नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुमारे ₹21,800 कोटी खर्चाच्या पुणे मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी पुणे आणि महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि दैनंदिन जीवनात नवीन सार्वजनिक सुविधांची भर पडते तेव्हा सणाचा आनंद द्विगुणित होतो असे नमूद केले. दहा वर्षांपूर्वी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी केल्याची आठवण करत हिंजवडी ते शिवाजीनगर कॉरिडॉरच्या उद्घाटनामुळे एका मोठ्या आयटी हबला उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल, तर आज सुरू झालेली नवीन लाईन शहराच्या जुन्या आणि नव्या भागांना जोडेल, असे सांगितले.
पुणे हे विविध संकल्पनांचे एक ऐतिहासिक केंद्र आहे ज्याने देश आणि समाजाला सातत्याने मार्गदर्शन केले आहे, असे ते म्हणाले. तरुण आकांक्षांचे केंद्र म्हणून हे शहर आता आयटी, ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स, स्टार्टअप्स, नावीन्यता आणि उत्पादनाच्या क्षेत्रात विकसित भारताची नवी ऊर्जा प्रसारित करत आहे, असे त्यांनी नमूद केले. “आणि अशा स्थितीत, येथील बळकट होणारी मेट्रो कनेक्टिव्हिटी पुणे शहराच्या विकासाला नवी गती देणार आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
पुणे मेट्रोचा विस्तारातून, आपली शहरे, विकसित भारतासाठी कशाप्रकारे आकार घेत आहेत, याचेच प्रतिबिंब जाणवते, असे विशद करत, पंतप्रधान म्हणाले की, एखाद्या शहरातील उद्योग, तिथली खाद्यसंस्कृती किंवा स्थानिक उत्पादने, या पारंपरिक ओळखींच्या पलीकडे जात आता स्पर्धात्मकता, जीवनमान किती सुखकर आहे, अशा निकषांवर शहरांची तुलना केली जाते, आणि या दोन्ही निकषांवर मेट्रो नेटवर्क मुळे सकारात्मक परिणाम होतो कारण, मेट्रोमुळे प्रवासाचा वेळही वाचतो आणि अत्यंत सुखकर असा प्रवास होतो. शहरांचा वेळ वाचला तर नागरी उत्पादकता वाढते असे नमूद करत, पर्यायाने त्यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले “आणि जेव्हा अर्थव्यवस्था विकसित होते, तेव्हा त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गाला होतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
लोकाभिमुख आणि तत्पर प्रशासनाचे उदाहरण देतांना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, गेल्या 12 वर्षात, देशभरातील 26 शहरातील, मेट्रोचे जाळे 1,200 किमी, इतके विस्तारले असून ही मेट्रो सेवा दररोज, एक कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करते. “आज भारतीय मेट्रो नेटवर्कची गणना, जगातील सर्वोत्तम अशा पहिल्या तीन मेट्रो जाळ्यामध्ये केली जाते,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.
2014 पासून देशभर होत असलेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब महाराष्ट्रातही दिसून येत असल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले, की पूर्वी राज्यात केवळ 10 ते 11 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यरत होते. आता सुमारे 175 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सेवेत दाखल झाले आहेत, तर 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून 680 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू आहे. “यासाठी खर्च होणारा पैसा, मजुरांच्या खिशात जात आहे, या पैशामुळे अभियंत्यांना रोजगार मिळत आहे आणि दुकाने तसेच कारखान्यांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
