसरलेले, हे संकुल नेतृत्व मूल्ये, राष्ट्र सेवा, सांस्कृतिक जाणीव आणि सार्वजनिक प्रेरणा यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित कायमस्वरूपी राष्ट्रीय संपत्ती म्हणून कल्पित आहे.

या संकुलात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 65 फूट उंच कांस्य पुतळे आहेत, जे भारताच्या राजकीय विचार, राष्ट्र उभारणी आणि सार्वजनिक जीवनात त्यांच्या मौलिक योगदानाचे प्रतीक आहेत. येथे कमळाच्या आकाराच्या संरचनेच्या स्वरूपात डिझाइन केलेले एक अत्याधुनिक संग्रहालय देखील आहे, जे सुमारे 98,000चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले आहे. संग्रहालयात भारताचा राष्ट्रीय प्रवास आणि या दूरदर्शी नेत्यांचे योगदान प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे प्रदर्शित केले जाते, जे पर्यटकांना एक आकर्षक आणि शैक्षणिक अनुभव देते.

राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन हे निःस्वार्थ नेतृत्व आणि सुशासनाच्या आदर्शांचे जतन आणि प्रचार करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि ते वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.

 

 

 

 

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/निखिलेश चित्रे/मंजिरी गानू/राज दळेकर/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai