Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मंड्या येथील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मंड्या येथील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले


नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मंड्या येथील श्री क्षेत्र आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन केले. या सोहळ्याचा गहन अध्यात्मिक आशय अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी यांनी श्री गुरु भैरवैक्‍य मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, आणि अत्यंत उच्च अध्यात्मिक साधना असलेल्या संतांशी संवाद साधला. ऐतिहासिक ज्वाला पीठ या स्थळाला भेट  आणि भाविकांच्या विशाल मेळाव्याला संबोधित केल्यावर आपल्या मनात उमटलेले भाव शब्दातीत असल्याचे त्यांनी नमूद केले. हा दिव्य अनुभव कायम आपल्या स्मरणात राहील, असे ते म्हणाले.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी कर्नाटकची ओळख असलेल्या ‘तत्त्वज्ञान’ आणि ‘तंत्रज्ञान’ यांचा अनोखा संगम अधोरेखित केला, तसेच मंड्याच्या ‘सक्करे नगरा’तील लोकांच्या आतिथ्यशील स्वभावाकडे विशेषत्वाने लक्ष वेधले. श्री आदिचुंचनगिरी महासंस्थान मठासारख्या संस्था या प्रदेशासाठी नैतिक आणि आध्यात्मिक दिशादर्शक म्हणून काम करतात, असे त्यांनी नमूद केले. “कर्नाटक ही अशी भूमी आहे जिथे तत्त्वज्ञानाची खोली आणि  आधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा संगम आहे.” असे मोदी म्हणाले.

भारताच्या हजारो वर्षांच्या चैतन्यपूर्ण संस्कृतीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी श्री आदिचुंचनगिरी मठाच्या 2000 वर्षांच्या इतिहासातील मूर्त स्वरूपात असलेल्या परंपरांचे दुर्मिळ आणि अखंड सातत्य स्पष्ट केले. त्यांनी डॉ. बाळगंगाधरनाथ महास्वामीजींसारख्या महान व्यक्तीने केलेल्या गहन आध्यात्मिक मार्गदर्शनाची प्रशंसा केली आणि हा वारसा नव्या जोमाने पुढे नेल्याबद्दल विद्यमान नेतृत्वाची प्रशंसा केली. “या पवित्र संस्थेने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सेवेच्या परंपरेने आपल्या देशाला समृद्ध केले आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

समाजात महान संतांच्या परिवर्तनकारी भूमिकेचे सविस्तर वर्णन करताना पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की, डॉ. बाळगंगाधरनाथ महास्वामीजींची आध्यात्मिक शक्ती ही सामान्य माणूस आणि ग्रामीण तरुणांच्या समस्या सोडवण्याशी सखोलतेने जोडलेली होती. त्यांनी स्पष्ट केले की, त्या दिव्य व्यक्तिमत्त्वाने भक्तीकडे समाजापासून दूर जाणे म्हणून नव्हे, तर जनसामान्यांच्या उन्नतीसाठी एक सक्रिय जबाबदारी म्हणून पाहिले. “खरी भक्ती म्हणजे समाजाच्या कल्याणाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येणे,” असे मोदींनी ठामपणे सांगितले.

महास्वामीजींच्या व्यापक परोपकारी उपक्रमांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी नमूद केले की, वंचित मुलांसाठी प्राथमिक शिक्षणापासून ते व्यावसायिक पदवीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्यसेवेबाबतच्या मठाच्या दूरदर्शी दृष्टिकोनामुळे दर्जेदार वैद्यकीय सेवा कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांपर्यंत पोहोचण्याची खातरजमा झाली. “दर्जेदार आरोग्यसेवा हा प्रत्येक नागरिकाचा सुलभ हक्क असला पाहिजे, तो काही निवडक लोकांचा विशेषाधिकार नसावा,” असे प्रतिपादन मोदींनी केले.

मठाच्या मानवतावादी प्रयत्न आणि सरकारची कल्याणकारी धोरणे यांतील साम्य दाखवून देत पंतप्रधानांनी कोट्यवधी गरीब नागरिकांना मोफत रुग्णालयीन उपचार पुरवण्याच्या आयुष्मान भारत योजनेच्या यशावर प्रकाश टाकला. 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना समाविष्ट करण्यासाठी या योजनेच्या अलीकडील विस्ताराबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी दिली. “आमच्या ज्येष्ठ नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा सन्मानाने मिळाव्यात, हे आम्ही सुनिश्चित करत आहोत,” असे मोदी म्हणाले.

महास्वामीजींच्या सर्व सजीवांबद्दलच्या असीम करुणेचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी मोरांच्या संरक्षणासाठीच्या त्यांच्या समर्पित सामाजिक चळवळीची प्रशंसा केली आणि या चळवळीला पर्यावरण संवर्धन तसेच भारताचा सांस्कृतिक वारसा या दोन्हींशी जोडले. दिल्लीतील आपल्या निवासस्थानातील वैयक्तिक निरीक्षणांचा दाखला देत त्यांनी या राष्ट्रीय पक्षासोबतच्या आपल्या प्रेमळ क्षणांचे वर्णन केले. “मोर केवळ आपला राष्ट्रीय अभिमानच नाही, तर एक अत्यंत सुंदर आणि शांतताप्रिय प्राणी आहे,” असे मोदी म्हणाले.

सध्याचे जगद्गुरू, डॉ. निर्मलानंदनाथ महास्वामी यांचे कौतुक करत लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपल्या गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी  केलेल्या कार्याची पंतप्रधानांनी दखल घेतली. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की नव्याने बांधलेले श्री गुरु भैरवैक्य मंदिर हे केवळ एक भौतिक रचना नसून ती अध्यात्मिक भक्तीची खरी अनुभूती आहे. “हे मंदिर निश्चितपणे सेवा आणि प्रेरणेचे कायमस्वरूपी चिन्ह ठरेल,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

श्री आदिचुंचनगिरी मठाच्या अन्न, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म आणि करुणा अशा विविध क्षेत्रांना व्यापणाऱ्या नऊ मूलभूत तत्त्वांचे वर्णन करत पंतप्रधानांनी एक सामूहिक राष्ट्रीय संकल्प मांडण्यासाठी प्रेरणा घेतली. समाजहिताच्या नऊ विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून नागरिकांनी या मूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. “आपल्या सामूहिक निर्धाराला बळकटी देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर नऊ महत्त्वपूर्ण विनंत्या करीत आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

पहिल्या पाच विनंत्या सविस्तर मांडत पंतप्रधानांनी मंड्याच्या जनतेला पाणी संवर्धनात यशस्वी होण्याचे, ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्याचे आणि सर्व सार्वजनिक व धार्मिक स्थळांवर काटेकोर स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. भारतीयांचा उत्पादनांचा स्वीकार आणि राष्ट्राचे सौंदर्य पाहण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देत आत्मनिर्भरतेला बळ देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. “आपण भूमातेचे संरक्षण केले पाहिजे आणि आपल्या देशातील उद्योगांना सक्रिय बळकटी दिली पाहिजे,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

आरोग्य आणि शेतीचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तरुण पिढीला भरड धान्यांचा तसेच एच. डी. देवेगौडा यांनी पुरस्कार केलेल्या प्रादेशिक मुख्य अन्न ‘रागी मुड्डे’चा स्वीकार करण्याचे आवाहन केले. स्थूलतेवर मात करण्यासाठी स्वयंपाकातील तेलाचा वापर 10 टक्के कमी करण्याचे, दैनंदिन जीवनात तंदुरुस्तीचा समावेश करण्याचे आणि आयुष्यभर सेवाभाव जपण्याचेही समर्थन केले. “योग आणि आरोग्यदायी आहाराला प्राधान्य देणे आपल्या दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

गरजूंची सेवा केल्याने जीवनाला एक महान उद्देश प्राप्त होतो आणि समाजरचनेला भक्कम बळकटी मिळते, असे आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी सांगितले. नऊ विनंत्यांचे पालन केल्यास विकसित कर्नाटक आणि विकसित भारताच्या सामायिक प्रवासाला अधिक वेग मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “प्रामाणिक निर्धाराने आपण ‘विकसित भारता’च्या ध्येयाकडे जलद गतीने आगेकूच करू ,” असे मोदी म्हणाले.

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai