पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2026
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.
मित्रांनो,
या शिखर परिषदेत मला जागतिक नेते आणि टेक सीईओ ना भेटण्याची संधी मिळाली. एआय इम्पॅक्ट समिटच्या प्रदर्शनात मी जागतिक नेत्यांना अनेक गोष्टी दाखवल्या. मी दोन गोष्टींचा विशेषत्वाने उल्लेख करू इच्छितो. परिषदेत या दोन उत्पादनांनी जगभरातील नेत्यांना खूप प्रभावित केले. पहिले उत्पादन अमूलच्या बूथवर होते. यामध्ये सांगितले गेले होते की कशा प्रकारे प्राण्यांवर इलाज करताना कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला मदत करते आणि कसे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतकरी आपल्या जनावरांवर आणि डेअरी (दूधप्रकल्पावर) 24/7 लक्ष ठेवू शकतात.
मित्रांनो,
दुसरे उत्पादन आपल्या संस्कृतीच्या संदर्भातील होते. जगभरातील नेत्यांना याचे नवल वाटले की कशा प्रकारे आपण आपले प्राचीन ग्रंथ, प्राचीन ज्ञान, आपली हस्तलिखिते यांचे जतन करत आहोत आणि त्यांना आजच्या पिढीच्या अनुरूप स्वरूपात बदलत आहोत.
मित्रांनो,
या परिषदेत प्रदर्शनासाठी सुश्रुत संहितेची निवड केली गेली होती. पहिल्या टप्प्यात दाखवले गेले की कसे तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण हस्तलिखितांच्या प्रतिमांची गुणवत्ता सुधारून त्यांना वाचण्यायोग्य बनवत आहोत. दुसऱ्या टप्प्यात या प्रतिमेला मशीनने वाचण्यायोग्य मजकूरामध्ये बदलले गेले. पुढच्या टप्प्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता अवताराने हे मशीनने वाचण्यायोग्य मजकूर वाचला. आणि नंतर, त्याच्या पुढच्या टप्प्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने हे अनमोल भारतीय ज्ञान भारतीय भाषांत तसेच विदेशी भाषांतही कसे भाषांतरित केले जाऊ शकते हे दाखवले गेले. भारताचे प्राचीन ज्ञान आधुनिक अवताराच्या माध्यमातून जाणण्यासाठी जागतिक नेत्यांनी रुची व्यक्त केली.
मित्रांनो,
या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला, भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील अद्भुत क्षमता पाहायला मिळाली. याच दरम्यान भारताने तीन मेड इन इंडिया एआय मॉडलची देखील सुरूवात केली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद झाली आहे. या शिखर परिषदेच्या विषयी तरुणांचा जोश आणि उत्साह पाहण्याजोगा होता. शिखर परिषदेच्या यशाबद्दल मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
मी नेहमी म्हणतो, ‘जे खेळतील ते खुलतील.’ खेळ आपल्याला एकत्र जोडतो देखील. आजकाल तुम्ही टी ट्वेंटी विश्वचषकाचे सामने पाहत असाल. आणि माझी खात्री आहे की सामना बघताना अनेकदा आपले डोळे एखाद्या खास खेळाडूवर खिळून राहतात. त्याची जर्सी एखाद्या अन्य देशाची असेल पण त्याचे नाव ऐकल्यावर वाटते की अरे, हा तर आपल्या देशाचा आहे! तेव्हा मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक आनंदाची लहर उठते.
कारण तो खेळाडू भारतीय वंशाचा असतो आणि त्याचे कुटुंब त्या देशात स्थायिक झालेले असते. ते आपापल्या संघांची जर्सी घालून मैदानात उतरतात, अगदी मनापासून त्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. कॅनडाच्या संघात सर्वात जास्त भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. संघाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा यांचा जन्म पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये झाला आहे. नवनीत धालीवाल चंदीगढचे आहेत. या यादीत हर्ष ठाकर, श्रेयस मोवा अशी कितीतरी नावे आहेत जी कॅनडासोबतच भारताचा गौरव पण वाढवत आहेत. अमेरिकेच्या संघामधील कितीतरी चेहरे भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील आहेत. अमेरिकेच्या संघाचे कर्णधार मोनांक पटेल गुजरातच्या अंडर-16 आणि अंडर-18 संघासाठी खेळले आहेत. मुंबईचे सौरभ, हरमीत सिंग, दिल्लीचे मिलिंद कुमार हे सगळे अमेरिकेच्या संघाचे शान आहेत. ओमानच्या संघातील अनेक चेहरे याआधी भारतातील वेगवेगळ्या राज्यांसाठी खेळले आहेत. जतिंदर सिंह, विनायक शुक्ला, करण, जय, आशिष यांच्या सारखे खेळाडू ओमान क्रिकेटमधील मजबूत दुवा आहेत. न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिरात आणि इटली च्या संघांमध्ये देखील भारतीय वंशाच्या खेळाडूंनी आपले स्थान निर्माण केले आहे. असे कितीतरी भारतीय वंशाचे खेळाडू आहेत जे आपल्या देशाचा गौरव वाढवत आहेत. तेथील युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. भारतीयतेचे हेच वैशिष्ट्य आहे. भारतीय कुठेही गेले तरी आपल्या मातृभूमीशी जोडलेले राहतात. आणि आपली कर्मभूमी म्हणजे ज्या देशात राहतात त्या देशाच्या विकासातही हातभार लावतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
कोणत्याही आईवडिलांसाठी आपल्या मुलांना गमावण्यापेक्षा दुसरे मोठे दुःख असू शकत नाही. लहानशा बाळाला गमावण्याचे दुःख तर अजूनच तीव्र असते. काही दिवसांपूर्वी आपण केरळच्या आलिन शेरिन अब्राहमला गमावून बसलो आहोत. फक्त दहा महिन्यांचे लहानसे बाळ या जगातून निघून गेले. कल्पना करा, अजून तिच्यासमोर संपूर्ण आयुष्य होते, जे अचानक संपले. किती स्वप्ने, किती आनंद अधुरे राहिले. तिचे पालक, ज्या वेदनेतून जात असतील, ते आपण शब्दांत मांडूच शकणार नाही. पण इतक्या तीव्र दुःखातही आलिन चे वडील अरुण अब्राहम आणि आई शेरिन यांनी असा एक निर्णय घेतला की ज्यामुळे प्रत्येक देशवासियांचे हृदय त्यांच्या विषयीच्या आदराने भरून गेले. त्यांनी आलिनच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. ह्या एका निर्णयाने लक्षात येते की त्यांचे विचार किती उदात्त आहेत आणि हृदय किती विशाल आहे! एकीकडे ते आपल्या मुलीच्या वियोगाच्या दुःखात होते आणि दुसरीकडे इतरांना मदत करावी अशी भावना त्यांच्या मनात होती. त्यांना वाटत होते की कोणत्याच कुटुंबावर असा दिवस पाहण्याची वेळ येऊ नये. आलिन शेरिन अब्राहम आज आपल्यात नाही, पण तिचे नाव देशातील सर्वात लहान वयाच्या अवयवदात्यांमध्ये जोडले गेले आहे.
मित्रांनो,
आजकाल भारतात अवयव दानाविषयीची जागरूकता सतत वाढते आहे. त्यामुळे ज्यांना आवश्यकता आहे अशा लोकांना मदत मिळते आहे. ह्या सोबतच देशातील वैद्यकीय संशोधनासाठी देखील बळ मिळते आहे. ह्या दिशेने अनेक संस्था आणि लोक विशेष काम करत आहेत.
मित्रांनो,
केरळच्या आलिन सारखे असे अनेक लोक आहेत की ज्यांनी अवयवदानाच्या माध्यमातून इतरांना नवे आयुष्य दिले आहे. जसं दिल्ली च्या लक्ष्मी देवी जी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी केदारनाथची यात्रा केली.
त्यासाठी त्यांना 14 किलोमीटर ट्रेकिंग करावे लागले. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हृदय प्रत्यारोपणानंतर त्यांनी ही यात्रा केली. त्यांचे हृदय केवळ 15 टक्के काम करत होते. अशा वेळी त्यांना एका दात्याचे हृदय मिळाले ज्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तर त्यांचे जीवनच बदलून गेले. पश्चिम बंगाल चे गोरांग बनर्जी दोन वेळा नाथू-ला येथे जाऊन आले आहेत. हे ठिकाण समुद्रसपाटीपेक्षा 14 हजार फूट उंचावर आहे. आणि विशेष गोष्ट अशी की त्यांनी फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणा नंतर साध्य केले आहे. राजस्थान मधील सीकर चे रामदेव सिंह जी यांना किडनी प्रत्यारोपण करायला लागले होते. आज ते क्रीडाक्षेत्रात कमाल करत आहेत.
मित्रांनो,
आपल्याला अशी अनेक प्रेरक उदाहरणे पाहायला मिळतील. यावरून असे सिद्ध होते की एखाद्याची एक उदात्त कृती, न जाणो कित्येकांचे आयुष्य बदलून टाकते. मी त्या सगळ्या लोकांची मनापासून प्रशंसा करतो, ज्यांनी असे उदात्त कार्य केले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी मी लाल किल्ल्यावरून पंच प्राणांविषयी बोललो होतो. त्यातील एक आहे, गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती. आज देश गुलामीच्या प्रतीकांना मागे टाकून भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेल्या गोष्टींना महत्व देऊ लागला आहे. ह्या दिशेने आपल्या राष्ट्रपती भवनाने देखील एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. उद्या म्हणजे 23 फेब्रुवारी ला राष्ट्रपती भवनात ‘राजाजी उत्सव’ साजरा होईल. ह्या उत्सवात राष्ट्रपती भवनाच्या केंद्रीय प्रांगणात सी. राजगोपालाचारीजींच्या प्रतिमेचे अनावरण होईल. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते.
ते अशा लोकांपैकी एक होते, ज्यांनी सत्तेकडे पद म्हणून नाही तर सेवा म्हणून पाहिले. सार्वजनिक जीवनातील त्यांचे आचरण, आत्मसंयम आणि स्वतंत्र चिंतन, आज ही आपल्याला प्रेरित करते. दुर्भाग्य असे की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही राष्ट्रपती भवनात ब्रिटिश प्रशासकांच्या प्रतिमा तर तशाच राहिल्या पण देशाच्या महान सुपुत्रांना जागा दिली गेली नाही. ब्रिटिश आर्किटेक्ट एडविन ल्युटियन्स यांची प्रतिमा देखील राष्ट्रपती भवनात होती. आता त्या प्रतिमेऐवजी राजाजींची प्रतिमा लावली जाईल. राजाजी उत्सवाच्या दरम्यान राजगोपालाचारीजींवर आधारित प्रदर्शनी देखील असेल. ही प्रदर्शनी 24 फेब्रुवारी पासून 1 मार्च पर्यंत चालेल. वेळ काढून आपण देखील अवश्य पाहायला जा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ मध्ये, मी तुमच्याशी डिजिटल अरेस्ट विषयी विस्ताराने बोललो आहे. त्या नंतर आपल्या देशात डिजिटल रेस्ट आणि डिजिटल फसवणूक संबंधी खूप जागरूकता आली आहे, पण अजूनही आपल्या आसपास अशा घटना घडत आहेत, ज्या अक्षम्य आहेत. निरपराध लोकांना डिजिटल अरेस्ट आणि आर्थिक फसवणूकीचे बळी केले जात आहे. कितीतरी कळते की एखाद्या ज्येष्ठ नागरिकांची जीवनभराची कमाई हडपली गेली. कधी कोणाच्या मुलांच्या फीसाठी साठवलेले पैसे लुटले गेले. व्यावसायिकांकडून फसवणुकीच्या बातम्या देखील येतात. कोणी फोन करते आणि म्हणते, “मी एक मोठा अधिकारी आहे. आपल्याला काही माहिती सामायिक करावी लागेल. त्यानंतर अनेक भोळे लोक ते करून चुकतात. म्हणून आपले सतर्क राहणे, जागरूक राहणे खूप आवश्यक आहे.
मित्रांनो,
आपल्याला सर्वांना केवायसी म्हणजे आपल्या ग्राहकाला जाणून घ्या ह्या प्रक्रियेविषयी तर माहिती असेलच. कधी जेव्हा आपल्याला आपल्या बँकेकडून केवायसी अपडेट किंवा परत केवायसी करण्याचा मेसेज येतो येतो, तेव्हा मनात प्रश्न येतो की, मी तर आधीच केवायसी केली आहे, मग आता परत कशाला? मी तुम्हाला विनंती करतो की रागावू नका, हे तुमचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणून केले जाते. आपल्याला माहिती आहेच की आजकाल पेन्शन सबसिडी विमा यूपीआय हे सर्व बँक खात्याशी जोडलेले असते. म्हणूनच बँक वेळोवेळी परत केवायसी करते, ज्यामुळे आपले बँक खाते सुरक्षित राहील. हो, याच्यातील आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जे गुन्हेगार आहेत, ते बोगस कॉल करतात. एसएमएस आणि लिंक पाठवतात. म्हणून आपल्याला सतर्क राहायचे आहे आणि अशी धोकेबाजी करणाऱ्यांच्या जाळ्यात सापडायचे नाही आहे. केवायसी केव्हा परत केवायसी केवळ आपल्या बँकेच्या शाखेत किंवा अधिकृत ॲप वर किंवा अधिकृत माध्यमातूनच करा. ओटीपी, आधार नंबर किंवा बँक खात्याविषयी माहिती कोणालाही देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपला पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा. जसे प्रत्येक ऋतूत खाणेपिणे बदलतात तसेच एक नियम करा की थोड्या थोड्या दिवसांनी आपले पासवर्ड देखील बदलायचा आहे.
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वी, भारतीय रिझर्व्ह बँकेने याच विषयावर आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन केले होते. आर्थिक साक्षरतेचे हे अभियान आता संपूर्ण वर्षभर सुरू राहणार आहे. म्हणूनच, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदेशांकडे लक्ष ठेवा आणि आपले केवायसी कायम अद्ययावत करत रहा.
लक्षात ठेवा-
योग्य केवायसी, वेळेवर री-केवायसी मुळे खाते सुरक्षित,
कारण, सक्षम नागरिकांमुळेच घडतो, भक्कम आणि आत्मनिर्भर भारत.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपले शेतकरी केवळ अन्नदाता नाहीत, तर ते आपल्या भूमीचे खरे साधक आहेत. मातीचे सोने कसे बनवावे, हे कोणी आपल्या शेतकऱ्यांकडून शिकावे. आणि आपला आजचा शेतकरी तर परंपरा आणि तंत्रज्ञान दोन्ही एकत्र घेऊन प्रवास करतो आहे. आणि मला हे पाहून अत्यंत आनंद वाटतो, की आपले शेतकरी केवळ उत्पादन नाही, तर गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि बाजारांकडेही लक्ष देत आहेत. ओडिशा मधील हिरोद पटेल नावाच्या युवा शेतकऱ्याविषयी माहिती, तर अत्यंत प्रेरक आहे. सुमारे आठ-एक वर्षांपूर्वी ते आपले वडील शिवशंकर पटेल यांच्यासोबत, पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करत असत. मात्र, त्यांनी शेतीकडे नवे दृष्टिकोन बघण्यास सुरुवात केली. आपल्या शेतातील तळ्यावर त्यांनी एक मजबूत जाळीदार सांगाडा बनवला, त्यावर वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली, तलावाच्या चारही बाजूंना केळी, पेरू, नारळाची झाडे लावलीत आणि तलावात मत्स्यपालनही सुरू केले. म्हणजेच, एकाच जागेत पारंपरिक शेतीही सुरू आहे, भाज्या-फळे ही आणि मत्स्यपालनही. यामुळे जमिनीचा अधिक चांगला वापर झाला, पाण्याची बचत झाली, आणि अतिरिक्त उत्पन्नही मिळू लागले. आज दूरदूरून लोक, त्यांचे शेतीचे मॉडेल बघायला येतात.
मित्रांनो,
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात असे एक गाव आहे, जिथे एका शेतात, 570 वाणांच्या धानाची लागवड केली जाते. यात स्थानिक वाण पण आहेत औषधी पण आहेत आणि इतर राज्यातून आणलेल्या विविध जातींचेही भात पीक घेतले जाते. ही केवळ शेती नाही, तर बियाणांचा वारसा जपण्याचे एक महाअभिमानही आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या या कष्टांचे परिणाम, आकडेवारीतही दिसतात. भारत, आज जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे. 15 कोटी टनांपेक्षा अधिक तांदळाचे उत्पादन, हे छोटे यश नाही. आपण आपल्या गरजा तर भागवत आहोतच, त्याशिवाय जगाच्या अन्नधान्य साठ्यातही मोठे योगदान देत आहोत.
मित्रांनो,
आता तर कृषी उत्पादन, हवाई मार्गानेही अगदी सहज परदेशात पोहोचत आहे. कर्नाटकच्या नंजनगुडची केळी, म्हैसूर विड्याची पाने आणि ईडलिंबू मालदीव पाठवले गेले. ही उत्पादने आपली उत्तम चव आणि गुणवत्तेसाठी ओळखली जातात आणि त्यांना जीआय टॅगही मिळालेला आहे. आजच्या शेतकऱ्याला उत्तम गुणवत्ता ही हवी आहे आणि उत्पादनही वाढवायचे आहे इतकेच नाही तर तो स्वतःची वेगळी ओळख ही बनवतो आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
गेल्या वर्षी, याच काळातील महाकुंभाची छायाचित्रे आपल्याला नक्की आठवत असतील. संगमाच्या काठावर उसळता जनसागर, श्रद्धेचा एक अनंत प्रवाह आणि स्नानाच्या त्या पवित्र क्षणांमध्ये जणू भारताला आपल्या सनातन चेतनेचा साक्षात्कार होत होता. मित्रांनो महा कुंभाचा तोच प्रवाह, तोच माघाचा महिना, तोच श्रद्धेचा स्वर जेव्हा उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो, तेव्हा तो नवे स्वरूप धारण करतो.
मित्रांनो,
केरळच्या भूमीवर भारतपुझ्झा नदीच्या काठावर तिरुनावाया येथे कित्येक शतकांपासूनचा परंपरा आहे- मामंगम. त्याला अनेक लोक महामाघ महोत्सव किंवा केरळ कुंभ असेही म्हणतात. माघ महिन्यात नदीत पवित्र स्नान आणि त्या क्षणाला आयुष्याचा अमिट स्मरणक्षण बनवणे, हाच या उत्सवाचा आत्मा आहे. मात्र काळानुसार ही परंपरा जणू विस्मरणात गेली होती. सुमारे अडीचशे वर्षांपासून इथे या परंपरेचे आयोजन पूर्वीप्रमाणे भव्य होत नव्हते. मात्र आज आपल्या वारशाकडे पुन्हा परत जात असलेल्या आपल्या देशात इतिहासाने पुन्हा कुस बदलली आहे. यावेळी कोणतीही घोषणा किंवा आवाहन न करता केरळ कुंभाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. लोकांनी त्याविषयी एकमेकांना सांगितले कर्णोपकर्णी बातमी पोहोचली आणि बघता बघता भाविक तिरुनावाया इथे पोहोचले.
मित्रांनो
महा कुंभ असेल किंवा मग केरळ कुंभ हे केवळ स्नानाचे पर्व नाही तर हा आपल्या स्मृतींचा जागर आहे आपल्या संस्कृतीचे पुनर्स्मरण आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत नद्या भलेही वेगवेगळ्या असतील, त्यांचे काठ वेगवेगळे असतील पण टाकून वाहणारा श्रद्धेचा प्रवाह एकच आहे. हाच भारत आहे.
मित्रांनो,
आपल्या देशात असे लोक कायम जनतेच्या स्मरणात राहतात, ज्यांनी समाजाच्या कल्याणासाठी काम केले असते. ज्यांनी आपल्या चांगल्या कामात जनहिताला कायम प्राधान्य दिले असते. अम्मा जयललिता अशाच एक लोकप्रिय नेत्या होत्या. २४ फेब्रुवारीला त्यांची जयंती असते. तामिळनाडूच्या लोकांचे त्यांच्याशी किती घट्ट नाते होते. हे मला आजही त्या राज्याच्या दौऱ्यावर असताना दिसते.
अम्मा जयललिता यांच्या नावाचा उल्लेख होताच, तिथल्या लोकांचे चेहरे उजळून निघतात. आपल्या स्त्रीशक्तीला तर त्यांच्याविषयी अधिकच प्रेम आहे. याचे कारण म्हणजे त्या जेव्हा सरकारमध्ये होत्या, त्यावेळी त्यांनी आपल्या राज्यातल्या माता भगिनी आणि मुलींच्या कल्याणासाठी अनेक प्रशंसनीय प्रयत्न केले. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही त्यांनी अनेक ठोस पावले उचलली होती. त्यांच्या देशभक्तीची अत्यंतिक भावना होती त्याचवेळी भारताच्या सांस्कृतिक वारसा विषयी त्यांना अभिमान होता. अम्मा जयललिता यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक भेटी प्रत्येक चर्चा यांचे स्मरण आजही माझ्या मनात ताजे आहे. गुजरात मध्ये त्या 2002 आणि 2012 अशा दोन वेळी माझ्या शपथ ग्रहण समारंभाला आला होत्या. तेव्हा आम्ही दोघेही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री होतो. त्यावेळी सुप्रशासनासारख्या मुद्द्यावर मुद्द्यांवर आमच्यात नेहमी चर्चा होत असे. त्यांची विचारसरणी अगदी स्पष्ट होती आणि विचार अत्यंत ठाम होते, हे त्यांचे एक वैशिष्ट्यच होते. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी पोंगलच्या पवित्र उत्सवाला आम्हाला जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्यांचे ते स्नेहपूर्ण वागणे माझ्या कायम स्मरणात राहणारे आहे. पुन्हा एकदा आम्ही त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
जयललिता अवरगलक्क,
ये निनैवाजंलि-गल,
समुदायत्तिर्क्कु,
अवर आट्रिय सेवै येंड्रूम निनैविल इरुक्कुम|
(अनुवाद: जयललिता यांना माझी श्रद्धांजली, त्यांची देश आणि जनसेवा कायम स्मरणात राहील)
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आता मी बोलणार आहे आपल्या गुणी, हुशार मुलांशी, त्या मुलांशी, ज्यांची परीक्षा सुरू आहे. मला आशा आहे, की तुम्ही या महिन्याच्या सुरुवातीला ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम पाहिला असेल, आणि त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाले असेल. मात्र तरीही, मी तुम्हाला विचारणार आहे की अभ्यासाचा जास्त ताण घेतलेला नाही ना तुम्ही?
माझ्या प्रिय मुलांनो,
तुम्ही तर एक्झाम वॉरियर आहात. मला विश्वास आहे, तुम्ही सगळे पूर्ण ताकदीने परीक्षा देत आहात. हो, आपल्या मनात शंका-कुशंका येणे स्वाभाविक आहे. कधी वाटतं आपल्याला सगळे लक्षात असेल की नाही, कधी वाटतं वेळ तर कमी पडणार नाही ना, या भावनेचा अनुभव प्रत्येक पिढीच्या मुलांनी घेतलेला आहे. तुम्ही एकटे नाही. तुम्ही लक्षात ठेवा तुमचे मूल्य तुमच्या मार्कशीट वरून ठरणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा जे वाचले आहे ते पूर्ण विश्वासाने मनापासून लिहा. आणि जे येत नसेल त्या एका प्रश्नाचा विचार करत बसू नका. आणखी एक आपले आई-बाबा पालक शिक्षक यांच्याशी बोलत रहा. ते तुमच्या गुणांवरून नाही तर तुमच्या प्रयत्नावरून तुमचे आकलन करतात. ते तुमच्या मेहनतीवर खुश असतात. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्हा सर्वांना परीक्षेत तर यश मिळेलच. शिवाय आयुष्यातही यशाची नवनवी शिखरे तुम्ही सर कराल.
