Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात होणार सहभागी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रात गडचिरोली इथे आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान सुमारे 3,000 कोटी रुपये खर्चाच्या 246 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. देशभरातील आदिवासी समुदायांसाठी शिक्षण, आरोग्यसेवा, उपजीविकेची साधने आणि सामुदायिक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 38 एकलव्य मॉडेल निवासी शाळा (ईएमआरएस) आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पीएम-जनमन) अंतर्गत 100 बहुउद्देशीय केंद्रांसह 173 प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. हे प्रकल्प सेवा वितरण आणि सामुदायिक उपक्रमांसाठी केंद्र म्हणून काम करतील. पंतप्रधान पीएम-जनमन आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान (डीएजेजीयूए) अंतर्गत इतर विविध प्रकल्पांचे उद्घाटनही करतील.

अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील आदिवासी संशोधन संस्थेची (टीआरआय) इमारत आणि मिझोराममधील आयझॉल येथील रोपुइलियानी आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय, या महत्वाच्या प्रकल्पांचेही यावेळी उद्घाटन होईल. आदिवासी संस्कृती आणि वारशाचे जतन करणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे. हे संग्रहालय मिझो आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे धैर्य, पराक्रम आणि बलिदान याचे स्मरण करते, तसेच मिझो समुदायाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे दर्शन घडवते. एकोणिसाव्या शतकातील मिझो समुदायाचे प्रमुख रोपुइलियानी यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे, त्यांनी ब्रिटिश वसाहतवादी राजवटीचा धैर्याने प्रतिकार केला. आदिवासी समुदायाचा प्रतिरोध आणि त्यागाचे प्रतीक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.
आदिवासी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधान 19 नवीन एकलव्य आदर्श निवासी शाळांची पायाभरणीही करणार आहेत. आदिवासी उत्पादकांना सुलभतेने बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंतप्रधान 12 आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्रांची  पायाभरणीही ते करणार आहेत. यासोबतच प्रधानमंत्री जनमन (PM-JANMAN – Pradhan Mantri Janjati Adivasi Nyaya Maha Abhiyan) आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत (DAJGUA) इतर 42 प्रकल्पांचीही पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभरात साजऱ्या होत असलेल्या जनजातीय गौरव पंधरवड्याची सांगता या कार्यक्रमाने होणार आहे. या पंधरवड्यात राष्ट्रीय पातळीवर तसेच देशाच्या तळागाळापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्ग एकलव्य आदर्श निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपतींचा संवाद, राष्ट्रीय आदिवासी साहित्य महोत्सव, आदिवासी पारंपरिक वैद्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा असुरक्षित असलेल्या आदिवासी समुहांसाठी आरोग्य आणि पोषण विषयक शिबिरे आणि धरती आबा जनभागीदारी अभियानाअंतर्गत आदिवासी गावांमध्ये सामुदायिक सेवा मोहिमा अशा उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे.

***

राधिका अघोर/राजश्री आगाशे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai