Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारीचा मार्गदर्शक आराखडा [2026-2030]


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटन यांच्यात 16 मे 2026 रोजी हेग इथे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी लक्ष्यित, कालबद्ध रितीने आखलेले उपक्रम आणि संयुक्त कृती-आराखड्याच्या माध्यमातून भारत आणि नेदरलँड्स मधील द्विपक्षीय संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्यावर सहमती व्यक्त केली. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, भारत आणि नेदरलँड्स यांनी पुढील 5 वर्षांसाठी (2026-2030) भारत-नेदरलँड्स धोरणात्मक भागीदारी विषयक मार्गदर्शक आराखड्याचा अवलंब केला आहे.

याअंतर्गत दोन्ही देशांनी खाली नमूद बाबींवर सहमती व्यक्त केली आहे:

I. राजकीय संवाद

अ. बहुपक्षीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीसह सरकार किंवा राज्यांचे प्रमुख, परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांच्या दरम्यान नियमितपणे बैठका आणि परस्पर भेटीगाठी सुरू ठेवणे.

ब. परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवर एक यंत्रणा स्थापन करणे, या यंत्रणेच्या माध्यमातून या धोरणात्मक भागीदारीच्या मार्गदर्शक आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेण्याकरता आणि भविष्यातील कृतीसाठी धोरणात्मक मार्गदर्शनाकरता वार्षिक बैठकांचे आयोजन केले जाईल घेईल.

क. परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी संबंधित मंत्रालयांच्या प्रमुखांमधील बैठका आणि संवादाचा विस्तार करणे

 

II. आर्थिक सहकार्य आणि गुंतवणूक

अ. पुरवठा साखळी अधिक लवचिक बनवण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांतील कंपन्यांमध्ये संयुक्त उपक्रम, औद्योगिक भागीदारी आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्याला प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी नवीकरणीय ऊर्जा, दूरसंवाद, सागरी क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि शहरी विकास, नवोन्मेष, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृषी, औषधनिर्माण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान, सेंद्रीय रसायने, कापड, लोखंड आणि पोलाद, तसेच ॲल्युमिनियम यांसारख्या उच्च क्षमतेच्या क्षेत्रांमध्ये विशेषतः द्विपक्षीय व्यापार, बाजारपेठा खुल्या करण्याकरता आणि गुंतवणूक वाढवण्याकरता सर्वंकष संयुक्त व्यापार आणि गुंतवणूक समितीच्या (JTIC) वार्षिक बैठकांचा प्रभावीपणे उपयोग करून घेणे.

ब. परस्पर देशांमधील व्यापार मेळाव्यांमधील सहभागाला तसेच व्यावसायिक मंचांच्या आयोजनाला गती देणे, अशा आयोजनांमध्ये औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रातील विविध संघटना तसेच वाणिज्य मंडळांचा सक्रिय सहभाग वाढवणे.

क. गुंतवणूक सुलभतेसाठी आणि निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्यांच्या निवारणासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या द्विपक्षीय जलदगती यंत्रणेच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा गेणे.

ड. अत्यावश्यक खनिज क्षेत्रातील खाणकाम, संशोधन आणि नवोन्मेष, मूल्य साखळींचे एकात्मिकरण, पुरवठा साखळीची लवचिकता, चक्रीयता तसेच पर्यावरणीय-सामाजिक-प्रशासकीय (ESG – Environmental, Social, and Governance) मानके तसेच त्यासंबंधीच्या मूल्यमापनाबाबतच्या सामंजस्य करारांतर्गत, पुरवठा साखळीमध्ये वैविध्य आणण्यासाठी अत्यावश्यक कच्च्या मालाच्या मूल्य साखळीत द्विपक्षीय धोरणात्मक संयुक्त भागीदारीच्या शक्यता पडताळून पाहाणे, आणि अशा संयुक्त भागीदाऱ्यांच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे.