मित्रांनो,
सध्या रमजान सुरू आहे. या पवित्र महिन्याच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. काही दिवसांनी होळीचा उत्सव येत आहे. म्हणजे रंग, गुलाल आणि आनंदाचा काळ आपल्या उंबरठ्यावर आहे. तुम्ही सगळे लोक तुमचे कुटुंब आणि आपल्या माणसांसोबत आनंदाने सर्व सण साजरे करा. आणि हो काही मंत्र कायम लक्षात ठेवा. जसे की व्होकल फॉर लोकल. आपल्या होळीच्या सणात असो किंवा इतर कुठल्याही सणसमारंभात अशा अनेक गोष्टींनी शिरकाव केला आहे, ज्या परदेशी आहेत. त्या गोष्टींना सणांपासून दूर ठेवा, होळीपासूनही दूर ठेवा. स्वदेशीचा अंगीकार करा. जेव्हा तुम्ही स्वदेशी वस्तूंची खरेदी करता, त्यावेळी देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या अभियानाला हातभार लावता.
मित्रांनो,
मला दर महिन्याच्या ‘मन की बात’ साठी तुमच्याकडून अनेक सूचना, विनंत्या येतात. तुम्ही पाठवलेल्या प्रयत्नांमुळे, आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यात चाललेल्या अनेक अद्भुत प्रतिभांची माहिती मिळते. वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, समाजासाठी काहीतरी करणाऱ्या अनेक प्रेरणादायी कथा, तुमच्या माध्यमातून देशभर पोहोचतात. आपण आपले प्रयत्न असेच सुरू ठेवा. मी तुमच्या संदेशांची वाट पाहतो. पुन्हा एकदा तुम्हाला आणि आपल्या कुटुंबियांना येणाऱ्या सण-उत्सवांच्या शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद! नमस्कार!
* * *
नेहा कुलकर्णी/आकाशवाणी मुंबई/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Sharing this month’s #MannKiBaat. Do listen! https://t.co/XbKxZCLo9s
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2026
At the India AI Impact Summit, world leaders were impressed by these AI breakthroughs... #MannKiBaat pic.twitter.com/Mrm5qoo0Ct
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026
There are numerous players of Indian origin bringing pride to the countries they represent and this is clearly visible in the T20 World Cup. #MannKiBaat pic.twitter.com/Iu1Y2imsr2
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026
Just days ago, 10-month-old Aalin Sherin Abraham from Kerala passed away. In the midst of that pain, her parents chose to donate her organs. Their decision has touched countless hearts and given hope to others. #MannKiBaat pic.twitter.com/nGeS2XhZp4
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026
Tomorrow, 23rd of February, 'Rajaji Utsav' will be celebrated at Rashtrapati Bhavan. On this occasion, a statue of C. Rajagopalachari Ji will be unveiled. #MannKiBaat pic.twitter.com/tehikIxlX5
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026
KYC is crucial for your bank account's safety. #MannKiBaat pic.twitter.com/Lb89EMywFW
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026
It is gladdening to see farmers focusing not just on production but also on quality, value addition and new markets. #MannKiBaat pic.twitter.com/mP339dhYBc
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026
In Kerala, the centuries-old Mamangam tradition, often called the Kerala Kumbh, has come alive again after nearly 250 years. #MannKiBaat pic.twitter.com/BrMUtTeOYe
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026
Amma Jayalalithaa Ji lives on in the hearts of people across Tamil Nadu. #MannKiBaat pic.twitter.com/cy1Kj2iC9O
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026
Don't let marksheet define you: PM @narendramodi's message to #ExamWarriors in #MannKiBaat pic.twitter.com/mbEKPH99Bf
— PMO India (@PMOIndia) February 22, 2026