नव्याने, उद्घाटन झालेल्या मार्गिकेचे आणखी एक वैशिष्ट्य सांगतांना, पंतप्रधानांनी नमूद केले, की या मेट्रो सेवा सार्वजनिक- खाजगी भागीदारीच्या मॉडेल द्वारे विकसित केल्या जात आहेत, म्हणजेच त्यात सरकार आणि खाजगी क्षेत्र अशा दोघांचेही योगदान आहे. “हे विकासाचे असे प्रारूप आहे, ज्याच्या यशातून, देशाच्या प्रगतीला आणखी गती मिळते.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारताचा प्रत्येक नागरिक आणि युवक- युवती, ‘आपण हे करून दाखवू’ या देशव्यापी भावनेने विकसित भारताच्या निर्मितीसाठी झटत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 12 वर्षांत देशाने ग्रामीण रस्ते, महामार्ग, द्रुतगती मार्ग, नवीन रेल्वेमार्ग, रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण, लांब बोगदे आणि उंच पुलांच्या उभारणीसाठी आपली ऊर्जा वापरली आहे. “आता येत्या काही वर्षांत या कामांसोबतच, देशातील शहरांना जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक बनवण्यासाठीही देश आपली ऊर्जा आणि संसाधने खर्च करणार आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
शहरे ही केवळ निवासाची जागा नसून ती आर्थिक घडामोडींची प्रमुख केंद्रे आहेत आणि शेकडो लहान शहरांचे रूपांतर ‘विकास केंद्रां’मध्ये करणे आवश्यक आहे, यावर भर देत पंतप्रधानांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘अर्बन चॅलेंज फंड’ला मंजुरी दिल्याचे नमूद केले. या अंतर्गत, केंद्र सरकारच्या एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्यातून शहरी क्षेत्रात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली जाईल. स्थानिक संस्था आणि खासगी क्षेत्रातील भागीदारांनी या उपक्रमात मिशन मोडवर सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. “मला खात्री आहे, की महाराष्ट्र यामध्ये आपली भूमिका अधिक व्यापक करेल,” पंतप्रधान म्हणाले.
भारताबाबत जागतिक स्तरावर चर्चा घडवून आणणाऱ्या दोन प्रमुख यशांचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी सांगितले की, अत्यंत कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थितीतही भारताने जगातील सर्वाधिक विकासदर कायम राखला. तसेच, जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, केवळ 10 ते 12 वर्षांच्या कालावधीत 50 कोटी नागरिकांना आत्यंतिक गरिबीतून बाहेर काढले. अनेक दशके केवळ घोषणांपुरते मर्यादित राहिलेल्या प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन साधलेले हे यश आहे. “पूर्वी गरिबी विरोधातील लढाई केवळ घोषणांपुरती मर्यादित होती, आज भारत गरिबीचे प्रत्यक्षात उच्चाटन करत आहे,” मोदी म्हणाले.
भारताने सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि गरिबीमध्ये सर्वात वेगाने घट घडवून आणणारा देश, हे दोन महत्त्वाचे टप्पे गाठले असून, ते एकमेकांशी संबंधित आहेत, असे नमूद करत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, वाढती अर्थव्यवस्था आणि विस्तारणारी अर्थसंकल्पीय तरतूद, यामुळे सार्वजनिक गुंतवणुकीत वाढ करणे शक्य झाले. तसेच, पूर्वी घोटाळे आणि गळतीमुळे वाया जाणारा पैसा आता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वीज, पाणी आणि गॅस पाइपलाइनमधील गुंतवणूक एकाच वेळी जीवनमानही सुधारते आणि रोजगार निर्मिती करते, असे ते म्हणाले. “या दोन्ही सुधारणा एकमेकांशी जोडलेल्या आहेत,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
गरीबांसाठी घरे, शौचालये, हर घर जल, नळाद्वारे पाण्याची जोडणी आणि स्वयंपाकाचा गॅस जोडणी यासारख्या कल्याणकारी सेवांचा प्रभाव अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, या अत्यावश्यक सुविधांमुळे लोकांचा आत्मविश्वास वाढला, आणि दैनंदिन वेळेची बचत झाली. “आणि या वेळेचा वापर ते आपल्या कुटुंबासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी करत आहेत,” मोदी यांनी नमूद केले.
गरिबांना सक्षम केल्याने गरिबीवर मात करण्याचे धैर्य मिळते, हा मंत्र अनुसरून, सरकार प्रमुख पदावर नुकताच आपला 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे नमूद करून, पंतप्रधानांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘गरीब कल्याण मेळावे’ सुरू केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे आणि लाभार्थ्यांना मंचावर बोलावून त्यांना गरिबीविरुद्ध शपथ घेण्यासाठी प्रवृत्त करणे, हे याचे उद्दिष्ट होते, असे ते म्हणाले. “ते गरीबीवर मात करण्याचा संकल्प करून, आत्मविश्वास घेऊन परतायचे,” पंतप्रधान म्हणाले.
सक्षमीकरणासाठी सामर्थ्य’ हीच खऱ्या सुशासनाची व्याख्या असल्याचे सांगून पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, त्यावेळी सुरू झालेले अभियान आजही अविरतपणे सुरू आहे. हा बदल अचानक घडलेला नसून, त्यासाठी अनेक वर्षे जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले आहेत, असे त्यांनी जोर देऊन सांगितले. “या प्रयत्नांमुळेच 50 कोटी भारतीय गरिबीतून बाहेर आले आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
गरिबी निर्मूलनाचा लाभ केवळ गरिबीतून बाहेर पडणाऱ्या कुटुंबांपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाला होतो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. गरिबी कमी झाल्यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळते आणि नव्या मध्यमवर्गाचा विस्तार होतो. या वर्गाची वाढती खरेदी क्षमता बाजारपेठेतील मागणी वाढवते. त्यामुळे किरकोळ दुकानांपासून ते मोठ्या कारखान्यांपर्यंत व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “थोडक्यात, भारतातील गरिबी कमी होणे म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची गाठण्याची संधी मिळणे होय”, असे निरीक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवले.
विकसित भारताच्या उभारणीत शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून, त्यांना सक्षम करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. असे असले तरी, सध्या प्रतिकूल हवामान आणि नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील शेतकरी कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आगाऊ मदत केली आहे. तसेच, पीएम किसान निधीचेही वितरण करण्यात आले आहे. या सर्व बाबींची दखल घेत पंतप्रधानांनी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता आणि एकजूट व्यक्त केली. राज्यातील शेतकऱ्यांना आश्वस्त करताना ते म्हणाले, “अजिबात काळजी करू नका. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
या सणासुदीच्या काळात दुष्काळग्रस्त नागरिक, शेतकरी कुटुंबे आणि संकटात सापडलेल्या इतर लोकांचीही आठवण ठेवावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद कायम राहावा, यासाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे त्यांनी सांगितले. या आपत्तीचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशाने एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन करताना पंतप्रधान मोदी ठामपणे म्हणाले, “एकजुटीनेच आपण या आपत्तीवर मात करू शकतो.”
मेट्रो प्रकल्पांना शुभेच्छा देत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. विकसित भारताच्या उभारणीत सामूहिक आणि एकत्रित प्रयत्न, म्हणजेच ‘सबका प्रयास’, हा विकसित भारताचा प्राण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “याच भावनेतून आपण देशाच्या विकासकार्यात सहभागी व्हायचे आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले.
A better-connected Pune is a faster-growing Pune! New Metro projects will boost the city’s growth and improve Ease of Living. https://t.co/CZzZ6clgJ2
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2026
IT, automobile, pharma, startups… Innovation से लेकर manufacturing तक, पुणे…देश के युवाओं के लिए सपनों और संकल्पों का स्थान है।
और ऐसे में मजबूत होती यहां की metro connectivity…पुणे शहर के विकास को नई गति देने जा रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 3, 2026
हमारे शहर केवल रहने की जगह नहीं हैं।
ये देश की Economic Activity के बड़े केंद्र भी हैं।
हमें देश के सैकड़ों छोटे शहरों को Growth Hubs भी बनाना है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 3, 2026
आज भारत वो देश है… जो Fastest Growing economy भी है और Fastest Poverty reducer भी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 3, 2026
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/राधिका अघोर/राजश्री आगाशे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A better-connected Pune is a faster-growing Pune! New Metro projects will boost the city's growth and improve Ease of Living. https://t.co/CZzZ6clgJ2
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2026
IT, automobile, pharma, startups... Innovation से लेकर manufacturing तक, पुणे...देश के युवाओं के लिए सपनों और संकल्पों का स्थान है। और ऐसे में मजबूत होती यहां की metro connectivity...पुणे शहर के विकास को नई गति देने जा रही है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 3, 2026
हमारे शहर केवल रहने की जगह नहीं हैं। ये देश की Economic Activity के बड़े केंद्र भी हैं। हमें देश के सैकड़ों छोटे शहरों को Growth Hubs भी बनाना है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 3, 2026
आज भारत वो देश है... जो Fastest Growing economy भी है और Fastest Poverty reducer भी है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 3, 2026