इ. नवीकरणीय ऊर्जा, शाश्वत शेती, सागरी क्षेत्र, पायाभूत सुविधा, औषधनिर्माण, वैद्यकीय तंत्रज्ञान तसेच उच्च तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांसारख्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि नेदरलँड्स दरम्यान निर्धारीत केलेल्या दुहेरी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही देशांकडून परस्परांकडील एकसामायिक व्यवसायांना परस्परांसोबत जोडून देण्याचे प्रयत्न केले जातील. संयुक्त उपक्रम आणि सार्वजनिक खाजगी क्षेत्राच्या भागीदारीला पाठबळ दिले जाईल, यासोबतच ज्ञान विषयक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील परस्पर सहकार्याला प्रोत्साहन दिले जाईल. शाश्वत विकास, रोजगार निर्मिती आणि लवचिक मूल्य साखळी निर्माण करण्याच्या हेतूने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सहभागाला बळकटी देणे, गुंतवणूक सुलभतेचा विस्तार करणे आणि नवोन्मेष विषयक परिसंस्था बळकट करण्यावर विशेष भर दिला जाईल.

 

III. जल, कृषी आणि आरोग्य

अ. दोन्ही देशांमध्ये मार्च 2022 मध्ये जल क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी स्थापित झाली होती,  ही भागीदारी मार्च 2027 पर्यंत अंमलात असणार आहे, या भागीदारीचे नूतनीकरण करण्याची परस्पर सामायिक आकांक्षा मांडण्यात आली आहे, यासोबतच जल विषयक मंत्रीस्तरीय संयुक्त कार्यगटाच्या माध्यमातून या भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे.

ब. एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन, सागरी किनारपट्टीचे एकात्मिक व्यवस्थापन, शहरी जल व्यवस्थापन, पूर स्थितीतील लवचिकता, नदी खोरे व्यवस्थापन आणि गंगा खोऱ्यातील पाण्याची शाश्वत गुणवत्ता आणि उपलब्धता या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करणे.

क. विद्यमान कामांना पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन तसेच या जल क्षेत्रात स्थापन केलेल्या उत्कृष्टता केंद्राचा लाभ घेत, परस्परांसोबत ज्ञान आणि कौशल्याची देवाणघेवाण, क्षमता निर्मिती आणि स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देणे.

ड. जल कृती आराखड्यासंबंधीच्या संयुक्त वचनबद्धतेची पूर्तता करण्याकरता भारतातील निश्चित केलेल्या शहरांमधील शहरी नदी व्यवस्थापन योजनांची आखणी करण्याकरता पाठबळ देण्याच्या उद्देशाने, संबंधित आराखड्यामध्ये शहरी नदी व्यवस्थापन नियोजन आणि वॉटर एज लेव्हरेज या दृष्टीकोनाचा अंतर्भाव करणे, यासोबतच विविध प्रकल्पांच्या माध्यमातून अशा योजना प्रत्यक्ष उपयोगात आणण्याला चालना देणे.

ई. आपत्ती -प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी, भारत नेतृत्व करत असलेल्या आघाडीच्या नेतृत्वाखाली, क्षमता बांधणी उपक्रमाद्वारे भारतात आणि जागतिक स्तरावर आपत्ती प्रतिरोधक शहरी जल पायाभूत सुविधांच्या विकास आणि वृद्धीला पाठिंबा देणे.

फ. कृषी, पशुपालन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य बळकट करणे आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त कृषी कार्यगट सुरू ठेवणे, ज्या मध्ये भारत -नेदरलँड्स उत्कृष्टता केंद्रांच्या प्रगतीचा आढावा घेणे, वनस्पती आरोग्य आणि पशुवैद्यकीय बाजारपेठेत प्रवेश, हवामान प्रतिरोधक कृषीला संयुक्त पाठिंबा, जबाबदार मूल्य साखळी आणि जागतिक अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे, मात्र तितकेच मर्यादित नाही.

ग. कृषी-तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान, ज्ञान सामायिकीकरण आणि कौशल्य विकास यांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे आणि  स्वच्छ रोप केंद्र आणि स्टार्टअप्सना पाठिंबा देणे यांसारख्या नवीन कृषी तंत्रज्ञानाच्या सह विकासाला प्रोत्साहन देणे.

ह. आरोग्यसेवा आणि सार्वजनिक आरोग्य यांच्याशी निगडीत सामंजस्य करार आणि त्यांच्या संयुक्त कार्यगटाद्वारे द्विपक्षीय सहकार्याला चालना देऊन, सीमापार संसर्गजन्य आजार आणि प्रतिजैविकता (एएमआर), असंसर्गजन्य आजार (एनसीडी), डिजिटल आरोग्य (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबरसुरक्षा यांचा अंतर्भाव) यांच्यासह जागतिक सार्वजनिक आरोग्य जोखमींचा सामना करणे तसेच हवामान बदल आणि आरोग्य यांच्यातील परस्पर संबंध तसंच क्षमता बांधणी यांसाऱख्या प्राधान्य क्षेत्रावर विशेष भर दिला जाईल. डच राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संस्था (आरआयव्हीएम) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्यात नुकत्याच स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराद्वारे हे सहकार्य अधिक बळकट होईल. संसर्गजन्य आजार, कीटकजन्य आजार, एक आरोग्य आणि रोग निरीक्षण या क्षेत्रांचा समावेश यामध्ये असेल.

य. जून 2025 मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार आणि त्या अंतर्गत स्थापन केलेल्या सह कार्यगटाच्या नियमित बैठकांद्वारे, लवचिक जागतिक पुरवठा साखळ्यांना पाठिंबा देणे आणि संशोधन व नवोन्मेष बळकट करण्यासाठी औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देणे. या मध्ये इतर गोष्टींबरोबरच शैक्षणिक सहकार्य, नियामक सहकार्य, व्यवसायांमधील सहभाग आणि बाजारपेठ प्रवेशासंबंधी ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश आहे.

ज. नेदरलँडस् अन्न आणि ग्राहक उत्पादन सुरक्षा प्राधिकरण (एनव्हीडब्ल्यूए) आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांच्या दरम्यान नुकत्याच स्वाक्षरी करण्यात आलेल्या सामंजस्य करारात नमूद केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानके, अधिसूचना आणि सहकार्य यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक (प्रमाणन) प्रणालींचा वापर याबांबत अन्न सुरक्षा प्राधिकरणांमधील परस्परसंवादाद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण करणे.

 

iv. उदयोन्मुख तंत्रज्ञान, नवोन्मेष, विज्ञान आणि शिक्षण

अ. भारत आणि नेदरलँड्सच्या राष्ट्रीय संशोधन प्राधान्यक्रमांचा विचार करता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सहकार्यावरील विद्यमान सह कार्यगटामार्फत, सरकार, शिक्षण संस्था आणि उद्योग यांना सामील करून सेमीकंडक्टर, एआय, सायबर सुरक्षा, ऊर्जा सामग्री आणि जैव-आण्विक व पेशी तंत्रज्ञान यांसारख्या प्रमुख सक्षम तंत्रज्ञानावर विशेष भर देऊन नवोन्मेष आणि सहकार्य संशोधन वृद्धिंगत करणे.

ब. सेमीकंडक्टर आणि त्याच्याशी संबंधित उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील भारत-नेदरलँड भागीदारी सामंजस्य कराराचा लाभ खालील बाबींसाठी घेणे.

1. भारत आणि नेदरलँडस् या दोन्ही देशांतील सेमीकंडक्टर उद्योगांमधील सहकार्यातून विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी सहकार्याचे नवीन मार्ग शोधणे.

2. कृत्रिम बुद्धिमत्ता, फोटोनिक्स, क्वाटंम आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान मूल्य साखळी भागीदारी करून उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाबाबतचे सहकार्य विस्तारणे.

3. डच सेमीकंडक्टर कॉम्पिटन्स सेंटरला इंडियन सेमीकंडक्टर मिशनशी जोडणे, हे सहकार्य, तंत्रज्ञान आणि बौद्धिक प्रतिभेच्या विकासाद्वारे भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राला व विशेषतः उद्योग, स्टार्टअप, स्केलअप्स, लघु आणि मध्यम उद्योगांना त्याचप्रमाणे त्यांच्या पुरवठादारांना सहाय्य आणि बळकटी मिळेल.

क. इन्ड्होवेन तंत्रज्ञान विद्यापीठ आणि ट्वेटे विद्यापीठ यांच्या बरोबरच्या सहा आघाडीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयएससी बेंगलोर, आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर, आयआयटी गुवाहाटी आणि आयआयआयटी मद्रास) यांच्यातील सामंजस्य कराराला सहाय्य करणे याद्वारे सेमीकंडक्टर आणि त्या संबंधित तंत्रज्ञानामध्ये एक बौद्धिक सेतू तयार होईल.ज्यामुळे एनएक्सपी, एएसएमएल, टाटा आणि सीजी सेमी यांना सहाय्य मिळेल.

ड. भारत आणि नेदरलँड यांच्यातील उच्च शिक्षण सहकार्य सामंजस्य कराराची अमंलबजावणी करणे, दोन्ही देशांमध्ये सातत्याने संपर्क साधून एक एकत्रित योजना कार्यन्वित करणे जेणेकरुन दोन्ही देशांच्या माहिती संस्थांमधील सहकार्य अधिक वेगवान होईल.

ई. शैक्षणिक आणि संशोधन परस्पर सहकार्याला अधिक मजबूत करणे, जसे की, स्टेम डोमेन आणि अधिकाधिक संस्थात्मक भागीदारी वाढवणे.   

फ. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सध्याच्या भागीदारीच्या व्याप्तीची दखल घेऊन, शासकीय, औद्योगिक आणि शैक्षणिक स्तरावर पुढील सहकार्याच्या शक्यता तपासल्या जाऊ शकतात. यामध्ये हवामान बदल, पाण्याच्या समस्या, अन्न सुरक्षा तसेच हवेची गुणवत्ता यांसारख्या सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या व्याप्तीवर आधारित विविध कार्यांचा समावेश असेल.

 

V. ऊर्जा संक्रमण, शाश्वत विकास आणि सागरी विकास

अ. नवीकरणीय ऊर्जेवर एक संयुक्त कार्यगट स्थापन करणे आणि सर्वोत्तम पद्धती व अनुभव सामायिक करण्यासाठी, एकमेकांच्या औद्योगिक परिसंस्थांमधील ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हरित हायड्रोजन, जैवऊर्जा, जैव-रसायने किंवा पर्यावरण पूरक चक्रीय कच्चा माल, नवीकरणीय ऊर्जा आणि बॅटरी साठाक्षमता या क्षेत्रांमध्ये औद्योगिक भागीदारी सहकार्याला चालना देण्यासाठी नियमित बैठका घेणे.

ब. भारत आणि नेदरलँड्स दरम्यान हरित कॉरिडॉर तयार करून, नवीकरणीय हायड्रोजनच्या क्षेत्रातील संयुक्त उपक्रमांसाठी कृती आराखडा तयार करण्याकरिता परस्पर सहकार्य करणे.

क. हवामानावरील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करून पर्यावरणावर भक्कम सहकार्यासाठी मार्ग शोधणे; हवामान अनुकूलन आणि हवामान बदल यावरील सर्वोत्तम पद्धती, ज्ञान आणि तंत्रज्ञान सामायिक करणे.

ड. ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स, इंटिग्रेटेड बायोरिफायनरीज मिशन, इंटरनॅशनल सोलर अलायन्स आणि कॉम्बिट्रॅक ऑन सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून जैवइंधन, पर्यावरण पूरक चक्रीय अर्थव्यवस्था आणि कचऱ्यापासून ऊर्जा या क्षेत्रांतील द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करणे.

ई. सागरी क्षेत्रात सुरक्षित, संरक्षित आणि शाश्वत योगदान देण्यासाठी, बंदरे, अंतर्गत जलमार्ग आणि जहाज वाहतुकीमध्ये नाविन्यपूर्ण हरित ऊर्जा उपाययोजनांना प्रोत्साहन देणे, तसेच भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सागरी सहकार्यावरील नुकत्याच नूतनीकरण झालेल्या सामंजस्य कराराच्या आणि हरित व डिजिटल सागरी कॉरिडॉर मधील मान्य केलेल्या मसुदा पत्राच्या संदर्भात सहकार्य अधिक विकसित करणे. यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता युरोपीय बाजारपेठांशी जोडून भारताच्या हरित हायड्रोजन निर्यातीलाही चालना मिळेल.

फ. सागरी सहकार्यावरील संयुक्त कार्यगटाच्या चौकटीच्या आधारे, दोन्ही देश हरित व डिजिटल सागरी कॉरिडॉरवरील सर्वसमावेशक आराखडा शोधतील, ज्याचा उद्देश भारत आणि नेदरलँड्स दरम्यान भविष्यासाठी सज्ज असलेला एक पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत, डिजिटलदृष्ट्या एकात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम असा सागरी कॉरिडॉर तयार करणे आहे.

ग. शाश्वत शहरी विकासावरील सामंजस्य कराराअंतर्गत एका संयुक्त कार्यगटाद्वारे शाश्वत शहरी विकासावर आधारित क्षमता निर्माण करणे आणि माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी एकत्रित काम करणे. घनकचरा आणि जल व्यवस्थापन, पर्यावरण पूरक चक्रीय अर्थव्यवस्था, शून्य उत्सर्जन वाहतूक आणि चार्जिंग पायाभूत सुविधा, आणि प्रशासन या संकल्पनांअंतर्गत सहकार्याची विशेष क्षेत्रे ओळखणे.

 

संरक्षण सहकार्य

अ. संरक्षण उद्योग आणि संशोधन केंद्रांमधील सहकार्यासह द्विपक्षीय लष्करी सहकार्यामध्य समन्वय साधण्यासाठी, संबंधित संरक्षण मंत्रालये आणि आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य संचालनालयांमध्ये संयुक्त त्रिस्तरीय-सेवा संवादाचे नियोजन करणे.

ब. नौदल सरावांमध्ये परस्पर सहभाग आणि आयएफसी-आयओआर मध्ये विशेष सहभागाद्वारे सागरी सहकार्य वाढवणे.

क. इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रम (आयपीओआय) आणि इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम (आयओएनएस) यांच्या संदर्भात सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने इंडो-पॅसिफिक प्रदेशातील नेदरलँड्सच्या वाढत्या स्वारस्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील परस्पर संवादाला प्रोत्साहन देणे.

ड. दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांदरम्यान प्रणाली आणि उपकरणांवरील तंत्रज्ञान सहकार्याच्या संधींचा शोध घेणे.

इ. संबंधित क्षेत्रीय संस्थांद्वारे सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) आणि नेदरलँड्स इंडस्ट्री फॉर डिफेन्स अँड सिक्युरिटी (एनआयडीव्ही) यात संरक्षण उद्योग आणि संशोधन केंद्रांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी दोन्ही संरक्षण मंत्रालयांदरम्यान संरक्षण औद्योगिक मार्ग-नकाशा तयार करण्याच्या दिशेने कार्य करणे.

फ. परस्पर रसद सहाय्य करारावर स्वाक्षरी करून प्रशिक्षण सरावादरम्यान लष्करी दल /तुकड्यांना रसद सहाय्य संस्थात्मक स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करणे.

 

VII. सुरक्षा सहकार्य

अ. संरक्षण, सागरी सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, ज्ञान सुरक्षा, दहशतवादविरोध, महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा तसेच परस्पर सहमतीने निश्चित केलेल्या इतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयांसह पारंपरिक आणि अपारंपरिक सुरक्षा मुद्द्यांवर नियमित संवादाद्वारे सहकार्य वृद्धिंगत करणे.

ब. परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये वाढीव सायबर सहकार्याबाबतच्या इरादापत्राच्या अंमलबजावणीसाठी द्विपक्षीय सायबर संवाद अधिक बळकट करणे. यात बहुपक्षीय मंचांवर अधिक समन्वय तसेच क्षमता वृद्धी आणि ज्ञान-विनिमयाद्वारे सायबर धोके आणि सायबर गुन्ह्यांविरोधात संयुक्त प्रयत्नांचा समावेश असेल.

क. धोक्यांच्या मूल्यांकनासंबंधी माहिती-विनिमय, सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण तसेच संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक करार स्वीकारण्यासाठी एकत्रितपणे कार्य करून द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर दहशतवादाविरोधातील लढ्यात सहकार्य अधिक मजबूत करणे.

ड. परस्पर कायदेशीर सहाय्य करार आणि नवीन प्रत्यार्पण करार अंतिम करण्यासाठी एकत्रितपणे कार्य सुरू ठेवणे.

इ. इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रमातील (आयपीओआय) नेदरलँड्सच्या सदस्यत्वाच्या संदर्भात सहकार्य वाढविणे.

 

VIII. स्थलांतर, गतिशीलता आणि वाणिज्यदूतविषयक बाबी

अ. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील दीर्घकालीन आणि ऐतिहासिक मैत्रीपूर्ण संबंधांची दखल घेत त्यांना नवी गती देण्याची इच्छा व्यक्त करणे.

ब. एकमेकांच्या देशांमध्ये न्याय्य स्थलांतर आणि गतिशीलता सुलभ करण्यासाठी कटिबद्ध राहणे.

क. अनियमित स्थलांतर रोखण्यासाठी आणि त्याविरोधात लढा देण्यासाठी संयुक्तपणे योग्य पावले उचलण्याचा निर्धार करणे.

ड. विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टरेट विद्यार्थी, संशोधक आणि उच्च कौशल्य असलेले व्यावसायिक, तसेच युवा व्यावसायिक यांच्या न्याय्य हालचालींना सुलभ करण्यासाठी सहकार्य करणे.

इ. गतिशीलता आणि स्थलांतर विषयक सामंजस्य कराराची अंमलबजावणी करणे.

फ. भारत-नेदरलँड्स वाणिज्यदूत संवादाद्वारे प्रलंबित वाणिज्यदूतविषयक बाबींवर नियमित चर्चा करणे.

 

IX. संस्कृती आणि लोकसंपर्क देवाणघेवाण

अ. सातत्यपूर्ण संवाद, विनिमय कार्यक्रम आणि संयुक्त उपक्रमांद्वारे द्विपक्षीय सांस्कृतिक सहकार्य वृद्धिंगत करणे. यामध्ये वारसा स्थळे आणि इमारतींचे जतन व पुनर्स्थापना यावरील ज्ञानविनिमयाचाही समावेश असेल.

ब. डिझाइन, दृश्यकला, सांस्कृतिक वारसा, सादरीकरण कला आणि संग्रहालय क्षेत्रांतील सहकार्य मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करून सांस्कृतिक सहकार्यावरील सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे स्वागत करणे.

क. सांस्कृतिक कलावस्तूंचा परतावा आणि पुनर्स्थापनेसंदर्भातील विनंत्यांवर सहकार्य सुरू ठेवणे.

ड.संग्रहालयांदरम्यान भागीदारी प्रस्थापित करून परस्पर ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी प्रदर्शन आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे.

इ. दोन्ही दिशांनी संपर्क आणि पर्यटन प्रवाह वाढविणे.

फ. द्विपक्षीय आणि सांस्कृतिक संबंध तसेच दीर्घकालीन मैत्रीपूर्ण बंध अधिक दृढ करण्यात सक्रिय भारतीय आणि डच समुदायांचे तसेच नेदरलँड्समधील महत्त्वपूर्ण भारतीय प्रवासी समुदायाचे योगदानाची दखल घेणे.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/विजयालक्ष्मी साळवी साने/राजेश शिरभाते/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai